Skip to content

सदाबहार आयुष्य जगण्याचे ११ महत्त्वपूर्ण टिप्स!

सदाबहार आयुष्य जगण्याचे ११ महत्त्वपूर्ण टिप्स!


मिनल वरपे | ९३०७८६७०६७


आपलं जीवन म्हणजे खूपच धावपळीचं झालं आहे.आणि या धावपळीत आपलं आपल्यालाच कळत नाही की काय करावं आणि कस जगावं. येणाऱ्या समस्या, अडचणी यातून बाहेर कस पडावं हे सुद्धा आपल्याला सहज कळत नाही आणि आपण त्यात अडकून आपलं जगणं अगदीच बेचव आणि रटाळवान करतो पण तेच जर खाली दिलेल्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या जगण्याला अर्थ मिळेल.

सदाबहार, प्रफुल्लित आणि उत्साही जगण्याचे काही आडाखे आहेत, त्याची सवय आपण आपल्यात रुजवली तर नक्कीच आपण अर्थपूर्ण जीवन जगतोय, असं वाटल्याशिवाय राहणार नाही.

ते सदाबहार टिप्स पुढीलप्रमाणे..

१) गरजू व्यक्तींना मदत करा.

आपण जे काही कमावतो ते फक्त आपल्यापुरती मर्यादित असते. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. पण जमेल तस आपल्याकडून गरजू व्यक्तींना मदत झाली तर तो आनंद द्विगुणित असतो. गरजू माणसांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपल्याला सुद्धा समाधान मिळते.

२) शाळेतल्या मित्र मैत्रीणीना संपर्क करा.

एकदा शिक्षण पूर्ण झाले, नोकरी सुरू झाली की आपण आपल्या आयुष्यात पूर्णपणे अडकत जातो. त्यानंतर संसारी जीवन सुरू होतेच.पण अधून मधून आपल्या शाळेतल्या मित्र मैत्रिणींना संपर्क केला, भेटलो तर जुन्या आठवणी, शाळा महाविद्यालयीन मस्ती, मज्जा, जुने किस्से एकमेकांसोबत आठवले तर उत्साह वाढतो.

३) आवडीचे पदार्थ बनवा.

रोज रोज आपल्या गडबडीत तसेच परिस्थिती नुसार आपण तेच तेच पदार्थ बनवतो. पण संधी मिळताच आपल्या आवडीचे पदार्थ बनवायचे आणि इतरांना सुद्धा खाऊ घालायचे यातून आपल्याला आणि आपल्या जवळच्या माणसांना एक वेगळाच आनंद मिळतो. कारण रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो आणि अचानक वेगळा आणि आवडीचा पदार्थ केला तर हसत हसत आपलं मन आणि पोट भरते.

४) नवनविन ठिकाणी फिरायला जा.

सतत घर आणि नोकरी, शाळा आणि अभ्यास यामुळे तोचतोपणा आलेला असतो. पण तेच सुट्टी तसेच वेळ मिळताच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलं की खूप प्रसन्न वाटते.अर्थात फिरण्यासाठी नेहमीच स्वतःची गाडी वापरली पाहिजे अस नाही,कधी बस ने..ट्रेन ने तर कधी चालत चालत जवळपास असलेल्या ठिकाणी जाऊन गप्पा मारायच्या. शक्यतो सायकल ने फेरफटका मारला तर उत्तमच.

५) विनोदी चित्रपट पहा.

सतत भावनिक चित्रपट तसेच गंभीर चित्रपट किंवा मालिका बघण्यापेक्षा विनोदी चित्रपट पाहायचे. आपण कितीही निराश असो नाहीतर चिंतेमधे पण ज्यावेळी आपण विनोदी चित्रपट अथवा कार्यक्रम पाहिले की आपल्या चेहऱ्यावर आपोआपच हसू येते. ज्याच्या रिऍक्शन्स मेंदूपर्यंत पोहोचतात.

६) छंद जोपासा.

आपल्या जबाबदाऱ्या तसेच आपली नेहमीची कामे तर आयुष्यभर चालूच असणार पण त्यासोबतच आपल्या आवडीनिवडी जपल्या तर आपलं मन कायम उत्साही राहते. कितीही व्यस्त असलो तरी वेळ काढून आपले छंद जोपासावे कारण त्यामधून आपल्याला कायमच आनंद मिळतो.आणि आपल्या आवडीचे काम करताना आपण कोणत्याच विचारात न अडकता पूर्णपणे आपल्या आवडीत गुंतलेलो असतो.

७) लहान मुलांसोबत खेळा.

लहान मूल ही खूप निरागस असतात त्यामुळे त्यांच्यासोबत जेव्हा आपण आपला वेळ घालवतो त्यावेळी आपण सुद्धा त्यांच्यासारखे बालिश होतो. लहान मुलांसोबत खेळताना आपल्याला सगळ्या समस्यांचा विसर पडतो. त्यावेळी आपल्या मनात कोणत्याच अति विचारांना थारा मिळत नाही.फक्त आपण आणि ती निरागस मुलं यामुळे कायम निरागस हास्य अपल्यासुद्धा चेहऱ्यावर उमटते.

८) आवडते पुस्तक वाचा.

पुस्तक म्हणजे ज्ञानाचा स्त्रोत.पुस्तक वाचताना आपल्या ज्ञानात कायम भर पडते, नवनविन शिकवण मिळते. आणि आपण आपल्या वास्तव जीवनात याच शिकवणी नुसार वागतो. असे कोणतेच पुस्तक नाही ज्यामधे आपल्याला दुःखात अडकण्याची शिकवण मिळते तर पुस्तकातून जीवनात पुढे जाण्याचे मार्ग मिळतात.आणि आपला वेळ सुद्धा सहज जातो. सय्यमीपणा वाढतो.

९) टिंगल आणि मस्ती, मज्जा करा.

सतत गंभीर चेहरा करणे, तोंड पाडून बसणे.सतत विचार करणे यापेक्षा आपल्या चिंता, विचार बाजूला ठेवून मस्त मज्जा मस्ती करून घरातलं वातावरण प्रफुल्लित करायचं. वेगवेगळे विनोद करणे, कोणाच्या मनाला लागणार नाही आणि सर्व हसतील अशी थट्टा मस्करी करायची आणि आपल्यासोबत इतरांना सुद्धा आनंदी करायचं.

१०) आवडीचे गाणे ऐका.

आपण दुःखात असो नाहीतर सुखात पण कोणतेही गाणे ऐकले की आपण सहज त्यामधे रमतो. गुणगुणत राहतो. सतत उत्साही राहण्यासाठी गाणे ऐकणे हा अगदी सहज आणि सोपा पर्याय आहे.

११) जुन्या माणसांसोबत गप्पा मारा.

जस आपण आपल्या मित्र मैत्रिणींना भेटलो की आनंद होतो तसच जेव्हा जुन्या वयस्कर माणसांसोबत गप्पा मारल्या की मन मोकळं होत. ज्या गोष्टी कोणीही समजून घेत नाहीत त्या गोष्टी वडीलधारे माणसं सहज समजतात आणि त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकवतात सुद्धा. त्यांचे जुने किस्से ऐकले की आपल्याला सुद्धा खूप मज्जा वाटते आणि माहिती सुद्धा मिळते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “सदाबहार आयुष्य जगण्याचे ११ महत्त्वपूर्ण टिप्स!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!