Skip to content

पॉसिटीव्ह विचार करून स्वतःचा प्रोग्रेस साधूया..

पॉसिटीव्ह विचार करून स्वतःचा प्रोग्रेस साधूया..


टीम आपलं मानसशास्त्र


सभोवताली पाहिले तर अशा वेगवेगळ्या स्वभावांची असंख्य माणसे वावरताना दिसतात, जी काही बरे असूनही कुढत बसणारे, निराशावादी असतात, तसे विपरीत परिस्थितीबरोबर हसतमुखाने सामना करणारेही असतात. आपण कसे असावे हे आपल्या हाती असते. संकटे आणि समस्या कोणाला टाळता येत नाही.

पण त्यांच्यावर मात करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी हवी सकारात्मकता आणि मनाला दिलेले आशादायी विचारांचे वळण. संकटातही संधी असल्याचे कोरोना काळाने दाखवून दिले आहे.

एका क्षेत्रातील रोजगार घटत असले, तरी दुसरी क्षेत्रे खुली होत आहेत. त्यातही काहींनी भविष्यातील जग ओळखून पावले टाकली आहेत, याला म्हणतात आशादायी वृत्ती. पळून जाण्याने संकट टळत नाही, तर त्याच्याबरोबर लढून मात करावी लागते.

सकारात्मक वृत्ती तुम्हाला यशाच्या मार्गावर कशी नेते ते क्रिकेटच्या खेळातून दिसेल. भारतासारख्या देशात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटपटू म्हणजे आदर्श. या खेळात अनेक महान खेळाडू होऊन गेले आणि सध्याही आहेत.

गॅरी सोबर्स, रवी शास्त्री आणि युवराज सिंग हि नावे सर्वांना परिचित आहेत. मग त्यांच्यात विशेष काय, असा प्रश्न पडेल आणि त्याचे उत्तर आहे कि या तिघांनी केलेला षटकारांचा विक्रम.

एका ओव्हरमध्ये सलग सहा षटकार मारण्याचा पराक्रम या तिघांच्या नावे आहे. समोर नामवंत वेगवान गोलंदाज असताना असे करणे सोपे नसते आणि तरी सकारात्मक वृत्तीमुळे या तिघांना हा विक्रम करणे शक्य झाले.

आपण हा विक्रम करावयाचाच, या भावनेनें हे खेळाडू मैदानात उतरले आणि त्यांनी तसे करूनही दाखविले. सकारात्मक वृत्ती कशी उपयोगी पडते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सकारात्मक वृत्ती हवी असेल तर मनावर नियंत्रण हवे.

निराशावादी विचार येणे नैसर्गिक असले तरी त्याचे प्रमाण किती असावे हे आपल्यावर अवलंबून आहे. एका अपयशामुळे सर्व काही संपत नाही, तर दुसरी संधीही मिळते. त्यामुळे आज नाही, तर उद्या यश मिळणार अशा सकारात्मक विचारांची सवय मनाला लावलीत, तर निराशावादी विचार दूर होऊन तुम्हाला प्रयत्न करावेसे वाटायला लागेल.

हि वृत्ती तुम्हाला खेळाच्या मैदानात किंवा रोजच्या जीवनात उपयोगी पडते. मात्र, त्यासाठी तुम्ही विचारसरणी बदलणे आवश्यक असते.

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हेही महत्वाचे असतात. पण त्यातही सर्वात मोलाचा असतो तो म्हणजे वर्तमानकाळ. कारण भूतकाळ म्हणजे घडून गेलेल्या घटना आणि भविष्यकाळ म्हणजे काही घडण्याची शक्यता. पण त्याची खात्री नसते.

या स्थिती महत्वाचा असतो वर्तमान काळ. या काळात १००% वावरण्यास आपण शिकू तर यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. या संदर्भात तान्ह्या बाळाकडे पाहता येईल. हे बाळ सदैव वर्तमानकाळात आणि मजेत असते. त्याला चॉकलेट किंवा खेळण्यांचे आकर्षण वाटत नाही.

बाळ कोणतीही तक्रार करत नाही. क्वचित कधीतरी रडले, तरी ते तात्पुरते असते आणि ते लगेच हसायला किंवा खेळायला लागते. बाळाचे हे जगणे फार मोहक असते आणि म्हणूनच कदाचित आपल्याकडे लहानगा बाळकृष्ण लोकांना जास्त आवडतो.

सदैव निराश असलेल्यांबाबत विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे एक विधान मोलाचे आहे. ते म्हणतात, ‘तुम्ही सदैव तक्रारी करत असाल किंवा संताप व्यक्त करत असाल, तर लोक तुमच्यासाठी वेळ काढणार नाहीत, तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत.’ याचा अर्थ, तक्रारखोर, निराशावादी लोक कोणाला नको असतात.

आपल्या विचारसरणीचा परिणाम घरातील वातावरणावरही होतो. खूप धनसंपत्ती असलेल्या एखाद्या घरातील लोक उदास, निराशावादी विचारांचे असतील, तर त्या घरातील वातावरण तसेच असते आणि एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरातील वातावरण समाधानी असते.

मद्यपी पिता, सतत काहींना काही मागण्या करणारी गृहस्वामिनी आणि बेजबाबदार मुले असलेल्या घरात कधी समाधानी वातावरण नसते हि लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे.

निसर्गाने तुम्हाला सकारात्मक विचारांची देणगी दिली असली तरी तिचा वापर करणे आपल्याच हाती असते हे विसरू नका. घरातील वातावरण उत्साही, समाधानी ठेवण्यासाठी आपल्याला तशी वृत्ती आत्मसात करणे गरजेचे असते. सकारात्मक वृत्तीचे लोक सदैव समाधानी आणि तृप्त असतात.

जीवनाकडे कसे पहावे हे आपल्यावर अवलंबून असते. वाट्याला आलेले आयुष्य कोणी आनंदाने जगतो. तर कोणी सगळीकडे नैराश्याने पाहतो. सुखी-समाधानाने जीवनासाठी सकारात्मकता हा घटक फार महत्वाचा असतो.

संकटे आणि समस्या या जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचे स्वीकारल्यावर त्यांना सामोरे जाण्याची मानसिकता आपोआपच होते. मनावर नियंत्रण ठेवले, त्याला चांगल्या विचारांचे वळण लावलेत तर यश तुमचेच हे विसरू कसे चालणार…..

सौजन्य : संध्यानंद



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!