मी डिप्रेशन मध्ये आहे?
सौ. भारती गाडगिलवार
काही दिवसांपासून बालपणीची मैत्रीण कविता हिचे सारखे मेसेजेस येत होते. तसे तर आमच्यात बरीच वर्षे झाली प्रत्यक्ष भेट नाही. पण फेसबुकवर मैत्री आहे. तसे पाहता आम्ही दहावी पर्यंत एकत्र शिकलेलो.
त्यानंतर आमच्या वाटा बदलल्या. तरीही एकाच शहरात राहत असल्याने भेट व्हायचीच. परंतू लग्नानंतर बोलणे खुंटलेच होते. त्यानंतर ती तिच्या संसारात रमली आणि मी माझ्या.
मागच्याच वर्षी आम्ही पुन्हा भेटलो तेही फेसबुकवर. तेव्हापासून सारखे आमच्यात बोलणे सुरु असते. पण गेल्या सहा महिन्यांपासून तीने तिच्या व्यक्तीगत गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. ज्या प्रत्येक घरात घडतात त्याच, त्यात विशेष असे काही नव्हते.
परंतु ती कायम म्हणत, ‘मी खूप डिप्रेशनमध्ये आहे.’ बऱ्याचदा विचारल्यावर सांगितले ते असे की, तीचे पती अमोल हे अत्यंत चिडचिड्या स्वभावाचे आहेत. छोटया छोटया गोष्टींमध्ये रागवत, त्यानंतर वादविवाद होत. त्यातच अमोलच्या पायाला अपघात झाला.
त्यात पाय फ्रॅक्चर झाल्याने महिन्याभरापासून प्लास्टरमध्ये असल्याने त्याची चिडचिड अधिकच वाढली होती. मुलांची देखभाल, अमोलला काय हवं नको ते बघणे याशिवाय सासु सासरे आणि घर व्यवस्थापन यांमुळे ती सुद्धा त्रागा करत.
तिला समजावत म्हटले की, जीवन आहे तर अशा तडजोडी कराव्याच लागतात, त्रागा करण्याने प्रश्न सुटत नाहीत. उलट आपल्याच प्रकृतीवर परिणाम होतो. पण ती ऐकूनच घेत नव्हती. सारखे मेसेजेस करत आपलीच दुःख मांडत असे. यावर तिला मी स्वतः अनुभवलेली एक गोष्ट सांगितली.
जवळपास ६ वर्षांपूर्वी ” प्रिया ” वय वर्षे ४० या एका गुजराती महिलेशी चेन्नई येथे भेट झाली होती. प्रथम भेटीतच ती इतकी मनमोकळेपणाने बोलली की, जाणवलेच नाही की, ती आमची पहिली भेट आहे म्हणून.
ती हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपनासाठी तेथील हाॅस्पिटलमध्ये एॅडमिट झाली होती. प्रत्यारोपन यशस्वी झाले. त्यानंतरही आमच्या भेटी जवळपास ४ वर्षे होत राहिल्या. यादरम्यान तीचा मोबाईल नंबर मी कधीच घेतला नव्हता.
अचानक एक दिवस तिने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मी देखील ऍक्सेप्ट केली. पण मधल्या काळात काही व्यक्तीगत कारणांमुळे आमचे फेसबुकवर बोलणं होत नव्हते. मागच्याच गुढी पाडव्याच्या दिवशी अचानक तिने मेसेज केला की, तिच्या मिस्टरांचा cancer मुळे मृत्यू झाला आहे. ऐकल्यावर तिला कसा धीर देऊ माझे मलाच सुचेना.
मी काही बोलण्या आधीच तिने सांगितले की, ती अहमदनगर येथे एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दोन मुलांसोबत वयोवृद्ध सासुला देखील सांभाळते आहे. सोबतच स्वतःला देखील सांभाळते आहे.
हे ऐकून एक विचार मनात आला की, बरेच लोकं छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा बाऊ करून घेतात. स्वतःला नैराश्यात ओढवून घेतात. कोणताही प्रश्न हा खुप मोठा कधीच नसतो आपण त्याला किचकट स्वरुपाचा आणि मोठा बनवतो. आता हेच बघा ना, प्रिया हिचे हार्ट आणि लंग ट्रान्सप्लांट झालेले आहे.
तिचे जीवन सामान्य लोकांपेक्षा जरा वेगळे आहे. रिजेक्शन चे सावट, आयुष्यभरासाठी औषधांची तजविज करणे, सर्व प्रकारच्या संसर्गापासून स्वतःला वाचविणे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, त्यांच्या करिअरचा विचार, मुलीचे लग्न, सासुची देखरेख हे सर्व एकटीने पेलताना स्वतःला कधीच कमी पडू देत नाही.
प्रियाला असे एकटीने स्वतः आलेल्या परिस्थितीला सामोरे जात जीवनाचा लढा लढताना पाहून प्रत्येकाने प्रेरणा घेण्यासारखे आहे. आपल्या आजूबाजूला अशी कित्येक प्रिया सारख्या व्यक्ती असतात ज्यांच्या संघर्षापुढे आपल्या या छोट्या मोठ्या कुरबुरींचे अस्तित्व तरी काय?
अशा कुरबुरींना आपण डिप्रेशनचे नाव देत म्हणतो की, “मला डिप्रेशन आहे” यास खरेच नैराश्य म्हणता येईल का? हा एक प्रश्नच आहे.
हे सर्वस्वी आपल्यावर आहे की, आपण कोणत्या गोष्टीला कितपत महत्व द्यायचे. प्रियाला माहीत आहे तिच्या जीवनाच्या मर्यादा, म्हणूनच प्रत्येक गोष्टीला काम म्हणून न बघता आवड म्हणून बघितले की, प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतोच.
प्रियाचा अपवाद सोडला तर आपलेही जीवन हे क्षणभंगुरच आहे. पुढचा क्षण कोणते वळण घेऊन येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मग आताच्या या क्षणात कुरबुरी करत बसण्यापेक्षा, आहे तो क्षण आनंदाने कसा जगता येईल याचा विचार केल्यास उत्तर मिळेलच.
मला समजलेला नैराश्याचा अर्थ हाच की, कोणत्याही गोष्टीचा अती विचार करणे, त्याभोवती स्वतःला गुंतवून घेणे, स्वतःवर विश्वास न ठेवणे, मी नेहमीच कमी पडतेय ही भावना म्हणजेच नैराश्य होय. यात व्यक्तीपरत्वे भिन्नता असेलच. पण त्यावर नियंत्रण घालणे देखील आपल्याच हातात असते. पर्याय प्रत्येक गोष्टीला असतात. शोधाल तर सापडेलच!!


