Skip to content

चेहऱ्यावर कायम ‘स्मित हास्य’ ठेवण्याचे हे आहेत फायदे!

चेहऱ्यावर कायम ‘स्मित हास्य’ ठेवण्याचे हे आहेत फायदे!


मिनल वरपे | ९३०७८६७०६७


सकारात्मकता आणि आनंदी चेहरा कायमच स्वतःला आणि त्यासोबतच इतरांना जगण्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो. आज सहजच आठवल की शाळेत असताना जे शिक्षक अगदी हसत, चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवत वर्गात प्रवेश करायचे असे शिक्षक कायमच वर्गात आले की आम्हाला आवडायचं.

पण तेच काही शिक्षक त्यांच्या गडबडीत तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर अजिबात स्मित हास्य नसेल ते शिक्षक आले की मात्र जास्त उत्साही वाटत नसे.

जेव्हा एकदम सिरीयस होऊन आम्हाला शिकवलं तेव्हा त्या शिक्षकांनी काय विचारले तर आपल्याला त्याच उत्तर देता येईल का? या भीतीने आम्ही लक्ष द्यायचो. पण तेच एखादे शिक्षक छान हसत हसवत, शिकवत असतील तर आमचं लक्ष मात्र दुसरीकडे कधीच भरकटायच नाही आणि त्यांनी शिकवल्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला सहज देता यायची.

आपण आपल्या कामात असतो गडबडीत असतो,कोणाला घरचं टेन्शन तर कोणाला कामाचं, हल्ली कोणाला कोणासाठी सहज वेळ मिळत नाही. कोणी आनंदी आहे की दुःखी हे सुद्धा लवकर कळत नाही कारण जो तो स्वतःच्या गडबडीत.कोणाला काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही.

जर आपण कोणाला वेळ देऊ शकत नाही, कोणाचे प्रश्न सोडवू शकत नसलो तरी एक गोष्ट आपण सहज करू शकतो ती म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील स्मित हास्य.

कोणी कितीही टेन्शन मध्ये असेल तरी आपलं चेहऱ्यावरील हास्य पाहून त्या व्यक्तीला प्रसन्न वाटेल अस व्यक्तिमत्त्व आपण ठेवलं तर नक्कीच ती एक मदतच होईल.

आनंदी चेहरा हा आपल्याला स्वतःला आणि इतरांना जगण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला सकारात्मक विचारच सुचतात. पण तेच जर आपण नाराज राहिलो तेव्हा नकारात्मक विचारांचा घेरा आपल्या अवतीभोवती फिरतो.

आनंदी राहिल्यामुळे आपल्यातील उत्साह कायम वाढत राहतो. हे मी कस करणार, मला जमेल का असे प्रश्न च उद्भवत नाहीत.हे मला नक्की जमेल.., हे करायचा प्रयत्न तर मी करेनच.., कायम असेच सकारात्मक विचार सुचतात.

आपण खूप चिंतेत आहोत आणि अशावेळी एखादी व्यक्ती समोर आली जीचे विचार हे कायम सकारात्मक असतात त्यावेळी आपल्याकडील चिंता त्या व्यक्तीला पाहून अर्धी हलकी झालेली असते.

आनंदी राहिल्यावर वेगवेगळ्या कल्पना सुचतात.त्या पूर्ण करण्याची उमेद निर्माण होते. आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होतो.

आनंदी असल्यावर तसेच सकारात्मकता असेल तर मानसिक आरोग्य कायम उत्तम राहते. आणि त्यासोबतच शारीरिक आरोग्य सुद्धा.कारण नाराज होणे, कोणत्याही गोष्टीकडे पाहताना नकारात्मक बाजूने बघणे, अतीविचार यासारख्या सवयी ज्यामुळे आजार वाढतात अशा सवयी आनंदी व्यक्तीला नसतात.त्यामुळे ती व्यक्ती कायम सहज प्रश्न सोडवते.

कोणतंही अपयश पचवणे हे आनंदी वृत्तीच्या माणसांना सहज जमते.कारण आयुष्य एकदाच मिळते पण पुढे जाण्यासाठी संधी मात्र मिळत राहणार असे सकारात्मक विचार त्यांच्याजवळ असतात. यशाकडे जाण्याचे विविध मार्ग त्यांना सुचतात.

आपल्या घरी, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, काम करत असलेल्या ठिकाणी तसेच कुठेही वावरताना असे व्यक्ती आपल्याला भेटतात ज्यांना पाहिल्यावर खरचं खूप प्रसन्न वाटते.मग ती व्यक्ती आपण का नाही बनू शकत???

आजकाल उत्तम आरोग्य राहावं यासाठी वेगवेगळे क्लासेस सुरू असतात. जो तो वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. कोणी हसायचे व्यायाम करते कारण त्यातून आपल्याला energy मिळते.

पण असे कोणतेच क्लास न लावता जर आपण मनापासून आनंदी राहायचं ठरवलं तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.

आपल्या आजूबाजुला खूप वेगवेगळ्या प्रकारची अर्थात स्वभावाची माणसं आपल्याला भेटतात. काहींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक तर काहींचा नकारात्मक. आलेल्या अडचणीतून, अनुभवातून आपले दृष्टिकोन बदलत असतात. पण जे घेण्यासारखे आहे तेच आपण घ्यावे.

जर एखादा नकारात्मक विचारांचा असेल तर त्याला आपण सकारात्मक विचार सांगायचे आणि त्यांना पटत नसले तर सांगून बाजूला व्हायचं.पण आपण मात्र सकारात्मक विचार कायम सोबत ठेवायचे.

दुःख तर कोणाला नसते, दुःखाची कारणे वेगवेगळी असतात.पण त्या दुःखात सतत रडत राहिलो तर त्याचा त्रास आपल्याला आणि इतरांना सुद्धा होतो.म्हणून सतत रडण्यापेक्षा ते दुःख बाजूला सारून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून पुढे जात राहील तर त्या दुःखाची तीव्रता सुद्धा कमी होत जाते.

ते म्हणतात ना एखाद्याने जर पिवळा चष्मा घातला तर त्याला पूर्ण जगाला कावीळ झाली आहे अस वाटते अगदी तसच आपण जसं बघणार तस आपल्याला दिसणार.मग आपण आनंदी आणि सकारात्मकतेने पाहिलं तर किती सरळ आणि सोप होणार….



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!