Skip to content

आयुष्यात जे काही घडतं, ते केवळ प्रसंगच असतात !!

आयुष्यात जे काही घडतं, ते केवळ प्रसंगच असतात !!


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


समिधा हि आजही त्या प्रसंगाला विसरू शकत नाही. आजही तो प्रसंग कधी आठवूच नये, असे तिला वाटतं. ज्या-ज्या वेळी तो प्रसंग समोर येतो त्या त्या वेळी तिची अस्वस्थता हि वाढत जाते. काही वर्षाआधी समिधाची आई हार्ट अटॅकने मृत्यू पावली. तो प्रसंग तिच्या इतक्या जिव्हारी लागला कि आजही ती वास्तवात जगताना दिसत नाहीये.

कृणालच्या बाबतीतही काही वर्षाआधी असंच घडलं. त्याचे बाबा कार ऍक्सीडेन्टमध्ये मृत पावले. त्यावेळी कृणाल सुद्धा त्या कार मध्ये होता. त्यांच्या जागी मी गेलो असतो तर बरं झालं असतं, असं तो आजही म्हणतो. तो प्रसंग आठवून तो ढसाढसा रडतो.

मीनाक्षी तिच्या बालपणीचा प्रसंग अजूनही विसरू शकत नाहीये. कशा रीतीने तिच्या शेजारच्या काकाने तिला खेळणी देण्याच्या हेतूने घरी एकटी बोलावली आणि नको-नको तिकडे स्पर्श केला. मीनाक्षीच्या वडिलांना हा प्रकार कळल्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर झालेली मारामारी, हे असं आठवून अजूनही तिला धस्स होतं.

कपिल एकेदिवशी बसने प्रवास करत असताना अचानक बसच्या समोर एक बाई आणि तिचा मुलगा चिरडले गेले. हे कपिलने खुद्द उघड्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा पासून कपिलला रात्री शांत झोप लागत नाहीये. ती बाई आणि तिचा मुलगा अजूनही त्याच्या स्वप्नात येऊन बसमध्ये त्याच्या बाजूला बसलेले दिसतात.

अरुणाला लग्नाची फार भीती वाटते. एखाद्याचे लग्न जवळ आले, म्हणजे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तर तिची भीतीची तीव्रता वाढत जाते. या जगात कोणी लग्न करूच नये असे ती सर्वांना सांगत सुटते. यामागची करणे तपासली असता असे दिसले कि, एकदा अरुणा चाळीतल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली असता त्याच दिवशी तिच्या वडिलांनी अरुणाच्या आईला संशयावरून जाळून टाकली. तेव्हापासून तीला लग्नाबद्दल तिटकारा वाटू लागला.

महेश म्हणतो कि मी त्या विहिरीपाशी एक सावली बघितली जी मला बोलावत होती. पण महेशचा स्वभाव पाहता तो भूत-बाधा या गोष्टी खूप मानणारा होता, त्यामुळे त्याच्या मेंदूत या गोष्टींचा साठा असल्याने त्याच्या डोळ्यांनाही तेच दिसायचं. परिणामी महेशला विहीर बघितली कि रात्री झोप लागत नाही. त्याला आता पाण्याची सुद्धा भीती वाटते.

प्रतिमा सध्या खूप आळशी असल्यासारखी घरात वावरत आहे. खूप चिडचिड करते. काहीही फेकून मारते. एकदा वडिलांकडून भावनेच्या भरात ‘तू आमच्यासाठी कायमची मेली’ हे उद्गार निघाले. त्याचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला कि ती स्वतःला रूममध्ये कोंडून ठेवते.

कधीतरी अक्षय एकांत मिळविण्यासाठी नदीकिनारी जाऊन तासंतास बसतो. त्याला वेळेचेही भान राहत नाही. त्याची जुनी मैत्रीण त्याला कायमची सोडून गेल्यामुळे अजूनही ती येईल या आशेने तो तिला नदीकिनारी भेटायला जातो. त्याला एक बायको आणि दोन मुले आहेत याचेही भान त्याला उरत नाही.

वरील प्रकारच्या या घटना किंवा प्रसंग या सर्वांच्या आयुष्यात कमी-अधिक तीव्रतेने घडतच असतात. ती तीव्रता सुद्धा आपल्या त्या प्रसंगांशी जुडलेले भावनिक बंध ठरवत असतात. म्हणजेच सायन्सच्या नियामानुसार घडलेले आणि घडणारे प्रसंग हे केवळ प्रसंगच असतात, त्यामध्ये कमी-जास्त तीव्रता असं काही नसतंच.

आपण जितकं त्या प्रसंगात भावनिकरीत्या अडकू किंवा स्वतःला घुटमळत ठेऊ, त्याचा परिणाम आपल्या समाधानी जीवनावर हा होतोच, त्यामुळे आपल्याला पुढे सरकताच येणार नाही आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा पुढे सरकवता येणार नाही.

म्हणून आयुष्यात जे काही घडलं किंवा इथून पुढे जे काही घडेल त्याकडे आपल्याला केवळ प्रसंगच म्हणूनच बघता आले पाहिजे. ते प्रसंग येतात, घडतात आणि निघूनही जातात. कोणते प्रसंग निघून जात नाही ? ज्यात आपण स्वतःला फार काळ अडकून ठेवतो तेच !

समजा, तुमच्या आयुष्यात आतापर्यंत घडला नाही असा एखादा टोकाकडचा प्रसंग घडला, त्याठिकाणी सुद्धा हे सायन्स लागू होतं. आता कसं ?

३-४ महिने आपण रडू, चिडू, हताश होऊ, माझ्याच बद्दल असं का घडलं ? अशा निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या वेळी हवी असतात. पण हि जी मानसिक प्रक्रिया घडते, ३-४ महिन्याची वा ६ महिन्याची वा १ वर्षाची ती नैसर्गिक आहे, जी प्रत्येकाबद्दल घडते.

पण ५ वर्ष झाले, १० वर्ष झाले…अजूनही तुम्ही तेथेच अडकून पडलात, याचा अर्थ तुम्ही वास्तवात जगत नाही आहात. तो प्रसंग कधीच घडून गेलाय, पण तुम्ही अजूनही तेथेच अडकून पडल्याने तुम्हाला सुद्धा पुढे सरकता येणार नाही आणि तुमच्यामुळे कुटुंबाला सुद्धा !

तुम्ही काढून पहा, ज्या-ज्या प्रसंगात तुमचं मन फार काळ घुटमळत राहिलंय तिकडूनच हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेत…

आणि ज्यांना-ज्यांना आतापर्यंत घडलेल्या प्रसंगांवरून आपलं घुटमळनं बॅलेन्स करता नाही आलं, शेवटी तेच प्रॉब्लेम मध्ये खोल रुतत गेलेत.

म्हणून कोणत्याही प्रसंगाकडे प्रसंग म्हणूनच बघता आलं पाहिजे….

ते येतात आणि निघूनही जातात !



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!