Skip to content

अनेक प्रकारच्या डोकेदुखींवर घरगुती रामबाण उपाय !!

अनेक प्रकारच्या डोकेदुखींवर घरगुती रामबाण उपाय !!


हरी कृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


कधीच डोके दुखले नाही, असे सांगणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कारण प्रत्येकाने केव्हा ना केव्हा तरी डोकेदुखीचा अनुभव घेतलेला असतो, इतका हा सर्वसामान्य आजार आहे. तात्पुरत्या उदासीनतेमुळे शरीराच्या नेहमीच्या कामात बदल होतो आणि डोकेदुखी उद्भवते.

ह्या डोकेदुखीचा मेंदूतील रासायनिक बदलांशी काहीही संबंध नसतो. शरीरात काही तरी बिघाड झालेला आहे याची आगाऊ सूचना डोकेदुखीच्या मार्फत निसर्ग आपल्याला देतो. खांदा, मान आणि डोक्याचे स्नायू तसेच या भागातील रक्तवाहिन्यांभोवतीचे नाजूक स्नायू यांच्यातील चेता दुखावल्या गेल्यामुळे डोके दुखू लागते.

कारणे आणि लक्षणे

ऍलर्जी, भावनिक ताणतणाव, डोळ्यांवरील ताण, उच्च रक्तदाब, उरलीसुरली नशा, दूषित संसर्ग, रक्तातील साखरेचे कमी प्रमाण, मनावरील ताण, पोषणमूल्यांचा अभाव आणि शरीरात विषारी द्रव्यांचा साथ हि डोकेदुखीची सर्वसाधारण कारणे आहेत.

ऍलर्जी हे न ओळखू येणारे डोकेदुखीचे कारण आहे. काही लोकांना विशिष्ट पदार्थाचे वावडे असते. दूध आणि दुधाचे पदार्थ, चॉकलेट, कोंबडीचे मांस, दारू आणि चीज हे पदार्थ खाल्ल्याने या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. शिंका येणे किंवा जुलाब होणे हि ऍलर्जीची युद्धाची लक्षणे आहेत.

उपचार

लिंबू :

वेगवेगळ्या डोकेदुखीसाठी विविध उपचार करता येतात. लिंबू हे एक असेच उपयोगी फळ आहे. एक कप चहात लिंबाच्या ३-४ फोडींचा रस पिळावा आणि असा लिंबुयुक्त चहा प्यायल्याने डोकेदुखीला त्वरित उतार पडतो.

या साध्या उपचाराने रोग्याला लगेच आराम मिळतो. लिंबाच्या साली आपण बहुतेक वेळ फेकून देतो. परंतु उन्हामुळे उद्भवलेल्या डोकेदुखीवर या साली फार उपयोगी पडतात.

त्यासाठी या साली बारीक वाटाव्या आणि त्याचा लेप कपाळावर घालावा. पिवळी, नुकतीच काढलेली लिंबाची साल दोन्ही कानशिलांवर ठेवल्यानेही आराम मिळतो.

सफरचंद :

सफरचंद खाल्याने सर्व प्रकारची डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. पिकलेल्या सफरचंदाची साल आणि आतला कडक भाग काढून त्याचा राहिलेला गर थोडे मीठ लावून रोज सकाळी अनशेपोटी खावा. एक आठवडाभर हा उपचार केल्याने गुण येतो.

मेंदीची फुले :

उन्हाळ्यातील उन्हाच्या तापाने होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी मेंदीची लाभदायक आहेत. मेंदीची फुले व्हिनेगरमध्ये खलावी आणि त्यांचा हा लेप कपाळावर लावावा. लगेच आराम मिळतो.

दालचिनी :

थंड हवेमुळे गारठ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी दालचिनीचा लेप डोक्यावर आणि कानशिलांवर लावावा. दालचिनी पाण्यात उगाळून हा लेप तयार करतात.

मरवा :

मरवा हा सुगंधी झुडपाची पाने नैराश्यामुळे किंवा उदासीनतेमुळे येणारी डोकेदुखी थांबवण्यासाठी उपयोगी पडतात. मरव्याची पाने पाण्यात उकळवून ते पाणी गाळून चहासारखे प्यावे.

रोजमेरी :

थंडी बाधल्याने काही वेळा डोके दुखते. हि डोकेदुखी कमी करण्यासाठी रोजमेरीची मूठभर पाने एक लिटर पाण्यात उकळवावी. हे पाणी एका उभट भांड्यात ओतावे. डोक्यावर टॉवेल घेऊन या पाण्याचा वाफारा घ्यावा.

सोसवेल अशी वाफ घेत रहावे. डोकेदुखी कमी होईपर्यंत हा उपचार करावा. थोडा वेळ लागला तरी उतार पडतो.

आहार

योग्य आहार, उपचार आणि सकारात्मक विचारसरणी या त्रिसूत्रीने शारीरिक क्षमता चांगली राहण्यास मदत होते. डोकेदुखी टाळण्याचाही हे एक उत्तम उपाय आहे. सुरुवातीला आजारी माणसाने थोड्या दिवसांसाठी उपवास करावा. त्यामध्ये दर दोन तासांनी लिंबू-पाणी प्यावे.

त्यानंतर पचनसंस्थेवर कमी ताण येईल अशा पद्धतीने आपल्या खाण्यापिण्याचे नियोजन करावे. त्यासाठी न्याहरीला ताजी व सुकी फळे, दुपारच्या जेवणात प्रथिनयुक्त पदार्थ आणि रात्री गव्हाचा पाव, कडधान्य, भात किंवा बटाटे आणि कच्ची कोशिंबीर असा दिवसाचा आहार ठरवावा. मसालेदार, झणझणीत पदार्थ, आंबट ताक आणि तेलकट पदार्थ टाळावे.

सकाळी उठल्याबरोबर एक चमचा मध पेलाभर पाण्यात (थंडीत कोमट पाण्यात आणि उन्हाळ्यात गार पाण्यात) घालून ते पाणी प्यावे. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्यानेही उपयोग होतो.

इतर उपाय

बऱ्यापैकी कढत पाण्याचा एनिमा घेऊन पोट साफ ठेवल्याने डोके दुखणे कमी होते. त्याचप्रमाणे गळ्याभोवती गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलाने शेकणे, कोमट पाण्यात भिजवलेला टॉवेल आणि डोक्यावर दाबून घेणे असेही काही उपाय करता येतात.

पोट बिघडल्यामुळे उद्भवणारी डोकेदुखी थांबविण्यासाठी गरम पाण्याने पोट शेकावे. डोकेदुखीच्या जुनाट आजारावर तळपायाला गरम पाण्याच्या शेकाचा उपचार चांगला आहे. यामध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांना सोसवेल एवढ्या गरम पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसावे. दोन-तीन आठवड्यांनी फरक दिसून येतो.

जलनेती आणि कुंजल या योगक्रिया, अनुलोम-विलोम, शीतली आणि शीतकरी यांसारखे प्राणायामाचे प्रकार अवश्य करावे. त्याचबरोबर उत्तानपादासन, सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, हलासन आणि शवासन हि आसने केल्यानेही डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अनेक प्रकारच्या डोकेदुखींवर घरगुती रामबाण उपाय !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!