थकवा घालविण्यासाठी हे ७ प्रकारचे आराम महत्वाचे !!
टीम आपलं मानसशास्त्र
केवळ झोपणे किंवा शांत बसून राहणे यालाच आराम म्हणत नसून तर मानसशास्त्रात अशा अनेक संकल्पना आहेत ज्यामध्ये निरनिराळ्या बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. या बाबी आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकव्यापासून स्वतःची सोडवणूक करण्यास महत्वपूर्ण ठरतील.
१) शारीरिक आराम
आपली संपूर्ण बॉडी जास्तीत जास्त फ्लेक्सिबल असणे खूप आवश्यक आहे. बॉडी फ्लेक्सिबल असणे याचा अर्थ म्हणजे स्नायू, शिरा आणि धमन्या या आपल्या शरीराला लवकर थकवून न देण्याच्या स्थितीत असणे.
थकवा मिटविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शारीरिक शांततेची खूप गरज असते. शारीरिक आरामही दोन प्रकारचा असतो. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. पॅसिव्हमध्ये आपण झोपतोच, पण ऍक्टिव्हसाठी नियमितपणे स्ट्रेचिंग, योगासनं याशिवाय वेळोवेळी मसाजसारख्या गोष्टीही आवश्यक आहेत.
२) मानसिक आराम
शारीरिक आराम आणि मानसिक आराम हे दोघेही एकमेकांशी परस्परावलंबन आणि एकत्रितपणे काम करण्याच्या क्रिया आहेत. मनाची शांतता मिळविण्यासाठी अनेक उपाययोजना दिलेल्या आहेत. ज्या वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अंबलबजावणी करण्यातच त्यांचा फायदा आहे.
दिवसभर निर्माण होणारा ताण रात्री आपल्याला झोपू देत नाही. म्हणून झोप न लागणे हि आपल्या समस्या नसून तर त्यामागे असणारं मूळ कारण हे अवास्तव ताण आहे. ताणाचे व्यवस्थापन करण्यासाठी घडलेल्या प्रसंगाकडे कसं पहायचं, मेडिटेशन, प्राणायाम, छंद जोपासणे, तसेच जगण्याची कौशल्ये आत्मसात करायला हवीत.
३) ज्ञानेंद्रियांना आराम
पाचही ज्ञानेंद्रियांपैकी डोळे आणि कान हे दोन ज्ञानेंद्रिय आपण दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापरतो. म्हणजेच आपला संपूर्ण शारीरिक आणि मानसिक थकवा ह्या दोन ज्ञानेंद्रियांशी जास्त संबंधित असतो.
नको त्या गोष्टी डोळ्यांनी फार वेळ पर्यंत पाहत राहणे आणि नको त्या गोष्टी ऐकत राहिल्यास मानसिक ऊर्जा वाया जाते. म्हणून एखादे महत्वाचे काम करताना सुद्धा थकवा जाणवतो.
पाचही ज्ञानेंद्रियांचे व्यवस्थापन आपल्याला करायला हवं, ज्याचा संबंध जास्तीत जास्त आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी असावा.
४) सृजनात्मक आराम
समस्या सोडविणे किंवा नव्या विचारांबरोबर काम करणाऱ्या लोकांसाठी अशा प्रकारचा आराम खूप गरजेचा आहे. नैसर्गिक ठिकाणी जाऊन अशा सृजनात्मक विचारांना आपण चालना देऊ शकतो. शक्य असेल तर काही वेळ बागेत फिरत येऊ शकते. तसेच जेथे आपण झोपतो त्या समोरच्या भिंतीवर नैसर्गिक दृश्यांची चित्रे ठेवायला हवीत.
तसेच कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनवर नॅचरल वॉलपेपर ठेवूनही आपल्याला मदत मिळू शकते. निसर्गात राहिल्यामुळे मनाला आराम मिळतो व जास्त जोमाने काम करायला मदत मिळते.
त्याचप्रमाणे दिवसभराची जी काही ठरलेली कामे आहेत, त्यामध्ये सुद्धा काही नाविन्यता आणता येईल का यासाठी प्रयत्न करून पाहायला हवा. म्हणजेच एखादी भाजी किंवा एखादे घरातले काम रोजच्या रीतीने करण्यापेक्षा आज जरा वेगळ्या रीतीने करून पाहूया…असे सृजनात्मक विचार तुम्हाला थकू देणार नाहीत किंवा असलेला थकवा दूर करतील.
५) भावनात्मक आराम
भावनात्मकदृष्ट्या विचार करता, थकवा येण्याची मुख्य कारणे हि योग्य ठिकाणी अयोग्य भावना व्यक्त करणे, अति भावनिक समाधान मिळण्याची अपेक्षा करणे, कोणत्याही प्रकारच्या भावना व्यक्त न करता येणे, टोकाकडच्या भावनांना उद्दीपित करून जोर साबरदस्ती करणे इ या अशा भावना आपल्या मेंदूला लवकर थकवतात.
यावर एक जालीम उपाय म्हणजे, आपल्या जवळच्या व्यक्तींशी, नात्यांशी, मित्र-मैत्रिणींशी भावनिक सलोखे प्रस्थापित करणे. निर्माण झालेले योग्य भावनिक नाते आपल्याला वास्तव भावनांची जाणीव करून देण्यास केव्हाही मदतच करतात.
६) सामाजिक आराम
सामाजिक ठिकाणी वावरताना हा व्यक्ती अत्यंत जवळचा आणि हा व्यक्ती अत्यंत दूरचा असा भेदभाव करण्यापेक्षा कोणालाही कोणताही लेबल लावण्यापेक्षा आपलं उमदं आणि दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला केव्हाही थकवा जाणवू देणार नाही.
हेवेदावे आणि कोणाचेही वैर स्वतःहून घेण्यापेक्षा त्या मुद्द्याकडेच नगण्य म्हणून पाहता यायला हवं. भलेही आपलं त्यांच्याशी व्हर्चुअल बोलणं होऊ दे, पण संवाद कायम ठेवा.
७) आध्यात्मिक आराम
हा आराम जीवनाला आधार देऊ शकतो. ध्येयाचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे आवश्यक ठरते. आध्यात्मिक जीवनामुळे प्रेम, आपलेपणा आणि स्विकार्यता येते. आपल्या रोजच्या जीवनात ध्यानाला महत्व द्यायला हवं. तसेच एखाद्या आध्यात्मिक गुरुची सुद्धा मदत घेऊ शकता.


