पती-पत्नीच्या मधुर नात्यांमधील संशयाचे दुष्परिणाम!!
मिनल वरपे | ९३०७८६७०६७
सात जन्माच्या गाठी, एकमेकांवर अतूट प्रेम, सतत जोडीदाराची काळजी, एकमेकांची साथ, आयुष्यभराचा जोडीदार हे सगळे शब्द आपण कायम ऐकत असतोच. हे सर्व आयुष्यात खर उतावती का???
प्रेम विवाह असो नाहीतर घरच्यांनी पसंद केलेल्या जोडीदाराशी केलेलं लग्न असो कोणत्याही पद्धतीने जरी केलं तरी ते असते तर लग्न च ना??
आपण खूप ऐकतो की प्रेम विवाह जास्त काळ टिकत नाही.. सर्वांचा विरोध स्वीकारून एकत्र येणे म्हणजे सोप नसते. पण येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊन केलेलं हे लग्न का टिकत नाही??
अरेंज मॅरेज असेल तर तिथे सुद्धा सर्वांच्या संमतीने आणि आशीर्वादाने जुळलेलं नात असते ते.. जोडीदाराला आधीच ओळखत नसतो पण लग्नानंतर सोबत राहून एकमेकांचा स्वभाव ओळखत हे नात घट्ट होत जाते. पण तरीसुद्धा असे केलेलं लग्न सुद्धा आजकाल का टिकत नाहीत??
टिकत नाहीत म्हणजे कायमचे तुटलेच असे नाही तर जे नात आहे त्यात पूर्वीसारखा गोडवा, एकमेकांचा आदर राहत नाही. जोडीदाराला प्रत्येक वेळी साथ देण्याच ठरवलेलं असून सुद्धा का मागे पडतो आपण???
तर याचं खरं कारण आहे संशयी स्वभाव… आणि हा संशय तेव्हाच वाढतो जेव्हा दोघांचा एकमेकांवरील विश्वास कमी पडतो. पण या संशयी स्वभावामुळे नातं संकटात येण्याची जास्त शक्यता असते.
कोणतंही नातं हे करमणूक म्हणून तर आपण करत नाही. नात हे जपावं, एकमेकांना समजून घ्यावं, पण जर संवाद न करता विश्वास न ठेवता संशयाला नात्यात प्रवेश दिला तर त्याचे वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतात.
◆ मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो:
नात्यात जर संशय नावाचा किडा असेल तर घरात सतत वाद निर्माण होत असतात आणि या वादांचा परिणाम मुलांवर होत असतो. आई वडील का भांडतात, घरात हसत खेळत वातावरण का नाही असे अनेक प्रश्न त्यांना जाणवू लागतात. आई वडील एकमेकांशी नीट बोलत नसले तर मुलांना सुध्दा त्याचा त्रास होतो. त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही.
◆ घरातील वयस्कर माणसं जास्त चिंता करतात
येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची साथ देत उभारलेला संसार कायम उत्तमच घरातल्या घरात राहावा अस घरातील मोठ्या माणसांना अपेक्षित असते.पण आपल्या आई वडिलांचा त्यांच्या संसाराचा आदर्श न घेता सतत संशय घेऊन घरात वाद जर होत असतील तर मुलाचा संसार कसा होणार असे प्रश्न त्यांना भंडावतात, घरातील मोठ्या माणसांना आपल्या मुलाच्या संसाराची कायम चिंता लागून राहते.
◆ शांत झोप लागत नाही
जोडीदाराविषयी मनात संशय असेल तर सतत तो कुठे जातो, कोणाशी बोलतो, काय करतो, माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवून चुकीचं वागतोय असे हजारो विचार संशयी व्यक्तीला रात्रभर झोपू देत नाहीत.
◆ नात्यात गोडवा टिकत नाही
जोडीदारावर विश्वास नसेल तर एकमेकांशी उत्तम संवाद होत नाही, एकमेकांशी बोलावस वाटत नाही. एकमेकांशी थोडीफार काळजी जरी असली तरी ती व्यक्त करावीशी वाटत नाही आणि यामुळे नात्यात कटुता निर्माण होते.
◆ घरचं वातावरण प्रसन्न राहत नाही
घरात होणारे नेहमीचे वाद, एकमेकांना सतत काहीना काही ऐकवत राहणे, लहान सहान कारणांवरून चिडणे आणि घरात जर नेहमीच वाद होत असतील ,अबोला होत असेल तर त्या घरातलं वातावरण प्रसन्न राहतच नाही.
◆ जबाबदाऱ्या सांभाळण कठीण जाते
एकमेकांबद्दल अजिबात विश्वास नसेल तर भविष्याची काळजी आणि भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहिल्याने मन शांत राहत नाही. कामात लक्ष लागत नाही. मुलांचा अभ्यास त्यांचं करिअर, घरातील मोठ्या माणसांकडे,त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. तसेच इतर सुद्धा जबाबदाऱ्या पार पाडण्याच भान राहत नाही.
◆ मानसिक त्रास
आपण आपल्या जोडीदारावर जर संशय घेत असू तर आतल्या आत आपण सतत नकारात्मक विचार करत असतो. आणि जेव्हा सतत डोक्यात विचार चालू असतील आपलं डोकं आणि मन अजिबात स्थिर नसेल तर अशावेळी आपली मानसिकता पूर्णपणे बदलत जाते.
पण तेच जर आपण आपल्या मनात येणाऱ्या शंकांचं निरसन केलं, मनात येणारे प्रश्न अगदी मनमोकळेपणाने आपल्या जोडीदाराला सांगितले, संशयी वृत्तीने न वागता विश्वासाने एकमेकांशी बोललो तर लग्न कोणत्याही पद्धतीचं असो तेथे संशयाला जागाच शिल्लक राहत नाही.
एकमेकांशी संवाद केला,आपल्या जोडीदाराचा विश्वास न तोडता प्रामाणिक वागलो तर नात घट्ट होते.कारण प्रामाणिक राहिलो तरच विश्वास वाढणार. नात कोणतंही असो त्यामधे कोणतीही फसवणूक न करता प्रामाणिक राहिलो तर त्या नात्यात संशयाला जागाच उरत नाही.



लेख खुप छान आहे