दुसरा वाईट वागतो मग आपण का स्वतःला शिक्षा देतो.
मिनल वरपे
मुलींवर अत्याचार होतात, बलात्कार होतात यात त्या मुलीचा काय दोष असतो पण त्या मात्र जगासमोर येताना लाजतात, घाबरतात आणि वेळ आली तर आत्महत्या करतात आणि जो अत्याचार करतो तो मात्र थोडी शिक्षा भोगून निर्लाज्यासारखा फिरतो.
नोकरीच्या ठिकाणी सुद्धा छळ होतो. नको तो मानसिक त्रास होतो. कधी तर चारित्र्यावर सुद्धा संशय घेतला जातो पण तिथे सुद्धा सर्व सहन करून नोकरी सुटायला नको म्हणून मुकाट्याने काम करावं लागते. कारण जो त्रास देतो तो जर वरिष्ठ अधिकारी असेल तर त्याच्या विरुध्द बोलणे म्हणजे नोकरी गमावणे आणि कामाची गरज तर प्रत्येकाला असतेच.
घरात माणसं त्रास देत असतील कोणी समजून घेत नसेल कितीही चांगलं वागल तरी ते निमूटपणे सहन केलं जाते कारण माहेरी जाऊन राहणे हा काही पर्याय नाही आणि मुलांच्या भविष्यावर परिणाम नको म्हणून आला दिवस काढला जातो.
येता जाता रस्त्याने कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर तिकडे सुद्धा दुर्लक्ष करून पुढे जावे लागते कारण जर काही कृती केली तर तमाशा नको आणि लोक नंतर आपल्यालाच दोष देणार कारण समाज तसाच आहे.
आणि हे सगळं जर कायमच घडत असेल तर आणि यापुढे कधीच आपल्यासोबत असे घडू नये म्हणून काय करता येईल हे बघुयात:
१) स्पष्ट वागणे
आपण कुठल्याही ठिकाणी आणि कोणाहिसोबत वागताना बोलताना कायम स्पष्ट राहावं. जे आपल्याला अजिबात आवडत नाही ते आपण जरी शब्दात बोलू शकलो नाही तरी वागण्यातून समोरच्याला कळून द्यावं.
२) विरोध करणे
जर कोणी आपल्याला त्रास देत असेल, अत्याचार करत असेल तर त्याला विरोध करता आलाच पाहिजे जर आपण विषय वाढू नये म्हणून गप्प राहिलो तर आपल्याला तोच त्रास कायम दिला जाईल आणि आपण सहन करणारे आहोत अस आपल्याला गृहीत धरले जाईल.जर त्यांना विरोध केला तर पुन्हा त्यांची त्रास देण्याची हिंमत राहणार नाही.
३) समोरच्या व्यक्तीला त्याची चूक दाखवणे.
नोकरी जाईल, आपल्या शिक्षणावर परिणाम होईल किंवा संसार तुटेल अशा वेगवेगळ्या भीतीने आपण शांत राहून सहन करण्यापेक्षा समोरच्याला न घाबरता त्याची चूक लक्षात आणून द्यायची.
जर समोरचा चुकतोय आणि त्याला त्याची जाणीव राहत नसेल तर आपण ती चूक त्याला दाखवायची. कारण एकदा चूक घडली तर पुढे ती सतत होणार आणि जर आपण चुकीची जाणिव करुन दिली तर कदाचित समोरची व्यक्ती पुढे तस वागणार नाही.
४) आपल्या जवळच्या व्यक्तींची मदत.
कोणताही त्रास अथवा अन्याय जर आपल्या सहनतेच्या पलीकडे गेला आणि अशावेळी काय करावं हे सुचत नसेल तर आतल्या आत त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तींना तुमचा त्रास सांगा.कदाचित आपल्याला जे सुचणार नाही असे काही पर्याय आपल्या जवळचे माणसं आपल्याला सांगतील.
५) अविचार करू नये.
कोणी जर आपल्याला त्रास देत असेल, आपल्यासोबत चुकीचं वागत असेल आपल्यावर अन्याय करत असेल तर ते निमूटपणे सहन करता करता एक वेळ अशी येते की जगणं नकोस वाटते.आणि लोक काय म्हणतील या चुकीच्या विचाराने आपण जीव देतो पण असा अविचार करण्यापेक्षा त्याचा प्रतिकार करावा.जर आपण चुकत नसलो तर कोण काय म्हणेल असा विचार न करता ताठ मानेने आपण जगावं.
६) सक्षम बना
माझ्यावर अन्याय होतोय पण मी त्याचा प्रतिकार कस करू?? मी जर काही पाऊल उचललं तर त्याचा उलट परिणाम तर नाही होणार ना?? माझ्यात एवढी क्षमता नाही की मला विरोध करता येईल असे चुकीचे विचार करून दुर्बल होण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम करा की तुम्हाला कोणत्याही त्रासाला सामोरे जाणे अवघड जाणार नाही.
आपल्याला जिथे त्रास होतोय अन्याय होत असेल आणि आपल्याला विरोध करता येत नसेल तर अशावेळी अविचार करण्यापेक्षा तिकडे जास्त काळ न राहता पर्याय शोधावे. पण जाण्याआधी मात्र अन्याय करणाऱ्याचा खरा चेहरा सर्वांना दाखवून द्यायचा.


