बालपणीच्या छंदालाच बनवले व्यावसायिक ध्येय
लहानपणापासून बाईक रेसिंगची आवड असलेल्या छंदालाच अदिती कृष्णन हिने आपले व्यावसायिक ध्येय बनवले व त्यात यशस्वी होण्यासाठी ती कसे प्रयत्न करीत आहे, याविषयी तिचे हे मनोगत आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे.
“वास्तविक बाईक चालवताना मला भीती वाटते. पण तेवढीच मजाही वाटते. राष्ट्रीय चॅम्पियन बनणे हे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत करत आहे. मी बंगळुरूमध्ये दहावीची विद्यार्थिनी आहे. लहानपणापासून मला बाईक रेसिंगचा छंद होता.
माझ्या वडिलांनी जेव्हा मोटारसायकल विषयीची माझी आवड पाहिली तेव्हा वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी मला खेळण्यातील बाईक आणून दिली. मला एक व्यावसायिक बाईक रेसर बनवण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारची मदत केली.
एकदा शाळेत एका शिक्षकांनी विचारले तेव्हा भविष्यात मी बाईक रेसर होऊ इच्छित असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा माझ्या वर्गमैत्रिणी म्हणाल्या कि, हा मुलांचा खेळ आहे, मुलींचा नाही. घरी येऊन मी वडिलांना या विषयी विचारले तेव्हा ते म्हणाले कि मुली जे हवे ते बनु शकतात.
यानंतर वडिलांनी मला व्यावसायिक रेसर होण्यासाठी प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. हळूहळू रुकी कप चॅम्पियनशिपची तयारी सुरु केली, पण एका प्रशिक्षण क्षेत्रात माझे बोट तुटले, डॉक्टरांनी बोटावर प्लॅस्टर चढवले. माझ्या घरच्यांनी विचारले कि, आता आपण घरी परत जायचे का ? पण मी त्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये दुसरा स्थान पटकावला.
त्यानंतर माझे नाव स्पेनला जाण्यासाठी निवडले गेले. यामुळे माझे स्वप्न तर साकार झालेच शिवाय घरच्यांनाही आनंद झाला. तसेच मुलगी बाईक रेसिंग करू शकत नाही हा गैरसमज दूर झाला. तसे स्पेनमध्ये मला हवे तसे यश मिळाले नाही, वडिलांनी मला दिलासा दिला कि आपण आणखी मेहनत करू आणि पुढील वर्षी पुन्हा येऊ.
परत येऊन मी माझे शिक्षण पूर्ण केले. माझ्या मित्र-मैत्रिणींनी स्वतःच्या नोट्स मला दिल्या. शिक्षणासोबतच प्रशिक्षणही मी चालू ठेवले. प्रत्येक विकेंडला ६ तास मी ट्रॅकवर घालवते. काही महिन्यांपूर्वी मी दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. त्यात सुमारे साठ जण सामील होते. मी पहिल्या चारमध्ये स्थान पटकावले.
तेव्हा मला वाटले कि, मी काहीही करू शकते. वास्तविक या प्रवासात मला अनेकांनी निरूत्साहीही केले, पण वडिलांनी मला आत्मविश्वास बाळगायला आणि त्या लोकांकडे दुर्लक्ष करायला सांगितले.
मी दोन वर्षांपासून रेसिंग करीत आहे आणि या काळात खूप काही शिकले आहे. माझ्या पालकांनी कधीही माझ्याशी भेदभाव केला नाही आणि रेसिंगपासून अडवले नाही. वास्तविक बाईक चालवताना मला भीती वाटते, पण तेवढीच मजाही वाटते. राष्ट्रीय चॅम्पियन बनणे हे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी खूप मेहनत करीत आहे.”
सौजन्य : संध्यानंद


