Skip to content

यशस्वी वैवाहिक जीवन कदाचित हेच असावे!!

तुझ्यातच मी आहे……


माधुरी पळनिटकर


खरंच तुझं माझं, माझं तुझं असं आपण लहानपणापासून कळत नकळतच करायला लागतो. तेव्हा आपलंपण संपून प्रत्येक जण ‘मी’पणाला कुरवाळत बसतो. खरंतर जोवर मी माझ्यातलं ‘मी’पण सोडत नाही तोवर मला तुझ्यातलं तुझंपण कळणार नाही, हे वैश्‍विक सत्य आहे. म्हणूनच, जेव्हा जखमा करतं कुणी… तेव्हा हळुवार फुंकर मारणारं… प्रत्येकाच्या घरी खरंच असावं, तुझं माझं करणारं… ‘तुझ्यातच मी आहे’ असं हळुवार सांगणारं… असं वाटून जातं…

खरंच तुझं माझं, माझं तुझं असं आपण लहानपणापासून कळत नकळतच करायला लागतो. ही वस्तू तुझी आहे, ही माझी आहे अशी विभागणी करता करता आपलं विश्‍व फक्त माझं माझंच होतं हे आपल्यालाही कळत नाही. फार थोडे जण बोटावर मोजण्याइतके लोक ‘आपलं’ म्हणतात. पण, त्यांच्या अंतर्मनात देखील ‘माझा मी’ हा लपलेला असतोच.

मग तारुण्याच्या उंबरठ्यावर जेव्हा आपण जोडीदार निवडतो, तेव्हा प्रेमात आकंठ बुडतो. त्याला प्रत्येकक्षणी तू माझाच आहेस, मी तुझी आहे याची जाणीव करुन देत असतो. जसजसा काळ जातो, तसतशी नव्याची नवलाई संपते.

तुझ्या-माझ्यातली प्रेमाची मधुर गोडी वास्तवतेचा चटका खात कमी व्हायला लागते. खटके उडायला लागतात आणि तुझं माझं पटेना पण, तुझ्यावाचून करमेना अशी बिकट परिस्थिती निर्माण होते. वय जसं वाढतं, विचारांमध्ये परिपक्वता येते आणि स्वभावातला लवचिकपणा कमी होतो. झुकतं माप कोणी घ्यायचं हे मोठं प्रश्‍नचिन्ह उभं राहतं. मग अशावेळेस थोडासा दुरावा नात्यात आवश्यक ठरतो. कारण खूप वेळा आपण गृहित धरलेलो असतो.

अशावेळेस आपण एखादा दिवस जरी नसलो तरी दुसर्‍या माणसाला आपल्या अस्तित्वाची किंमत कळते. किती तुझं आहे, किती माझं आहे, त्यापेक्षा किती आपलं आहे याची जाणीव होते. म्हणून स्त्रियांना थोडंसं माहेरपण जरुर द्यावं. मग हा छोटा दुरावा परत एकमेकांना घट्ट बांधतो, ‘आपलं म्हणण्यासाठी…

शांतता हवीय म्हणून मुलांवर ओरडणारे बाबा मुलं नसल्यावर अबोल आणि शांत का होतात. कारण मुलांचा किलबिलाट, पत्नीचा संवाद, घरातलं चैतन्य असतं. घर भरलं असण्याची ती पावती असते. हेच तर कुटुंबांचं खरं रुप असतं. आपल्या खूप काही गोष्टी आपल्या जोडीदारावाचून अडतात हे वरकरणी कितीही नाकरलंत तरी आठवणींमुळे झालेले पाणीदार डोळे, आरशात विरहाचं दु:ख व्यक्त करत राहतात.

मग असं वाटतं…नको ही भेसूर शांतता… तुझं माझं करणारं कुणीतरी खरंच हवं आहे (मग या भावना, ही कविताच तर सांगत नाही ना…)

कुणीतरी हवं असतं
तुझं माझं करणारं…
तिन्ही सांजेला
दाराशी वाट बघणारं…
जेव्हा पूर येतो आसवांचा
तेव्हा आपलाच खांदा भिजवायला देणारं…
आपल्या मुक्या भावनांशी
अबोल होऊन संवाद साधणारं…
जेव्हा जखमा करतं कुणी
तेव्हा हळुवार फुंकर मारणारं…
प्रत्येकाच्या घरी खरंच असावं
तुझं माझं करणारं…

तुझ्यातच मी आहे, असं हळुवार सांगणारं…

मग आपण जोडीदाराला आता निघून ये बसं झालं’ म्हणून दटावतो. खरंच प्रेम व्यक्त करायला सुद्धा आपण का बिचकतो? फक्त माझ्यातल्या मी पणाला का कुरवाळत बसतो. खरंतर जेव्हा तू आणि मी एकरुप होतात तेव्हाच प्रेमाचा अंकुर बहरतो. तेव्हाच प्रेमाचा वेलू गगनावर जाण्यास सरसावतो. संसार बहरतो. तुला ठेच लागली तर माझ्या डोळ्यात पाणी येतं असं म्हणणारं कुणी असेल तर ठेच सुद्धा हवीशी वाटेल.

मग आयुष्याच्या वेलीवर आपलं फुल आलं की आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. कारण त्या ‘आपल्यासाठी’ तुझं आणि माझं आयुष्य झिजणार असतं. पण, खरं सांगू संसार यशस्वी व्हायचा असेल तर दोघांनी फक्त तुझं तुझं करावं. कारण मी माझं करणारी माणसं स्वत: यशस्वी असतात.

पण, कुटुंबात अपयशी ठरतात. कारण ती फक्त एकटीच पुढं जातात आणि आपल्याबरोबर प्रत्येक क्षणात जोडीदाराला सामील करुन घ्यायला विसरुन गेलेली असतात. ती विश्‍व दोन असतात. एक त्याचं विश्‍व ज्याच्यात तिला जागाच नसते आणि तिचं पोकळं विश्‍व, ज्याच्यात ती एकटीच जगत असते. पण, विश्‍व दोघांचं आहे, असं भासवत प्रत्येक अश्रू लपवत असते.

म्हातारपण आलं की शरीर आणि मन सुद्धा थकून जातं. इतक्या प्रदीर्घ आयुष्याचा प्रवास जोडीदारांना पूर्ण तनामनाने एकरुप करतो. त्याचे संवाद मनातले सुद्धा ती ओळखते आणि तिचेही तो ओळखतो. तेव्हा तुझं माझं नसतं आपलंं आपणच फक्त उरतं. ती त्याची म्हातारपणाची काठी आणि तो तिची. हाच असतो यशस्वी संसार, यशस्वी जोडीदार आणि हेच असतं यशस्वी आयुष्य.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!