मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट हि सुंदरच दिसते !!
मधुश्री देशपांडे गानू
“ती सध्या काय करते?” त्या धर्तीवर ?
“मी सध्या काय करते?” तर मी सध्या भरत नाट्यम शिकतेयं. कथ्थक चार वर्षं झालेलं आहे. एकूणच नृत्य माझा श्वास आहे.
कोणतीही कला तुम्ही जसे शिकत जाता तस-तशी तुम्हाला नम्र, एक चांगला माणूस बनवते, असे माझे प्रामाणिक मत आहे. सगळेच तसे घडत नसतीलही. असायला हवे हे मात्र खरे….
आम्ही एका संस्कृत श्लोकावर भावाविष्कार करतो. त्याचा मराठी अर्थ असा आहे.” जिथे हात तिथे नजर, जिथे नजर तिथे मन, जिथे मन तिथे भाव, जिथे भाव तिथे आनंद..” नृत्यात जशा तुमच्या हातांच्या हालचाली असतील तशी तुमची नजरही फिरली पाहिजे. जिथे नजर तिथे मन पूर्णपणे गुंतलेलं हवं, एकाग्र हवं.
तरच हवे ते भाव प्रकट होतील आणि जिथे भाव आहेत तिथेच तुम्हांला त्याचा खरा आनंद मिळेल. आणि रसिकप्रेक्षकांना ही…
हीच गोष्ट आपल्या जीवनातील प्रत्येक बाबीला लागू होते ना! प्रत्येक गोष्ट मनापासून आनंदाने करायची जर सवय लावली तर कशाचंच ओझं होत नाही. मग तुमची आवड असो किंवा एखाद कर्तव्य. तुम्ही हसतमुखाने पार पाडता. अर्थात यासाठी मनाची, विचारांची योग्य मशागत आवश्यक आहे, मनाला जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांची सवय लावावी लागते.
मन आणि शरीर परस्पर पूरक आहेत. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदरच होणार. आणि तुम्ही सुंदर दिसणार. “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण” असं संतांनी म्हणून ठेवलं आहेच…
आजच एक गोष्ट वाचली. एक नोकरी करणारी मुलगी एका दुकानातून एक टोपी विकत घेते. ती घातल्यावर त्या टोप्या विकणारी लहान मुलगी तिला म्हणते, “तुला ही टोपी खूपच सुंदर दिसत आहे. ” त्या मुलीला आनंद होतो. आणि मग भेटणारा प्रत्येक जण अगदी शिपाई , तिचा बॉस, तिची आई भेटणाऱा प्रत्येक जण तिला सुंदर म्हणतो. यामुळे ती खूश तर होतेच पण तिचा आत्मविश्वासही वाढतो.
काही काळाने एकदा ही टोपी हरवते. आणि तिचा आत्मविश्वास लगेच डळमळतो. पण मग विचारांती तिच्या लक्षात येतं की टोपी मुळे नाही तर “मी सुंदर आहे या विचारांनी मी आनंदी होते. माझा आत्मविश्वास माझ्या मनातील विचारांवर अवलंबून आहे. बाह्य , भौतिक गोष्टींवर नाही.
माझ्या बद्दलच बोलायचं झालं तर मी खरंच भाग्यवान आहे. लहानपणापासूनच मी फक्त कौतुक ऐकत आले आहे.आजही ऐकतेयं. तुमचं रूप, सौंदर्य , स्वभाव , भौतिक सुखासिनता याचं कौतुक तुम्हांला ऐकायला मिळते. आणि प्रामाणिक पणे सांगा .. कौतुक ऐकायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं. मन खूश होतं की नाही लगेच. सौंदर्य ही तर परमेश्वराची देणगी आहे हो..
आपल्या आई वडिलांचीही. त्याचाही सार्थ अभिमान वाटतो की! गर्व नको मात्र. आपल्या आवडत्या माणसांनी आपलं कौतुक करावं म्हणूनच धडपडतो ना आपण! प्रत्येक व्यक्ती सुंदरच आहे कारण ती परमेश्वराची कलाकृती आहे. पण म्हणूनच ती नीट सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे ना!..
आणि यासाठीच सुंदर मन हवं. तुमचं सुंदर मन हे तुमच्या चेहऱ्याचा आरसा असतं. चेहरा सुंदर दिसतो. कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी , कोणाला दाखवण्यासाठी कधीच करू नका. तर आपल्या आनंदासाठी ती करा.
जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर स्पष्ट नाही म्हणा. पण उठवळ पणा, उरका पाडणे असं करू नका. कितीतरी स्त्रिया एकट्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतात. तारांबळ होते. काही जणांना वाटतं “सगळ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून अट्टाहासाने कशाला काम ओढवून घ्यायची? ” पण असं नसतं.
अकस्मात अंगावर मोठी जबाबदारी पडते. कोणताही पर्याय नसतो. अशावेळी मग मनापासून आनंदाने का नाही?? ज्याचा त्याचा प्रवास हा त्यालाच माहिती असतो. बोलणारी तोंडं आपण गप्प करू शकत नाही. पण मग कोणी चांगलं म्हणो किंवा नाही म्हटलं तरी आपण आपलं काम, आपली जबाबदारी आनंदाने पार पडली , मनापासून पार पडली तर ती चांगली , उत्तम होणारच…
खरं सांगू! तुमचे कुटुंबीय, तुमचे मित्र मैत्रिणी यांचं छोट्या छोट्या गोष्टीत आवर्जून कौतुक करा. मैत्रिणीला आवर्जून सांगा ती किती छान दिसते. हा ड्रेस छान दिसतोय. बघा तिचा चेहरा कसा फुलून येतो. आपल्या आयुष्यात आपली माणसे सगळ्यात महत्त्वाची मौल्यवान आहेत हे त्यांना जाणवू द्या. ही प्रेमाची माणसे जपा.
हे मी आभासी जगाबद्दल बोलत नाहीये. कारण हल्ली प्रत्येक गोष्ट तिथे जोडली जाते. तिथे खोट्या स्तुतीचा नुसता पूर आलेला असतो.
सगळंच खोटं ,बेगडी, तकलादू. स्वतःच्या बायकोला, मुलीला अतिशय वाईट वागवणारी , काहीही न करता त्यांच्या जीवावर जगणारी पुरुष मंडळी महिला दिनाच्या निमित्त सोशल मीडियावर कधी न पाहिलेल्या स्त्रियांचं विशेष कष्ट घेऊन कौतुक करतात तेव्हा तर चीड येते. पण त्यातही काही खरी माणसे, मित्र मैत्रिणी आपल्याला सहज मिळून जातात.
आपल्या माणसांची आपण घेतलेली दखल , केलेलं कौतुक त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप मोलाची ठरते हे लक्षात ठेवा. माणूस मेल्यानंतर तो किती चांगला होता हे सांगणारी सामाजिक मानसिकता आपली. बदला ती…जिवंतपणी त्याला शब्दांचं, तुमच्या मायेचं, कौतुकाचं सुख मिळू द्या. आणि बघा किती आनंदी होता तुम्ही आणि तुमची माणसं.
“आत्मानंद” हा सगळ्याचा मूळ गाभा आहे. तुमचं सुंदर दिसणं, असणं, तुमची वाणी, तुमचा स्वभाव, कौतुक आत्मविश्वास सगळ्याचाच.
माझ्या सासूबाई नेहमी मला सांगतात की तू जे करतेस ते प्रेमाने मनापासून आनंदाने करतेस मग तो एखादा पदार्थ असू दे, एखादं काम असू दे , नृत्य असू दे. मी कोणतीही गोष्ट करताना मला त्यातून आनंद मिळतो यासाठी करते. अर्थात ही सकारात्मक मानसिकता तयार व्हायला वेळ द्यावा लागतो. नियमित ध्यानाचा फायदा आहे हा.
कोणतीही गोष्ट करताना आपला हेतू काय आहे याबाबत आपण सजग आणि स्पष्ट असायला हवं.
कोणीतरी काहीतरी करतोय म्हणून मला पण ते करायचंय हा हेतू तर मारकच ठरतो. मुळात आपल्या मध्ये काय आहे त्यापेक्षाही आपल्यामध्ये काय नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं असते.
कोणाशी तरी स्पर्धा, कोणालातरी सिद्ध करून दाखवायचे असे हेतू ठेवले की त्या कामाला सर्वांगसुंदर रूप येत नाहीच. तुम्ही सतत ते हेतूचा विचार करता. तु तुमच्या मनीचा भाव त्यात उतरत नाही.
सध्या नृत्य शिकताना मला हे सतत जाणवत आहे. मन लावून आणि प्रत्येक क्षणात मला आनंद मिळतोय एवढाच विचार करून मी नृत्याचे धडे घेतेयं, सराव करतेयं. त्यामुळेच होणारा परिणाम सर्वांग सुंदर होत असेल.
खरंच प्रत्येकाने एक तरी कला मनापासून फक्त आनंद हा हेतू ठेवून शिकायलाच हवी. माणूस म्हणून मग तुम्ही नव्याने (तुमचं वय कितीही असले तरीही) खूप काही शिकता. तुमचं आरोग्य उत्तम राहतं. तुमचं मन प्रसन्न राहतं हे तर आहेच..
कला तुम्हाला वेगळीच अनुभूती देते हे मात्र नक्कीच.


