मानसिक ताण : कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार.
हरी कृष्ण बाखरू
(निसर्गोपचार तज्ज्ञ)
आपल्या सभोवतालच्या घटना, दृश्ये अशा कितीतरी गोष्टींनी आपल्या शरीरावर आणि मनावर कळत नकळत परिणाम घडत असतात. प्रतिकूल परिणामांमुळे मनावर तसेच शरीरावर ताण पडतो.
हृदयविकार, मधुमेह, डोकेदुखी आणि जाठरव्रण यांसारखे रोग होण्यामागे मानसिक ताण-तणाव हे एक प्रमुख कारण असते.
कारणे आणि लक्षणे
जेव्हा एखादा माणूस मानसिक दडपणाखाली असतो, तेव्हा त्याच्यात अनेक शारीरिक बदल घडत असतात. या दडपणाविरुद्ध लढण्यासाठी शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर प्रतिक्रिया व्यक्त होतात. अशा वेळी मेंदू आणि चेतासंस्था अतिशय वेगाने कार्यरत होतात.
डोळ्यांच्या बाहुल्या फुगतात. अन्नाच्या पचनाचा वेग कमी होतो. यकृतातून ग्लुकोज बरोबरच ‘अड्रेनलयीन’ हि बाहेर टाकले जाते. अंगाला घाम येतो. हे सर्व बदल एका क्षणात घडतात आणि त्यांचा रोख चेतासंस्थेकडे असतो.
मनावरील ताणाची स्थिती ताबडतोब काढून टाकता आली तर काहीही हानी न होता सर्व बदल शरीराकडून उलटे घडवून आणले जातात. मनाच्या या स्थितीमुळे गाढ झोप येत नाही.
स्वभाव चिडचिडा होतो, एकसारखी कुरभुर चालते, घरगुती कुरबुरी वाढतात, छोटे-छोटे आजार होत राहतात, अपघात होण्याची शक्यता वाढते. मन उदास होते आणि त्यातूनच मद्य घेण्याचे प्रमाण वाढते.
मानसिक दडपण हे शरीरातील किंवा शरीराबाहेरच्या अनेक कारणांनी येऊ शकते. मोठे आवाज, प्रखर दिवे, अतिशय थंड किंवा गरम वातावरण, क्ष-किरण किंवा इतर प्रकारचे किरणोत्सर्जन, औषधे, रसायने, जिवाणू आणि इतर विषारी पदार्थ, वेदना अंडी अपुरे पोषण हि काही शरीराबाहेरची कारणे आहेत.
तर तिरस्कार, द्वेष, भिती किंवा मत्सर या मनातील भावनांनीही मनावरचा ताण वाढतो.
उपचार
तुळस :
तुळशीची पाने मनावरील ताण दूर करतात. नवीन संशोधनानुसार मानसिक ताणतणावांवर तुळशीच्या पानांचा उपचार उत्तम असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने सकाळ-संध्याकाळ दोन वेळा मिळून १२ तुळशीची पाने चावून खावी.
कापूरकचरा :
कापूरकचरा या वनस्पतीचा चहा गुणकारी आहे. एक कप उकळते पाणी एक चमचा कापूरकचऱ्याच्या वाळलेल्या पानांवर टाकावे. थोडा वेळ तसेच झाकून ठेवावे. नंतर गाळावे. गोड चवीसाठी त्यात थोडा मध घालावा. जर ताजी पाने मिळाली तर ती थोडी ठेचून त्यांचा वर सांगितल्यासारखा चहा करावा आणि तो घ्यावा.
पोषक द्रव्ये :
मनाचा ताणतणाव कमी करण्यासाठी अ आणि ब जीवनसत्व व कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हि खनिजे फार उपयुक्त आहेत. या पोषकांमुळे मनाची अस्वस्थता, काळजी आणि उद्वेग कमी करण्यास मदत होते.
हिरव्या आणि पिवळ्या भाज्यांमधून अ जीवनसत्व मिळते. काजू, हिरव्या पालेभाज्या, यीस्ट, मोड आलेली कडधान्ये आणि केली या पदार्थांमधून ब जीवनसत्वाचा पुरवठा होतो.
बी कॉप्लेक्स जीवनसत्वांमधील पँटोथिनिक आम्ल हा मनाचा ताण कमी करण्यामध्ये महत्वाचा घटक आहे. ताणामुळे घडून येणारे अनेक शारीरिक बदल अ आणि ब जीवनसत्वांमुळे रोखले जातात. तसेच अड्रेनल ग्रंथी आणि प्रतिकारक्षमता यांच्यावर चांगला परिणाम घडून येतो.
श्वास कोंडला जाणे, थकवा, झोप न येणे आणि रक्तातील साखर कमी होणे या गोष्टी पोटॅशियमच्या कमतरतेमुळे घडतात. हृदयाचे स्नायू निरोगी राहण्यासाठी पोटॅशियम फार आवश्यक असते.
सुका मेवा आणि धान्ये यातून हे खनिज आपल्या शरीराला मिळते. कॅल्शियम हे नैसर्गिक शामक आहे. याच्या कमतरतेमुळे थकवा, निराशा, दडपण हे मनाचे विकार होतात.
दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी, बदाम आणि सोयाबीन यांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. मॅग्नेशियममध्ये शरीराला शांतता लाभते. तसेच या खनिजाचा योग्य पुरवठा शरीराला होत असेल तर हृदयविकार टळतो. अनेक फळे, भाज्या, खजूर, मनुका यांच्यामध्ये मॅग्नेशियम असते.
इतर अन्न
मनाचा ताण घालविण्यासाठी खास बनवलेले रोचक दही, काकवी, धान्ये, मोड आलेली कडधान्ये हि फार उपयोगी आहेत. अ, ड आणि ब जीवनसत्वे ‘योगर्ट’ मध्ये असतात.
‘योगर्ट’ खाल्ल्याने अर्धशिशी, निद्रानाश मासिक पाळीमुळे येणारे पेटके हे आजार कमी होतात. काकवीमध्ये लोह आणि ब जीवनसत्व असते. काकवीचा उपयोग अशक्तपणा घालविण्यासाठी हृदयाच्या विकारांवर होतो.
आहार
मानसिक ताण कमी करण्यासाठी व्यक्तीने आपल्या जीवनशैलीची घडी चांगली बसवली पाहिजे. व्यवस्थित जेवण, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती हि त्रिसूत्री पाळली पाहिजेत.
तरच मनाच्या ताणतणावामुळे उद्भवणारे बरेचसे आजार होणार नाहीत किंवा झाले असतील तर ते बरे होण्यास मदत होईल. आपण कोणते अन्नपदार्थ खातो यावर मनाचे आरोग्य मोठया प्रमाणात अवलंबून असते. कॉफी, थंड पेय, जास्तीचे मीठ, साखर असले पदार्थ अजिबात खाऊ नयेत. सिगारेट ओढू नये आणि मद्यपान टाळावे.
इतर उपाय
मनावरच्या ताणाशी मुकाबला करण्यासाठी नियमितपणे शारीरिक व्यायाम करायलाच हवा. व्यायामामुळे केवळ शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते असेच नाही, तर मनोरंजन, समाधान आणि स्वस्थता मिळते.
आपल्याला मनोरंजन आणि स्वस्थता यांची नितांत गरज असते. ताणग्रस्त रुग्णाने आपल्या दैनंदिन कामांमुळे ठराविक वेळ मनोरंजनासाठी राखून ठेवला पाहिजे. तसेच कामातून नियमितपणे सुट्टी घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली जीवनशैली अतिशय साधी ठेवावी. त्यामुळे मनावरचे अनावश्यक ताण आपोआप कमी होतात.


