मधुमेहाला कंटाळलात ना…, वाचा हे घरगुती उपचार.
हरी कृष्ण बाखरू
(निसर्गोपचार तज्ज्ञ)
रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढते आणि हि वाढलेली साखर लघवीतून जाऊ लागते. ह्या लक्षणांवरून एखाद्या व्यक्तीला मधुमेह झाल्याचे समजते. शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होऊ लागते. त्यामुळे चयापचयात अडथळे निर्माण होतात.
मधुमेह झाला आहे कि नाही, ओळखण्यासाठी रुग्णाची अनशेपोटी रक्तातील साखरेची पातळी मोजतात. ती साधारणपणे प्रत्येक १०० मि. ग्रॅ. रक्तात ८० ते १२० मि. ग्रॅ. असते आणि जेवल्यानंतर दोन तासांनी रक्तातील साखर मोजल्यावर प्रत्येक १०० मि. ग्रॅ. रक्तातील पातळी १६० मि. ग्रॅ. पर्यंत जाते. या पातळीपेक्षा जास्त साखर आढळल्यास मधुमेह झाला असल्याचे समजावे. वृद्धांमध्ये हा रोग जास्त करून आढळतो.
मधुमेहाची कारणे आणि लक्षणे पाहूया..
मधुमेही व्यक्तीला सारखी तहान आणि भूक लागते. वजन वाढते. ही शरीराने आणि मनाने लवकर थकते. फिकट दिसू लागते. मधुमेही व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. त्याचे पोट साफ राहत नाही. जननेंद्रियांपाशी खूप खाज सुटते. नदीचे ठोके वाढतात.
अनियंत्रित खाणे आणि लठ्ठपणा या दोन कारणांनी मुख्यत्वेकरून मधुमेह होतो. केवळ जास्त साखर आणि प्रक्रिया केलेली कर्बोदके खाल्ल्याने शरीराला हानी पोचत नाही, तर स्निग्ध, प्रथिनयुक्त आहार घेतल्याने शरीरात जास्तीची साखर तयार होते.
परिणामी मधुमेह होऊ शकतो. दुःख, काळजी, चिंता या भावनांनी शरीराच्या चयापचयावर वाईट परिणाम होतो. त्यातून लघवीत साखर येऊ शकते.
यावर उपचार काय ?
कारले :
मधुमेह नियंत्रणाखाली आणण्यासाठी कारल्याचा घरगुती उपचार सर्वात उत्तम लागू पडतो. कारल्यामध्ये इन्सुलिनसारखा ‘प्लॅटिशुलिन’ नावाचा पदार्थ तयार होतो. त्यामुळे रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यासाठी मधुमेही व्यक्तींनी आपल्या आहारात कारल्याचा उपयोग जास्त करावा.
चांगला फायदा होण्यासाठी या व्यक्तींनी सकाळी अनशेपोटी चार ते पाच कारल्यांचा रस रोज प्यावा. कारल्याच्या बियांची पूड आहारात वापरावी किंवा कारल्याचे तुकडे पाण्यात उकडून त्याचा काढा करून प्यावा.
आवळा :
आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर असते. त्याचा चांगला उपयोग मधुमेहींना होतो. एक चमचा आवळ्याचा रस आणि एक कप कारल्याचा रस एकत्र करून दोन महिने रोज प्यावा. स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहान्समधील बीटा पेशींमधून इन्शुलिन स्रवण्यासाठी या रसाचा चांगला उपयोग होतो आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
जांभूळ :
मधुमेहावर औषध म्हणून जांभूळ हे फळ फार पूर्वीपासून उपयोगात आणले जात आहे. मधुमेहावर याचे फळ आणि बी दोन्ही आहेत. जांभळाच्या बियांमध्ये ‘जांबोलीन’ नावाचा ग्लुकोजचा प्रकार असतो. शरीरातील साखर वाढलेली असेल तर जांबोलींमुळे पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर करण्यास अटकाव केला जातो.
जांभळाच्या बिया वाळवून त्यांची पूड करावी. दिवसातून दोनदा एक चमचा पूड एक कप दुधात किंवा पाण्यात किंवा अर्धा कप दह्यात मिसळूनळणं खावी.
जांभळाच्या झाडाची अंतर्सालही मधुमेहावर वापरतात. जांभळाची साल वाळवून जाळतात. त्याची पांढऱ्या रंगाची राख बनते. हि राख मिक्सरमधून काढून, गाळून बाटलीत भरून ठेवावी. १० ग्रॅम जांभळाची राख पेलाभर पाण्यात मिसळून मधुमेही व्यक्तीला अनशेपोटी हे पाणी प्यायला द्यावे. दुपारी २० ग्राम व रात्री जेवणानंतर एक तासाने पुहा हि राख खावी. चांगला उपयोग होतो.
आवळ्याची पूड, जांभळाची पूड आणि कारल्याची पूड समभाग एकत्र करून खाल्ल्यानेही चांगला गुण येतो. दिवसातून एकदा किंवा दोनदा एक चमचाभर मिश्रण खावे. साखरेचे प्रमाण पाहून मिश्रणाचा डोस कमी-जास्त करावा.
बेदाणे :
मधुमेही व्यक्तीच्या आहारात बेदाणे फार उत्तम काम करतात, तसेच वरचेवर बेदाणे खाल्ल्याने मधुमेहाचे प्रमाण बरेच कमी होईल, असे सांगितले जाते. मधुमेह असेल तर ३-३ बेदाणे दिवसातून तीनदा खावेत आणि मधुमेह नसेल तर, परंतु होण्याची शक्यता असेल तर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीही दिवसातून तीन बेदाणे खावे.
मेथ्या :
मेथीच्या बिया मधुमेहींसाठी फार उपयुक्त आहेत. २५ ग्राम ते १०० ग्राम मेथ्या मधुमेहीने विविध स्वरूपात रोज खाल्ल्याने त्याचा ‘हायपरग्लायकॅमिया’ कमी होतो. तसेच मेथ्या चावून खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज, सेरम कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लीसेराइड्स यांची पातळीही कमी होते.
हरभरे :
म्हैसूर येथे असलेल्या सेंट्रल फुल टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे हरभऱ्यावर बरेच संशोधन केले आहे. हरभरे भिजत घातलेले पाणी प्यायल्याने रक्तातील साखर अधिक प्रमाणात वापरली जाते. हि गोष्ट मधुमेहीला आणि मधुमेह नसलेल्या व्यक्तीलाही लाभदायक आहे.
या संस्थेत बऱ्याच वर्षांपासून मधुमेह झालेल्या व्यक्तींवर प्रयोग केले. त्यांची रोजची इन्शुलिनची गरज ४० युनिट्स होती. त्यांच्या आहारात हरभऱ्याच्या पाण्याचा सढळ वापर केला आणि रोग्यांच्या लघवीची तपासणी केली.
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. त्यांची इन्शुलिनची गरज चाळीसवरून वीस वर आली होती. रक्तातील ग्लुकोजच्या पातळीतही समाधानकारक सुधारणा दिसली.
आंब्याची पाने :
आंब्यांच्या झाडांची कोवळी पाने मधुमेहावर गुणकारी ठरतात. १५ ग्राम आंब्याची कोवळी पाने दीड कप पाण्यात रात्रभर भिजवावी. सकाळी त्याच पाण्यात पाने कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे. रोज सकाळी असे पाणी प्यायल्याने लवकर निदान झालेला मधुमेह नियंत्रित होतो.
दुसऱ्या पद्धतीने आंब्याच्या पानांचा उपचार करता येतो. त्यासाठी कोवळी आंब्याची पाने सावलीत वाळवावी. त्यांची पूड करून ठेवावी आणि गरज पडेल त्याप्रमाणे ती वापरावी. दिवसातून दोनदा अर्धा चमचा पूड खावी.
पार्सलेन :
पार्सलेनच्या एक चमचा बिया अर्धा कप पाण्याबरोबर घ्याव्या. हा उपचार तीन ते चार महिने करावा. त्यामुळे शरीरातील इन्शुलिन वाढते आणि मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.
इतर भाज्या :
कारल्याखेरीज वाल, काकडी, कांदा आणि लसूण मधुमेहींनी मुद्दाम खावी. वाल पाण्यात टाकून उकळवावे. हे वालाचे पाणी प्यायल्याने फार उपयोग होतो.
आहार
मधुमेहीने आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावी. त्यांनी दुधजन्य शाकाहारी, कमी उष्मांकांचा, कमी पिष्टमय पदार्थ असलेला अल्कलीयुक्त आहार घ्यावा. आहारात नैसर्गिक रूपातील पदार्थ जास्त असावे. पूर्णांशी धान्ये, फळे, सुका मेवा, भाज्या आणि दूध, दही, ताक हे पदार्थ भरपूर खावे. न शिजवलेल्या भाज्या खाल्ल्याने स्वादुपिंडाला चालना मिळून इन्शुलिनची निर्मिती वाढते. घरगुती लोणी, दही, ताक या पदार्थांतून शरीराला प्रथिने मिळतात.
इतर उपाय
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची सवय ठेवावी. तासभर चालणे हा सर्वात सोपा आणि बिनखर्चाचा व्यायाम आहे. कमी दमणूकीचे खेळ, जॉगिंग, पोहणे हे व्यायाम जरूर करावे. भुजंगासन, शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन, हलासन आणि शवासन हि आसने केल्याने चांगला उपयोग होतो.