आपण रोज वापरत असलेल्या खोबरेल तेलाचे फायदे !!
डॉ. संजीवनी राजवाडे
(आयुर्वेद तज्ज्ञ)
अगदी गरिबांपासून श्रीमंतांच्या घरात सुद्धा खोबरेल किंवा ज्याला आपण नारळाचं तेल म्हणतो, ते असतंच. अगदी तान्ह्या बाळापासून ते आजी-आजिबांपर्यंत प्रत्येकासाठी हे वापरलं जातं. हे तेल वाळवलेल्या खोबऱ्यापासून तयार केलं जातं.
खोबरं मशीनमध्ये दाबाखाली बारीक करून विशिष्ट तापमानाचा उपयोग करून तेल तयार करतात. या तेलाला खोबर्याचाच वास येतो. सामान्य तापमानाला हे तेल द्रवस्वरूपात म्हणजेच पातळ असतं, परंतु कमी तापमानात म्हणजे हिवाळ्यामध्ये हे तेल थिजून घट्ट होतं.
हातावर हा घट्ट गोळा घेऊन चोळला असता ते ताबडतोब पुन्हा पातळ होतं. अनेक ठिकाणी या तेलाचा उपयोग स्वयंपाकात केला जातो. केसांकरिता टॉनिक म्हणून मिळणाऱ्या अनेक तेलांमध्येही खोबरेल तेल प्रामुख्याने वापरलं जातं. अनेक प्रकारच्या साबणांमध्येसुद्धा या तेलाचा वापर केलेला आढळतो.
गुणधर्म
खोबऱ्याचं तेल हे पाचक असून ते शरीरामध्ये साठून न राहता लगेचच कार्यशक्ती मिळण्याकरता वापरलं जातं. वजन कमी करण्याकरता या तेलाचा खूप चांगला उपयोग होतो. त्वचेच्या अनेक तक्रारी यामुळे त्वचा ओलसर व मुलायम होते. या तेलात जिवाणूनाशक, विषाणूनाशक तसेच बुरशीनाशक असे गुणधर्म आहेत. याच कारणास्तव अनेक संसर्गांवर या तेलाचा चांगला उपयोग होतो.
दैनंदिन उपाययोजना :
खोबरेल तेल स्वयंपाकात पदार्थ शिजवताना फोडणीकरता वापरता येते. कच्च्या स्वरूपात सॅलड, कोशिंबीर वा चटणीत वापरता येते. पोळी वा पराठ्याला लावून घेता येते. नुसते तेलही पोटात घेण्यास सोयीचे आहे. तेलाने मालीश करता येते, शिवाय याचे मलम तयार करूनही वापरता येते.
१) कोंडा व त्वचारोग
शीतल व कोरड्या झालेल्या हिवाळ्यातील हवेने त्वचादेखील रुक्ष आणि कोरडी होते. त्वचेमधील ओलावा आणि स्निग्धता कमी झाल्याने त्वचा खेचली जाते. त्वचेवर खाज येते. त्वचेला चिरा पडतात. पायांच्या टाचादेखील भेगा पडून खराब होतात. अशीच परिस्थिती डोक्यावरील त्वचेचीसुद्धा होते व त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो व खूप खाजही येते.
अशा वेळेला डोक्यात खपल्यासुद्धा होतात व केस गळू लागतात.खोबरेल तेल या तक्रारींकरिता वापरावे. २-३ चमचे खोबरेल तेल घ्यावे त्यात समप्रमाणात पाणी घालावे. हे मिश्रण बोटाने व चमच्याने खूप फेटावे. याचे घट्ट मलम तयार होते. हे मलम सकाळ – संध्याकाळ केसांच्या मुळांशी लावावे व मालीश करावे.
कोंड्यामध्ये जेव्हा जंतुसंसर्ग अधिक प्रमाणात असेल तेव्हा मात्र खोबरेल तेलामध्ये कापूर घालावा. ५० मिली. तेल गरम करावे. तेल गरम करावे. गॅस बंद करावा. गरम तेलातच ५ ग्रॅम भीमसेनी कापूर घालावा. तो आपोआप विरघळतो. थंड झाल्यावर हे तेल बाटलीत भरून ठेवावे व मालीशकरिता वापरावे. नियमित मालिशने कोंड्याचे हळुहळू प्रमाण कमी होते.
२) वजन कमी करणे
बऱ्याचदा थायरॉईडचे कार्य बिघडले असता शरीरातील चरबीचे ज्वलन कमी होते. हि चरबी पेशींमध्ये साठून राहते व यामुळे वजन वाढू लागते. अशीच वजनवाढ आहाराच्या चुकीच्या सवयी किंवा व्यायामाच्या अभावानेही होत असते. अशा वेळेला चरबीचे ज्वलन होणे अत्यंत आवश्यक असते.
हे कार्य खोबरेल तेलाने साधले जाते. यामध्ये असणारी फॅट्स हि ‘मिडीयम-चेन सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स’ या प्रकारातली असतात. हि चरबी यकृतात साठून न राहता ताबतोब ज्वलन होऊन तिचे रूपांतर मेंदू व मांसपेशींच्या कार्यशक्तीसाठी जरुरी असणाऱ्या ऊर्जेत होऊन वापरले जाते.
यामुळे आपोआपच शरीरात चरबी साठून राहण्याची प्रक्रिया टाळली जाते. म्हणूनच अशा व्यक्तींनी बटर, चीज, मार्गरिन यांच्याऐवजी हे तेल वापरावे.
३) बुरशी व जंतुसंसर्ग
खोबरेल तेलामध्ये क्रॅप्रिलिक आम्ल नावाचा एक घटक असतो. यामुळे सर्व प्रकारची बुरशी मरते. म्हणूनच जेव्हा त्वचेवर असा बुरशीचा संसर्ग होतो, तेव्हा त्याठिकाणी खोबरेल तेल लावावे. बुरशीच्या अशा संसर्गामुळे त्यात्या ठिकाणी चट्टे येतात.
आग होते, खाजही प्रचंड प्रमाणात असते. असे संसर्ग सहसा जांघेचा भाग, काखा, कपड्यांचे इलॅस्टिक व नाडी ज्या ठिकाणी असते तेथे, तसेच घाम जिथे जिथे अधिक प्रमाणात येतो त्यात्या ठिकाणी होतो.
स्त्रियांच्या योनीमार्गातही असा संसर्ग होतो. अशावेळेला जे खोबरेल तेल वापरावयाचे असते ते शुद्ध असावे. रिफाइण्ड किंवा रंग टाकलेले असे तेल याकरिता उपयोगी पडत नाही.
४) अपचन – पोटाच्या तक्रारी
खोबरेल तेलामध्ये पाचक हा गुणधर्म आहे. म्हणजेच ज्यावेळेस अपचनाचे त्रास उद्भवतात त्या वेळेस हे तेल उपयोगी पडते. काही जणांचा अग्नी मंद असतो आणि त्यामानाने अधिक खाणे झाले तर अपचन होते. वारंवार बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात.
अनेकांना जंकफूडची सवय जडलेली असते. अशा सगळ्या कारणांनी अपचन होते. अन्नामध्ये पुरेसे पाचक स्त्राव मिसळत नाहीत. अन्न खूप वेळा एकाच ठिकाणी पडून राहतं, त्यात मग फस्फसण्याची क्रिया होऊन वायू तयार होतो.
हा वायू पोटात साठून पोट फुगते. पोटात वेदना होतात. अशावेळेला दोन छोटे चमचे भरून खोबरेल तेल पोटात घ्यावे. दर ३-४ तासांनी दिवसातून ४ वेळेला हा प्रयोग करावा. या तेलाने अपचनाचे सर्व आजार दूर होतात.


