प्री-मॅरेज कॉऊन्सिलिंगची खरंच गरज आहे का ?
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
प्रत्येक व्यक्ती हि आपल्या होणाऱ्या जोडीदाराकडून उत्तम मानसिक आणि शारीरिक सुखाची अपेक्षा करीत असते. स्त्रियांना एकवेळेस शारीरिक सुख मिळाले नाही तरी ती तिच्या व्यक्तिगत पातळीवर मोठ्या प्रमाणात तडजोड करू शकते. परंतु मानसिक समाधानच पूर्णपणे उध्वस्त असल्यास ती त्याठिकाणी अजिबात तडजोड करत नाही.
तिला मानसिक समाधान मिळत नसण्याच्या मागे काय एकट्या पुरुषाची अजिबात चूक नसते. तुमचे आत्मिक हेवेदावे, समजून घेण्याची वृत्ती, योग्य स्पेस, काळजी, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये महत्वाच्या भूमिका बजावत असतात.
म्हणजेच तुमच्या विवाहरूपी संसारात जर ठिणगी पेटली किंवा आपण असा विचार करू कि तुम्ही दोघेही समाधानी आयुष्य जगत असाल तर याठिकाणी जे काही क्रेडिट जाईल ते एकट्याला नव्हेच. इथे दोघांचीही वाटणी हि ५०-५० टक्केच राहील.
मग असा जोडीदार कोठे सापडेल जो निदान शंभर नाही पण पन्नास टक्के तरी जबाबदारी घेईल ?? या प्रश्नाचे उत्तर सहसा देणे कोणत्याही तज्ञाला शक्य नाही किंवा ढोबळ उत्तरे शक्यतो हि तज्ञ मंडळी टाळणारच.
कारण तुम्हांला मिळणारा जोडीदार हा कसा आहे, यासाठी तुम्हालाच त्या व्यक्तीच्या बरोबर मोकळेपणाने पुष्कळ क्षण घालवावे लागतील. काही जोडप्यांना विवाहाची ५० वर्षे लोटलेली असतात, तरी देखील एकमेकांविषयी बऱ्याच संकल्पना या अर्धवटच असतात.
मला जोडीदार कसा मिळेल ? यापेक्षा मिळालेल्या जोडीदारासोबत मी उत्तम समाधानी जीवन कसे घालवू शकते किंवा शकतो, यावर प्री-मॅरेज कॉऊन्सिलिंग हि शास्त्रीय प्रक्रिया काम करते.
हि प्रक्रिया तुम्हाला बोट दाखवून योग्य जोडीदार अजिबात मिळवून देत नाही. तर तुमच्या वाढीव अपेक्षा, अवास्तव विचार आणि तुम्ही अतिरंजक रीतीने तयार केलेलं जोडीदाराबद्दलचं भावविश्व या सगळ्या भावनांना, विचारांना आणि तुमच्यातल्या काही कृतींना वास्तव रूप कसे मिळेल, यासाठी हि प्रक्रिया काम करत असते.
मग प्रश्न इथे असा आहे कि, प्रत्येकाने प्री-मॅरेज कॉऊन्सलिंग करायला हवी का ?
तर याचं उत्तर होय असेल. कारण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारे अनेक तरुण-तरुणी आजही आपल्या जोडीदाराबद्दल ग्लॅमर अपेक्षा ठेऊन आहेत. जोडीदारामधल्या अशा अनेक वेगळ्या गोष्टींसोबत अड्जस्ट करण्यापेक्षा ती व्यक्तीच अड्जस्ट करूया, हे पाश्चिमात्य विचार रुजले जात आहेत.
मानसिकरीत्या मिडल फॅमिलीमधले तरुण-तरुणी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीतच अड्जस्ट करत-करत मोठे झाल्यामुळे निदान मिळणाऱ्या जोडीदाराकडे तरी अशी अडजस्टमेन्ट नको, अशी त्यांनी धारणा करून ठेवलेली असते.
तसेच अत्यंत जुनाट विचारातल्या गरीब कुटुंबातल्या तरुण-तरुणींना निर्णय घेण्याची अजिबात सोयच नसते. मोठे वयस्कर सांगतील त्याच ठिकाणी त्यांना आपला विवाह करावा लागतो. काही वेळेस तर लग्नाच्या दिवशीच दोघांनी एकमेकांचा चेहरा पहिल्यांदाच बघितलेला असतो.
अनेक केसेसमध्ये तर तरुण-तरुणींपेक्षा त्यांच्या घरातल्यांनाच किंवा जबाबदार व्यक्तींनाच कॉऊन्सलिंग करण्याची वेळ येते. बदलत्या जीवनशैलीनुसार विवाहाच्या बदललेल्या व्याख्या त्यांना समजावून सांगितल्या जातात.
इथे एक अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे, विवाहाच्या व्याख्या बदलत जरी असल्या तरी प्रेम, विश्वास, केलेली अडजस्टमेन्ट, समजून घेणे, कौतुक करणे, पाठिंबा देणे अशा अनेक गोष्टींच्या एकत्रित समुच्ययाला ज्या विवाहाच्या व्याख्यांमध्ये स्थान नाही, तो विवाह पुढे चालून उध्वस्थच झालेला पाहायला मिळेल.
याच बाबी केंद्रस्थानी ठेऊन विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या जोडप्यांना उत्तम कॉऊन्सलिंग करणे हि काळाची गरज बनली आहे. या गोष्टी दुर्लक्षित करणे म्हणजे एकप्रकारे जोडीदार पाहत नसून तर असा रोबोट हवा आहे जो उत्तम पैसे कमवेन, वंशज पुढे चालण्यासाठी बाळाची उत्पत्ती करेल, हवं तेव्हा लाड करेल, प्रॉपर्टी नावावर करेल वगैरे वगैरे….
रेडिमेट श्रीमंती मिळवलेल्या जोडीदारापेक्षा मेहनती आणि चिकाटी व्यक्तिमत्व तपासणे ज्याची पाळेमुळे भविष्यात एक सुंदर, समाधानी स्वतःचे विश्व बनविण्यात दडलेली आहेत, असा अनुरूप जोडीदार शोधणे केव्हाही उत्तमच!
तरुणांनी एकदातरी लग्नाआधी प्री-मॅरेज कॉऊन्सिलिंगला सामोरे जायला हवं. विवाह या संकल्पनेला एक वास्तव रूप देण्यासाठी….



वाचून खूप रिलॅक्स वाटले