Skip to content

हवी ती ‘स्पेस’ मिळत नसेल, तर तुमचं नातं धोक्यात आहे.

हवी ती ‘स्पेस’ मिळत नसेल, तर तुमचं नातं धोक्यात आहे.


मिनल वरपे


नवरा बायकोचं नात हे घट्ट होते ते त्यांच्यातील संवादाने, एकमेकांवरील विश्वासाने.. संवाद हा एकमेकांना जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो.. संवादामुळे एकमेकांना गृहीत न धरता एकमेकांची मते , आवडी निवडी जाणून योग्य ते निर्णय घेता येतात. आणि विश्वासाचं म्हणालं तर फक्त नवरा बायकोचं च नाही तर कोणतंही नात असो त्यामध्ये विश्वास असेल तरच ते नात उत्तम टिकते..

पण या दोन्ही गोष्टी जरी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी यासोबतच प्रत्येक नात्यात आणि खासकरून नवरा बायकोच्या नात्यात गरजेची असते ती म्हणजे स्पेस..

नात कोणतंही असो पण प्रत्येक नात्यात योग्य स्पेस असणे उत्तमच… येणारा प्रत्येक दिवस येणारा प्रत्येक क्षण हा आपल्याला कायम आनंदच देईल असं होत नाही..

विशेषतः नवरा-बायकोमध्ये स्पेस न देण्याची किंवा न मिळण्याची प्रकरणे ही अधिक असल्याने त्या दोघांचा त्रास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला होतो.

एकमेकांची काळजी घेणे, प्रेम देणे या गोष्टी स्पेस देणे नसून तर ते एक कर्तव्य आहे. आपल्या जोडीदाराला कशाची गरज आहे, तिच्या मूलभत मानसिक गरजा भागल्या जात आहे का, तिला तिचा स्वतःचा हवा तसा वेळ मिळतोय का, तिला तिच्या पद्धतीने काही निर्णय घेता येतायत का ?

वरील या आणि यासारख्या अनेक प्रश्नांत स्पेस ची व्याख्या दडलेली आहे. पुष्कळवेळा अशी स्पेस मिळावी यासाठी दया, अर्चना केली जाते. अशा स्थितीत ती स्पेस जरी मिळाली, तरी तिचा काहीही उपयोग नसतो. म्हणजेच स्पेस मिळण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मोकळी अशी स्पेस हवी.

एकमेकांकडून असणाऱ्या अवाजवी अपेक्षा, एकमेकांवर आपली मते लादणे, मनाला हवं ते आणि अगदी तसेच घडले पाहिजे असा स्वभाव, एकमेकांना गृहीत धरणे अशा एक ना अनेक कारणांमुळे (स्वभावामुळे) कोणत्याही नात्यात तणाव, भांडणे निर्माण होत असतात.

सतत होणाऱ्या मतभेदांमुळे, रुसवेफुगवे यामुळे नात्यातला गोडवा कमी होत जातो.. यासाठीच प्रत्येक नात्यात हवी असते ती स्पेस.. जेव्हा वाद/ भांडण होतात त्यावेळी आपला आपल्या रागावर ताबा नसत ..

आपण रागाभरात काय बोलतोय काय वागतोय याचे आपल्याला भानच उरलेलं नसते.. रागात आपण समोरचा किती दुखावला जातोय याकडे लक्षच देत नसतो..रागात असताना मीच खरा आहे,माझच वागणं योग्य असं मनात ठेवून कमीपणा मी कशाला घ्यायचा अस ठरवून वाद हा वाढतच जातो..

मी रागात आहे,मी दुःखात आहे आणि आता या क्षणाला माझा राग,माझ्याच भावना महत्त्वाच्या असाच विचार आपण करतो आणि काहीवेळेस आपण रागात अस काही बोलून जातो ज्यामुळे समोरच्याला ते आयुष्यभरासाठी लक्षात राहील आणि त्यामुळे नात्यात कटुता निर्माण होते.

पण जर अशावेळी आपण रागात मनातल्या कोणत्याच भावना व्यक्त न करता..शब्दाला शब्द न देता.. त्यावेळी जास्तीत जास्त कस शांत राहता येईल यासाठी प्रयत्न केला तर उत्तमच..

घरात होणाऱ्या वादांमधे एकमेकांच्या भावनांचे कोणतेच मूल्य राहत नाही..घरातलं वातावरण अजिबात उत्साही राहत नाही.. नेहमी होणाऱ्या भांडण/वाद यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात..

पण अशावेळी आपण एकमेकांना स्पेस दिली तर नात्यात कटुता न वाढता हळूहळू मनातला राग शांत होऊन, आपलं काही चुकतेय का? हा विचार करून तसेच आपण इतकं अहंकारी न राहता कमीपणा घेतला तर असे चांगले विचार मनात येऊन ते कृतीमध्ये यायला वेळ लागणार नाही..

तुमच्यातली स्पेस ही जितकी चांगली, जितकी योग्य तितके तुमच्या दोघांमधील मानसिक आणि शारीरिक संबंध हे कायम आनंद देणारेच असतील.

म्हणून एकमेकांची स्पेस ओळखा!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “हवी ती ‘स्पेस’ मिळत नसेल, तर तुमचं नातं धोक्यात आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!