Skip to content

‘इट्स माय लाईफ’…बंधनं तोडून भरभरून जगा !!

इटस माय लाईफ


माधुरी पाळनिटकर | 9422602768

लाईफ अर्थात जीवन. निसर्गाने तुम्हाला जन्म दिला त्यामागे काहीतरी निश्‍चित हेतू असतो. हे जीवन तुमचं असतं. ते तुम्ही स्वत: जगायचं. ते जगण्याचा अधिकार फक्त तुमचाच. म्हणून काही निर्णय स्वत:च घ्यायचे. मग ते चुकले तरी सामोरे स्वत:च जायचं.

पण, आपलं स्वातंत्र्य कुणी हिरावत नाही ना ते बघायचं. आपल्या जीवनाची दिशा कायम कुणीतरी वेगळेच ठरवत असतील तर ते जीवन तुमचं आहे का? म्हणूनच थोडसं स्वत:साठी जगायचं. कधी रडायचं तर कधी हसायचं, कधी रूसायचं तर कधी फुगायचं. सोनेरी क्षणांना वेचायचं आणि एकदा तरी म्हणायचं ‘इट्स माय लाईफ’

खरंच आयुष्य-जीवन त्याबद्दलच्या व्याख्या वेगळ्या आणि जगण्याच्या प्रत्येकाच्या कल्पनाही वेगळ्या. पण सत्य फक्त एकच, जीवन जगायचं असतं. अँड देअर इज नो ऑप्शन फॉर दॅट. मग विचार येतो हे जीवन आपण आपल्या विचारांनी का नाही जगायचं..

आता त्याला देखील ऑप्शन आहेत. एक कायम दुसर्‍याच्या मताने जगा, स्वत:च्या मताने जगा किंवा कॉम्बिनेशन करून जगा. पण तुम्हीच ठरवायचं आहे कसं जगायचं ते? हे खरं आहे की अनुभवांचे बोल आपल्याला जीवनाच्या योग्य दिशा दाखवतात. तुम्ही जरूर दुसर्‍या थोर व्यक्तींचे सल्ले घ्या, मार्गदर्शन घ्या.

पण माझ्या मते जीवन जगताना स्वत:च्या इच्छा आकांक्षांना कायमच मारून जगू नका. कारण ‘इटस यूवर लाईफ’. निसर्गाने ही तुम्हाला बहाल केलेली अनमोल देणगी आहे. जी तुम्हाला एकदाच मिळते. मग त्यात तुमच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने, मते यांनाच सर्वोच्च स्थान आहे.

प्रत्येक जीवनाचे निर्णय तुम्ही स्वत: घेतच नसाल जर जीवनाचा आनंद तुम्ही कायम दुसर्‍याच्या मतानुसार आणि दुसर्‍याला हवा तेव्हाच घेणार. म्हणजे मग यू आर नॉट लिव्हिंग यूवर लाइफ. सखींनो मी आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया बघते की ज्या साध्या साध्या गोष्टीतही स्वत:चे निर्णय घेऊ शकत नाही.

उदा. त्यांना ड्रेस घालायचा असतो. पण त्यांच्या कुटुंबाला आवडत नाही. नवर्‍याला आवडत नाही. म्हणून मन मारावं लागत. पण, मग असं जर प्रत्येक वेळेस होत असेल तर हे चूक नाही का? हेच पुरुष किंवा इतर व्यक्ती त्या स्त्रियांना आवडत नाही, म्हणून ठराविक गोष्टींचा त्याग करतात का? नो दे वील नॉट.

कारण तेव्हा त्याचं उत्तर असतं स्त्रियांनी त्यांच्या लाईफमध्ये दखल देवू नये. मग हा तराजू कायम त्यांच्याच मताचं, अधिकाराचं पारडं जड ठेवणार. असं का? अर्थात सर्वच पुरूष असे नसतात. मी असे पुरूष बघते जे लाईफ पाटर्नरला स्वातंत्र्य देतात. तिच्या मतांना किंमत देतात एकमेकांना आदर देऊन लाईफ एन्जॉय करतात.

पण, असं जिथं नाही तिथं हे असावं असं मला मनापासून वाटतं. बंधनं कुणालाही नको असतात हे सत्य कुणी नाकारूच शकत नाही आणि हे सर्व स्तरावर लागू आहे. आता मुलांबाबतीतही बघा, त्यांनी कुठं करिअर करावं, त्यांची आवड कशात आहे हे तुम्ही त्यांच्यावर लादू शकत नाही. आपण मार्गदर्शन करावं. पण त्यांचं जीवन त्यांना हवं तसं जगू द्यावं.

पक्ष्यांना नेहमी बळ द्यावं उडण्यासाठी, बंधनाचा पिंजरा नकोच अडकवण्यासाठी, निळंनिळं आकाश त्यांना उडण्यासाठी खुणावत असतं, घेऊ देत त्यांना नभात भरारी आणि जगू देत जीवन जसं हवं तसच त्यांना, तिन्ही सांजेला मायेनी हाक मारायला आपण विसरायचं नसतं.

पंखातलं बळ…उडालं पाखरू घरट्यात येणारच असतं… येणारच असतं. ही कविता मी माझ्या पिल्ल्यांच्या बाबतीत जेव्हा भावनिक होते तेव्हा गुणगुणत असते. कारण एक आई आपल्या मुलांबाबतीत प्रचंड भावनिक असते. तिचं विश्‍व म्हणजे तिची मुलं असतात.

नात्यांमध्ये अनेकदा कलह होतात. जेव्हा आपण दुसर्‍याच्या लाईफमध्ये जरूरीपेक्षा जास्त इंटरफिअर करतो तेव्हाच हे घडते. कुणी कसं लाईफ जगावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. म्हणून थोडी तटस्थ अलिप्त भूमिका ठेवावी. ऑफ्टर रिटायरमेंट वृध्द माणसांनाही पूर्ण स्वातंत्र्य हवं. त्यांनी उर्वरित आयुष्य कसं जगावं यासाठी आयुष्यातली संध्याकाळ तरी त्यांची त्यांनी जगू नये का?

इट्स देअर लाईफ हे त्यांच्या मुलांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याआधी लक्षात घ्यावे. जगा… इटस यूवर लाईफ! पण पाश्‍चात्य संस्कृती अंगिकारून, दारुचं व्यसन लावून फॅशनच्या नावाखाली बीभत्स अंगप्रदर्शन करून जगू नका. असं जीवन जगू नका की निसर्गाला तुम्हाला जीवन दिल्याचा पश्‍चात्ताप होईल.

जे दिलं आहे ते आपलं मानून जगा. व्याधी असतील, दु:ख असतील तरी स्वीकारून जगा. कदाचित निसर्गाला तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकाल असा विश्‍वास असेल, असा पॉझिटिव्ह विचार करून जगा.

लाईफ तुमचं आहे. त्यावरचा अधिकार फक्त तुमचाच आहे. म्हणून दुसऱ्यांना अधिकार देण्याचा काय प्रश्न आहे? एकदा तरी ताठ मानेनं निर्णय घ्या.

बंधनाच्या बेड्या तोडण्याचा प्रयत्न करून आत्मविश्‍वासाने समाजाला न घाबरता म्हणा, इटस माय लाईफ. यस इटस माय लाईफ.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “‘इट्स माय लाईफ’…बंधनं तोडून भरभरून जगा !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!