Skip to content

‘अपचन’ वारंवार होत असल्यास हे घरातले उपाय करून बघा !

‘अपचन’ वारंवार होत असल्यास हे घरातले उपाय करून बघा !


हरी कृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


आज घरातल्या प्रत्येक व्यक्तीला कधीना कधी अपचनाचा त्रास हा होतोच. खाण्याची एखादी वेळ चुकल्यास, झोपण्याच्या वेळा बदलल्यास आणि रोजच्या पेक्षा एखादे अवजड पदार्थ खाण्या-पिण्यात आल्यास व्यक्तीला दुसऱ्या दिवशी अपचन होते.

हि बाब शास्त्रानुसार सामान्य मानली जाते. ज्यांचे अपचन कधीतरी घडून येते. परंतु यामधल्या काहींना तर एखादे हलके पदार्थ खाल्ले तरी पचत नाही. पोटात गॅस होतो, पित्त उसळते. म्हणजे कोणतेही पदार्थ जरी खाल्ले तरी त्यांचे पोट हे ते पदार्थ स्वीकारत नाही.

वरील दोन्ही प्रकारामध्ये म्हणजे सामान्य आणि विशिष्ट प्रकार जरी असला तरी यासाठी आपण घरच्या घरी अपचनावर सहज मात करू शकतो. त्या अगोदर त्याची कारणे आणि लक्षणे समजून घेऊया…

कारणे आणि लक्षणे

पोटात दुखणे, जेवल्यावर पोट फार भरल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ, भूक न लागणे, मळमळणे किंवा उलटी होणे, पोटात वायू धरल्यामुळे पोट गुबर होणे हि अपचनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. अपचनात उलटी झाल्यास खूप आराम मिळतो. उलटीला आंबट वास येतो.

तोंडाला चव नसते, जिभेवर पांढरा थर आणि तोंडाला वास येणे हि लक्षणेही अपचनाचीच आहेत. काही वेळा घशात आवळल्यासारखे वाटते. अपचनाच्या विकारात बहुतेक वेळा रोग्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

अति खाणे, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकाच वेळी खाणे, घाईघाईने जेवणे, चांगले न चावता, तोंडात घास न घोळवता जेवणे हि अपचन होण्याची मुख्य कारणे आहते. वाजवीपेक्षा जास्त खाल्याने पोट, जठर, मूत्रपिंड आणि आतडी यांना आपापले काम करणे कठीण होते.

त्यामुळे पोटातील अन्न कुजते आणि त्यातील रोगकारक वा विषारी पदार्थ रक्तात शोषले जातात. पर्यायाने सर्व शरीरभर हे विष पसरते. काही पचायला जड असे पदार्थ नीट उकडले गेलेनाहीतर अपचन होते.

तळलेले, मसालेदार पदार्थ, सतत धूम्रपान करण्याची सवय, मद्यपान, बद्धकोष्ठता, जेवताना पाणी पिण्याची सवय, निद्रानाश, दुसऱ्याबद्दलची आसुया, भिती किंवा राग अशा भावना आणि व्यायाम न करणे हि अपचनाची इतर कारणे असू शकतात.

उपचार पाहूया..

लिंबू :

अपचनाची तक्रार घालविण्यासाठी फळांचा चांगला उपयोग होतो. नेहमी फळे खाल्यामुळे न पचलेले अन्न, तसेच पोटात साठलेला मळ शरीराबाहेर काढून टाकला जातो. शिवाय पोटाची बिघडलेली घडी पूर्ववत करण्यास फळांची मदत होते.

अपचनावर लिंबू हे फार उपयुक्त आहे. लिंबाच्या रसामुळे पोटातील आम्ल तयार करण्याऱ्या जीवाणूंना प्रतिबंध केला जातो. आम्ल आणि इतर अपायकारक पदार्थ यांना पोटातून काढून टाकण्यास लिंबाच्या रसाचा उपयोग होतो.

त्यायोगे अपचनही कमी होते आणि रोग्याला चांगली भूक लागते. दिवसातून दोन वेळा सकाळच्या आणि रात्रीच्या जेवणा अगोदर लिंबूपाणी अवश्य प्यावे.

द्राक्षे :

द्राक्षे खाणे हा अपचनावरील उत्तम उपाय आहे. द्राक्ष हे पचायला हलके फळ आहे. रोज २५० ग्राम द्राक्षे खाल्ल्याने अपचन कमी होते, तसेच पोटातील दाहही शमतो.

अननस :

अपचनाच्या उपचारासाठी अननस हे उत्तम फळ आहे. अननस पचन संस्थेतील दोष कमी करण्यास मदत करणारे उत्तम शक्तिवर्धक आहे. जेवणानंतर रोज अर्धा पेला अननसाचा रस प्यावा.

डाळिंब :

अपचनामुळे येणारी भोवळ कमी करण्यासाठी एक मोठा चमचा डाळिंबाचा रस आणि मध एकत्र करून हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यावे. डाळिंबाचे दाणे, थोडे शेंदेलोण आणि मिऱ्यांचे पूड एकत्र करून खाल्ल्याने पोटाला ते शक्तिवर्धक ठरते.

गाजर :

अपचन कमी होण्यासाठी गाजर खावे. कच्चे गाजर बारीक चावून खाल्ल्याने तोंडात लाळ सुटते आणि पचनाला उपयुक्त अशी विकरे, क्षार आणि जीवनसत्वे यांचा पुरवठा होतो. अर्धा पेला गाजराच्या रसात तेवढेच पाणी घालून हा रस दिवसातून एकदा प्यावा.

मेथी :

मेथीची ५० ग्राम पाने उकळवून लोण्यात परतावी आणि खावी. त्यामुळे पित्ताचे शमन होते. मेथ्यांचे दाणेही अपचन घालविण्यास मदत करतात.

पुदिना :

पुदिन्याचा रस हा उत्तम क्षुधावर्धक आहे. एक लहान चमचा पुदिन्याचा रस आणि तेवढाच मध आणि लिंबाचा रस एकत्र करून हे मिश्रण प्यावे. त्यामुळे पोटाच्या अपचनाच्या तक्रारी कमी होतात. शिवाय गॅसेसही कमी होतात.

ताक :

एक पेला पातळ ताक त्यात पाव चमचा मिरपूड घालून प्यावे. हा अपचन दूर करण्याचा फार सोपा उपाय आहे. अजून चांगला परिणाम होण्यासाठी पाव चमचा जिऱ्याची पूड घालावी.

बडीशेप :

अपचनाच्या उपचारांत बडीशेप उपयोगी पडते. एक लहान चमचा बडीशेप एक कप उकळत्या पाण्यात घालावी. हे पाणी रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी बडीशेपेचा अर्क उतरलेले ते पाणी गाळून मध घालून प्यावे.

आहार

अपचन झाल्यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे फक्त फलाहार घेण्यास सुरुवात करावी. पाच दिवसांनी हळूहळू संतुलित जेवण घेण्यास सुरुवात करावी. त्यात ताजी फळे, कच्च्या व उकडलेल्या भाज्या, कडधान्ये, सुकी फळे आणि पूर्णांश धान्ये असावी.

इतर उपाय

अपचन झालेल्या व्यक्तीने काही पथ्ये जरूर पाळायला हवीत. ती म्हणजे खाणे आणि पिणे एकाच वेळी करू नये. घाईघाईने जेवू नये. एकाच वेळी पोटभर जेवू नये. काळजीत असताना, दमल्यावर, मनःस्थिती चांगली नसताना जेवू नये. भूक वाटत नसेल तर काही खाऊ नये.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!