कोणीच समजून घेत नाहीये…असं आपल्याला का वाटतं ??
टीम आपलं मानसशास्त्र
कित्येकदा अशा अनेक घडामोडी घडतात किंवा असे अनेक प्रसंग घडत असतात ज्यातून मनातल्या मनात मानसिक संघर्ष घडतअसतो. मन अगदी सुन्न होऊन जाते. काहीच सुचेनासे होते. अगदी एकटं-एकटं रहावेसे वाटते. कोणाशीही जास्त संबंध ठेवावेसे वाटत नाहीत.
एकंदरीत आयुष्य कसंतरी सुरु आहे, म्हणून पुढे चालवावं लागतं, अशी अगदी जगण्याची शून्य भावना मनाला अनेकदा स्पर्श करून जाते. घरातल्या लोकांशीही नेहमीच्या पद्धतीने वागता येत नाही, बोलता येत नाही, आधीसारखं मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही.
कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं याबद्दल पंचायत असते. कारण कोणीच मला समजून घेत नाहीये, मग कशाला काही सांगत बसायचं या भावनेने मानसिक दडपणाची तीव्रता आणखीन तीव्रतेने वाढत असते.
खरं पाहिलं तर ‘मला कोणीच समजून घेत नाहीये’ या वाक्यांमध्ये आपणच अतिरिक्त अपेक्षा ठेऊन कुठेतरी दिशाहीन वाट निवडून स्वतःची फसवणूक करीत आहोत. मुळात प्रश्न इथूनच सुरु होतो कि कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, खरंच याची आवश्यकता आहे का ??
हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या अंतर्मनाला विचारायला हवा.
आपल्यापेक्षा कोणीच आपल्याला समजून घेऊ शकत नाही हि गोष्ट खरी जरी असली तरी इथे सुद्धा पुन्हा दुसरा प्रश्न असा उभा राहतो कि त्यावेळेस आपणच भानावर असतो का ?
आपण आपलं मन, आपली मानसिकता, आपलं अखंड व्यक्तिमत्व जणू आपण समोरच्याकडे गहाणच ठेवलेलं असतं. आपण भावनिकतेच्या इतक्या टोकाकडे जातो कि आपल्याकडेही बुद्धिमत्ता आहे, सारासार विचार करण्याची क्षमता आहे, योग्य निर्णय घेण्याची पातळी आहे, हे आपण विसरून जातो.
कारण लोकं मला जेव्हा समजून घेतील तेव्हाच तो मेंदू कार्यशील होतो. इथे आपणच आपल्या मेंदूवर तसे संस्कार केलेले असतात. म्हणजेच तुम्ही उत्तम चित्र काढता, पण तुमची सदैव अशी तक्रार राहिली आहे कि इतर लोकं मला कधी कोणत्याही गोष्टीत समजूनच घेत नाहीत, या सगळ्यांचा परिणाम तुमच्या आवडी-निवडीवर होतो.
म्हणजे तुम्ही जेव्हा चित्र काढायला बसता, तेव्हा त्या अर्ध्या तासासाठी तुम्ही ५ तास लावता आणि इतका वेळ देऊनही त्या चित्राबद्दल तुम्ही समाधानी नसता. म्हणजे तो वेळही गेला, ऊर्जा ही गेली आणि तुम्ही कला ही गेली. ज्या कलेने तुम्हाला जगण्यास प्रेरित केले होते.
जर त्या कलेचेच वाटोळे होत असेल तर जगण्यासाठी म्हणून हाती काही शिल्लकच राहणार नाही आणि आपला मेंदू पुन्हा आपल्याला समजून न घेणाऱ्या लोकांकडेच पुन्हा वळणार.
हे एक वर्तुळ सारखे काम करेल, जोपर्यंत तुम्ही ‘Individual Personality’ हि संकल्पना मनावर घेत नाहीत.
याचा अर्थ तुम्ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. तुमच्या मनात निर्माण होणारे विचार आणि भावना तसेच त्यातून घडणारी कृती याला तुम्हीच सर्वस्व जबाबदार होता आणि आहात. यासाठी तुम्ही लोकांना दोषी ठरवू शकत नाही.
तुमच्या जवळचीच लोकं तुम्हाला त्रास जरी देत असली तरी त्या मागे तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना दिलेली सहानुभूतीची किंवा समायोजनाची वागणूकच याला कारणीभूत असावी. अर्थात तो एका केस स्टडीचा भाग आहे.
म्हणून कोणीतरी मला समजून घ्या, या भावनेत वाहत जाऊन स्वतःतल्या कौशल्यांवर परिणाम करून घेण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला काही नाही उत्तमरीत्या समजून घेत.


