Skip to content

आशेचं फुल कोमेजू देऊ नका, जीवनात रंग भरा !!

आशेचं फूल


माधुरी पळणीटकर | ९४२२६०२७६८


अंत कुठल्याच प्रवासाला नाही, ना आशेच्या ना जीवनातल्या मोह-मायेच्या..! प्रत्येक जीव आशेवर जगतो. दु:खाचे आघात पचवतो. सुखवर्षावाच्या आशेवर नाती जपतो. प्रेमवर्षावाच्या आशेवर, कष्टाचे डोंगर उपसतो. भाकरीच्या आशेवर वर्तमानातले कडू विषारी घोट पचवतो.

भविष्यरुपी अमृताच्या आशेवर छोट्या लेकरांना आधार देतो, ते आधार होतील या आशेवर. खरंच आशा म्हणजे जीवनाचा पायाच… पण अध्यात्म सांगतं ‘आशा’ म्हणजे समूळ दु:खाचं कारण. आशा पूर्ण नसली की निराशा. मग येतं दु:ख. पण आपण आशा धरून निराशाही पचवायची तयारी केली तर? म्हणजे सुखाबरोबर दु:खाचीही तयारी ठेवली तर?

तुम्ही सर्वांनी अनेक प्रकारची सुंदर सुंदर फुलं पाहिली असतील. ‘फूल’ म्हणजे ईश्‍वराने निर्माण केलेली निसर्गातील सुंदर गोष्ट. प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं आणि गंधही वेगळा! फूल म्हणजे प्रेमाचं प्रतीक! कारण प्रेमासारखी आणि फुलासारखी सुंदर गोष्ट जगात नाही.

मोगरा, गुलाब, जाई-जुई, रातराणी अशी कितीतरी फुलं…पण सर्वच मनमोहक, हृदयात सुगंध निर्माण करणारी. तुम्ही आम्ही सुध्दा त्या फुलांसारखेच प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायचा. पण तुम्ही कधी आशेचं फुलं पाहिलंय?

जीवनातील ‘आशा’ म्हणजे एक फुलच आहे, असं मला वाटतं. ज्यांच्या हृदयात कुठल्याच गोष्टीबद्दल कधीही आशा जागृत झाली नाही, असा माणूस आहे? लहानपणापासून आपण या आशेच्या हिंदोळ्यावर झोके घेतो आणि नंतर हीच आशा आपल्या आयुष्याच्या वळणाची डोर बनते.

मग फक्त आपण पुढे पुढे यशस्वी होण्यासाठी चढत राहतो. कधी कधी तर आशेचा हा रस्ता समाप्त होणार आहे का? याचं उत्तर आपल्यालाही मिळत नसतं. पण केवळ सवय झाली म्हणून चढत रहायचं. निराशा आली की परत खाली यायचं. म्हणजे अंत कुठल्याच प्रवासाला नाही, ना आशेच्या ना जीवनातल्या मोह-मायेच्या!

आशा पूर्ण नसली की निराशा. मग येतं दु:ख. पण आपण आशा धरून निराशाही पचवायची तयारी केली तर? म्हणजे सुखा बरोबर दु:खाचीही तयारी ठेवली तर? अशा खिलाडूवृत्तीने मन दु:ख पचवण्यास खंबीर होईल. मग जर सुखद फळं पदरी आली तर आनंदच होईल, नाही का?

म्हणजे ना आयुष्याच्या दोरीत आशेची फुलं अलगद ओवायची. पण हार करताना एखादं फुलं निसटलं तर दुसरं फूल लगेच ओवायचं. हार शेवटपर्यंत पूर्ण करायचा ओवण्याचे प्रयत्न न सोडता. पण हार किती लांब ठेवायचा याचंही भान ठेवायचं.

कारण आशा-आकांक्षांची फुलं अगणित असतात. पण नियंत्रण आपल्या हातावर किंबहुना आपल्या मनावर हवं. कारण कधीकधी दोरी संपते. मग चाल निसटते. म्हणून आपल्या इच्छा, आशा सीमित ठेवायच्या. समाधानाचा दोर घट्ट असला तर हार कधीच तुटणार नाही. मग हा हार परमात्म्याच्या गळ्यात भक्तिभावाने घाला. त्याक्षणी परमात्म्याची तेजस्वी मूर्ती तुम्हाला अजूनच तेजस्वी दिसेल.

आपण प्रयत्न करताना नाही थकायचे. रोज झोपताना उद्याचे स्वप्न बघत झोपायचे आणि सोनेरी पहाट झाल्यावर त्या आशेच्या पूर्णत्वासाठी शरीराने, मनाने दिवसभर झटायचे, हेच तर जीवन आहे.

मग ही आशेची फुलं मिळण्यासाठी तुम्हाला काट्यांचाही सामना करावा लागतो. एखादा काटा घुसतो. रक्तही येतं. कारण काट्याचा गुणधर्मच तो असतो. आपणच आपले पाय मजबूत करायचे. पण पुढे पुढे चालत रहायचे.

मग तुम्हाला कितीतरी आशांची फुलं स्पर्श करतात. ती ओंजळीत घ्यायची. कितीतरी जीवनातल्या गोड आठवणींचा सुगंध या फुलांमध्ये असतो. त्याचा सुगंध घेऊन पुढे जायचे.

पण काटा घुसला म्हणून थांबायचं नसतं. रक्त आलं तरी विसरून जायचं, जिद्दीने पुढे जायचं आणि अशी आशांची रंगीबेरंगी फुले घेऊन जीवनाचं सौंदर्य खुलवायचं.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आशेचं फुल कोमेजू देऊ नका, जीवनात रंग भरा !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!