सलग काम करण्यापेक्षा अधून-मधून ब्रेक घ्या !!
टीम आपलं मानसशास्त्र
तुम्ही एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करत असाल, तुम्ही सेल्स मार्केटिंग मध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून काम पाहत असाल, तुम्ही रोजची रोजनदारी वर मेहनत करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल अशा कोणत्याही स्वरूपाची कामे करताना मध्ये ब्रेक घेणे फार गरजेचे आहे.
तुमच्या कामाचे स्वरूप कसे हि द्या, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी बसून मानसिक ऊर्जा खर्च करावी लागत असेल किंवा तुम्हाला शारीरिक ऊर्जा जास्त वापरावी लागत असेल किंवा मानसिक आणि शारीरिक अशी दोन्हीही स्वरूपाची कामे तुम्ही करत असाल आणि मध्ये जर ब्रेक घेत नसाल तर तुमच्या कामाची गती हि मंदावते.
तुम्हाला लवकर आळस-कंटाळा येऊ लागतो. आधीपेक्षा त्या कामात लक्ष एकाग्र होत नाही, केवळ ठरलेलीच कामे तुमच्याकडून घडून घेतील, एखादे काम नावीन्यतेने तुम्हाला करता येणारच नाही.
यामागे मुख्य कारण आहे, कि ते काम तुम्ही सलग करत आहात. आपल्या मेंदूला सलगपणे काम करण्याची सवय नसते. कुठेतरी मध्ये ब्रेक हा लागतोच. तुम्ही जेव्हा सुरुवातील एखादे काम हाती घेता त्यावेळी जी काही मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकवटलेली असते, ती पुढे हळूहळू कमी-कमी होत जाते.
म्हणजेच दुपारपर्यंत महत्वाची कामे करण्यासाठी हवी तेवढी ऊर्जा शिल्लक नसल्याने तुमच्याकडून क्षुल्लक चुका घडून येतात. तुम्ही जेव्हा मेंदूला ब्रेक देता, रिलॅक्स होता, मस्त एक अर्ध्या तासाची झोप घेता आणि मग कामाला लागता तेव्हा आधीसारखीच ऊर्जा पुन्हा एकवटते आणि तुमच्या कमला पुन्हा गती मिळते.
ऑफिसमध्ये ८ तास बांधून राहावं लागत असेल तर अधून-मधून ब्रेक घेणे आवश्यक असते. लंच ब्रेक असतोच. शिवाय टी-ब्रेक सुद्धा घ्यावा. पण त्यावेळी चहा जागेवर बसून घेऊ नका. मेंदू रिलॅक्स करण्यासाठी हा ब्रेक असतो. या काळात मेंदू हाती घेतलेल्या कामासंदर्भात शटडाऊन करा आणि चार्ज करून पुन्हा रिस्टार्ट करा. त्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
मेंदू सतत काम करत असल्यामुळे कधी-कधी तो थकून काम करायला नकार देतो. अशावेळी मेंदूला शांत करणे हा उपाय असतो. मेंदू शांत ठेवणे म्हणजे शांत बसून राहणे हा उपाय नसतो तर त्या काळात तुम्हाला जे आवडतं ते करा.
मित्रमैत्रिणींना भेटा. त्यांच्याशी छान गप्पा मारा. मन चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा. एकटेच दूरपर्यंत चालत जा. स्वतःशी चांगल्या गप्पा मारा, गाणी म्हणा, गाणी ऐका, एखादा चित्रपट बघा. तुम्हाला आवडतं ते सर्व करा. फक्त अतिविचार करणे थांबवा, म्हणजे वैचारिकरित्या शटडाऊन व्हा.
असे केल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल, आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे मेंदूवर तसेच मनावर ताण येतो. हा आलेला ताण तुम्हाला शिथिल करायचा आहे. यासाठी मेंदू ज्या गोष्टीमुळे रिलॅक्स होईल त्या गोष्टी कराव्यात.
कारण मेंदू सतत कार्यरत राहिल्याने तो हँग होतो. तेव्हा शटडाऊन करून रिस्टार्ट करा. मेंदूची बॅटरी चार्ज करा. सर्व विचार बाजूला ठेवा, शांत व्हा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. अनेकदा असे घडते कि मनासारखी परिस्थिती नसते. कधी एकटेपणा जाणवतो, कशातच मन लागत नाही.
काहीच करावेसे वाटत नाही. अशावेळी निराश होऊन परिस्थिती बदलणार नसते, त्यावेळी सर्व कामं बाजूला ठेऊन आवडत्या गोष्टीत मन रमवा. त्यामुळे तुमच्यात पुन्हा उत्साह येईल.
जगणं रिस्टार्ट करा, नव्याने कामला सुरुवात करा. जुनं सर्व विसरा. तुम्हाला कामाचा हुरूप येईल , आयुष्यात थांबलो कि आपण तिकडेच अडकून पडतो. कारण आपण मेंदूला ब्रेकच दिलेला नसतो. म्हणून अधून मधून ब्रेक घ्यायला हवा. ब्रेक घेऊन पुन्हा नव्याने सुरुवात करा. त्यानंतर बघा तुम्हाला किती उत्साह जाणवेल आणि नवा हुरूप येईल.


