दुःखाच्या तुलनेत सुखाचे पारडे नेहमी जडच असते.
सौ.अर्चना रौंधळ
(सल्ला नंबर १)
“तुम्ही ना चांगल्या मनोविकारतज्ञाला दाखवा..”
“मनोविकारतज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट;
बापरे! मी काही वेडी नाही हो; फक्त मनात फार विचार येतात, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं..”
“अहो! कोण म्हणालं कि वेड लागल्यावरच मनोविकारतज्ञा कडे जायचं असतं?..
जेव्हा मनातलं ओठावर येत नाही, तेव्हा अनेक लोकांना अशी समस्या निर्माण होत असते. त्यात काळजी करण्यासारखे काहीच नाही.. तुम्ही जा.. तो काहीतरी औषध देईल तर तुम्हाला बरं वाटेल..
(सल्ला नंबर २)
कशाला काळजी करता.. आरामात झोपत जा.. झोप पूर्ण झाली नाही की खरं तर खूप प्रॉब्लेम्स होतात.. उत्साहच वाटत नाही कशात.. मग विचार करून पण कॄती शुन्यच..
(सल्ला नंबर ३)
घरात सुगंधी अगरबत्ती लावत जा.. म्हणजे कसं छान मोकळं प्रसन्न वातावरण निर्माण होईल आणि ताणतणाव आपोआप दूर होईल.. मग आवडत्या देवाचं नामस्मरण करत जा.. देवच सगळं ठिक करील..
मुंग्यांच्या वारुळातुन जशी एका पाठोपाठ एक मुंगी बाहेर यावी तशी सल्ल्याची रांगच लागते जेव्हा आपण आपले प्रॉब्लेम्स शेअर करतो..
म्हणतात “सुख वाटल्याने वाढते; दुःख वाटल्याने कमी होते”.. तरी पण मग डोकं भंजाळलेलच का राहतं?
खरं तर सगळेच उपाय एक से बढकर एक गुणकारी असतात.. पण आपल्याला आपल्याच मनाची कार्यप्रणाली समजत नसते कि वापरायचा तरी नेमका कोणता?..
एका अजस्त्र मोठ्या झाडाच्या फांद्याप्रमाणे प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात.. त्यातल्या निम्म्या तर मानसिक आंदोलनामुळेच निर्माण झालेल्या असतात..
मनाच्या कलहामुळे फार मोठे नुकसान होते आणि आपण सदैव अस्वस्थ राहतो.. यासाठी आपण मनोविकारतज्ञा कडे जाऊ सुद्धा गरज असेल तर.. पण अशी मदत घेतल्यावर आपल्याला फार मोठा आजार झाला आहे असे वाटायला लागले तर..
तर पुन्हा एक प्रॉब्लेम वाढणार..
मग बाकीच्या छोट्या-मोठ्या कुरबुरींसाठी आणखी काय काय करणार?..
तुम्ही दोऱ्याचा रीळ पाहिला असेलच.. एखादा टाका घालायला आपण हवा तेवढा दोरा काढून घेतो आणि बाकीची रीळ व्यवस्थित गुंडाळून परत ठेवतो.. त्याऐवजी जर ही रीळ दोरा तसाच मोकळा ठेवून सोडुन दिली तर.. तर काय होईल बरं!.. नक्कीच दोरा सुटणार आणि गुंता होणार.. आणि त्या दोऱ्याने मदत होण्याऐवजी अडचणच वाढणार..
आपल्याला सगळ्या गोष्टी माहित असूनही आपण असाच गुंता वाढवत असतो.. त्या पेक्षा मदतीचा एकच धागा हातात असला तर..
तर बाकी सल्ले गुंडाळुन ठेवता येतील.. हवे तसे वापरायला..
तो एक मदतीचा धागा म्हणजे “स्वमदत”..
स्वमदतीशिवाय जगातला कोणताच सल्ला किंवा तज्ञ कामाला येणार नाही..
चला एक प्रयोग करून पाहूया.. तुम्हाला तराजूच्या उपयोग तर माहीतच असेल जास्त परिमाण असलेले पारडे खाली जाते व कमी परिमाण असलेले पारडे वर राहते..
आपलं आयुष्य तराजु समजा..
एक पारडे सुखाचे एक पारडे दुखःचे..
चला तर एकेक पारडे कंजुषी न करता भरायला सुरवात करा.. ( हवं तर कागदावर दोन भाग पाडुन यादीच करा.)
तुम्हाला जाणवेल कि दुखःच्या तुलनेत सुखाचे पारडे नेहमीच जड होते..
पण आपल्याला त्याचे महत्वच नव्हते..
मग स्वमदत कशी कराल.. प्रयोग तुमच्या डोळ्यांपुढे आहे.. तुम्हाला कोणत्या पारड्याला महत्व दिलं पाहिजे हे फक्त स्वतःने ठरवायचं आहे.. मग बघा दुसरे पारडे आपोआप हलके होऊ लागेल..


