परिस्थिती बदलता येत नसेल, तर मनःस्थिती बदलूया!!
मिनल वरपे
त्यादिवशी अचानक त्यांची भेट झाली.. कोणतेच नाते नाही ना कोणती ओळख पण ती भेट फक्त तात्पुरती नसून आयुष्यरासाठी शिकवण देणारी ठरली.
आपण नेहमी म्हणतो ना की फक्त शिक्षक, पुस्तक,शाळा, कॉलेज इकडेच शिकायला मिळते असे नाही तर कोणती घटना,कोणती वेळ आपल्याला काय शिकवून जाईल आपल्याला कळत सुद्धा नाही. अगदी तसच झालं. ..
शिक्षण होत अगदी नोकरी सुद्धा होती पण मुलांचं शिक्षण त्यांचं उत्तम करिअर व्हावं यासाठी नोकरी सोडली आणि पूर्णपणे मुलांना वेळ द्यायचं ठरवलं. नवरा उत्तम व्यवसाय करत असल्याने पैशांची जास्त अडचण जाणवली नाही.
मुलं मोठी झाली त्यांचं लग्न झालं पण शारीरिक व्याधीमुळे नवऱ्याचे निधन झाले. आता मात्र तिचा आधार कायमचा गेला अस तिला जाणवलं खरतर तिला पूर्ण विश्वास होता मुलांवर कारण त्यांच्या संगोपनात कसलीच कमतरता भासू दिली नव्हती पण तरीसुद्धा जास्त शिक्षण आणि चांगली नोकरी याचा कुठेतरी गर्व वाटायला लागल्याने आई नकोशी वाटली..
आई च वय झालंय, ती आजारी पडली तर तीच कोण करणार,तिची गरज नाही बायको आहे सोबतीला म्हणून तिला वृद्धाश्रमात ठेवायचा निर्णय घेतला आणि आज ती कष्ट घेणारी आजी वृद्धाश्रमात आली.
खूप रडत होत्या पण त्यावेळी तिथल्याच एका स्त्री कर्मचारी ने जवळ येऊन विचारलं..काय झालं आजी का रडता… आधीच रडणं सुरू होत आणि त्यात इतक्या मायेने कोणी विचारलं म्हणून अजून हुंदके देत रडू आल.. नंतर त्यांना धीर देत तिने शांत केलं.. तेव्हा त्यांनी त्या कर्मचारी लां घडलेलं सर्व सांगितलं.
इतकं सगळं केलं, आज नवरा नाही, मुलांनी एकट पाडलं..एवढं दुःख माझ्याच नशिबी कस आल..मी अशी काय चूक केली की ज्यामुळे मला त्याची ही शिक्षा मिळाली अस म्हणत त्या आजीने त्या तरुणी कडे पाहिलं..
आणि तिला विचारलं की काय करतेस, इकडे काय करतेस, कुठे जॉब करत असशील ना.. किती मायेने बोलतेस, समजावतेस आणि तुझा चेहरा बघून तर खूपच प्रसन्न वाटलं बघ, अशीच हसत रहा कायम. तू राहतेस कुठे..
मी इकडेच काम करते.. मी लहान असताना वडिलांचं निधन झालं.. परिस्थिती हालाखीची आईने कष्ट घेऊन वाढवलं मला पण आज ती सुद्धा या जगात नाहीये.. माझं लग्न झालं आहे पण माहेरची परिस्थिती खराब म्हणून सासरी नीट वागवत नव्हते..
सासरी खूप सगळ्यांना आनंदी ठेवायचे प्रयत्न केले पण शेवटी माझ्याच चुका काढून मला कायमचे घराबाहेर काढले आणि त्या आधीच सोडचिठ्ठी सुद्धा घेतली.
पर्याय उरला नव्हता शेवटी ठरवलं की सगळं सोडून दूर कुठेतरी निघून जायचं.. तस पण मला माझ्या हक्काचं कुणी राहिलच नव्हत.. नातेवाईक कितीही असले तरीही आयुष्यभरासाठी कोणाला त्रास नकोच..
आणि हा मार्ग निवडला..
हे सगळं ऐकल्यावर आजींच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागल्या… त्यांनी विचारलं की इतकं सगळं घडून सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता कशी…तुझा चेहरा आनंदी कसा..इतक्या तरुण वयात तू इतकं सगळं सहन करून आज मला समजावत आहेस हे कस जमलं तुला…
आजींच्या इतक्या सर्व प्रश्नांवर तीच मात्र एकच उत्तर होत…आणि ते म्हणजे ” परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी”….जर माझ्या आयुष्यात इतकं सगळं घडलं आहे ते मला आज बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलून मी दुसऱ्यांना आनंद देऊन.. इकडे येऊन सेवा करून स्वतः आनंदी राहते….
आणि इथे येऊन माझ्यामध्ये मला खूप सारा बदल झालेला दिसतोय. काहीतरी गमावलंय हा दुःखापेक्षा आता काहीतरी सापडलंय ह्याचा आनंद घेण्यासाठी माझा मेंदू आता मला मदत करतोय…
कारण इथे अनेक दुःखी आणि दुर्दैवी प्रसंग घडलेले असूनही व्यक्ती सामान्य आयुष्य जगत आहेत, हे मी पाहतेय..
त्यामुळे आज्जी, आपलं दुःखही इवलंस वाटतंय बघ!


