Skip to content

आनंदाने जगण्यासाठी मनाच्या या रिकाम्या जागा भरा !!

आनंदाने जगण्यासाठी मनाच्या या रिकाम्या जागा भरा !!


टीम आपलं मानसशास्त्र


आपल्या सर्वांचे आयुष्य हे आतापर्यंत नेहमी अवघड आणि धकाधकीचेच राहिलेले आहे. पदोपदी संघर्ष आणि अडथळे, समस्यांवर मात करत पुढे जावे लागते. पण काही गोष्टींबाबत काळजी घेतली तर आपले धकाधकीचे आयुष्य नक्कीच काही प्रमाणात समाधानी आणि कमी गुंतागुंतीचे होऊ शकते.

तर असे नेमके कोणते टिप्स आहेत जे फॉलो करणे गरजेचे आहे, ते पाहूया….

आपल्या हाती असलेले काम सोडू नका :

आपल्याकडे असलेल्या सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या या केवळ आपल्याच हाती असतात. त्यामुळे त्यापैकी एखादे काम पूर्ण झाले नाही किंवा नेहमीच्या रीतीने करता आले नाही, तर त्यासाठी पूर्णपणे आपणच जबाबदार असतो. विशिष्ट काम मनासारखं घडलं नाही तर ते सोडून देण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कसे करता येईल याकडे एकाग्रता वाढवायला हवी.

मनाप्रमाणे प्रत्येक वेळी घडेलच हे काही शास्त्र नव्हे. बदलत्या परिस्थितीनुसार बदलणे आणि त्या त्या वेळी तसे समर्पक निर्णय घेणे हे उत्तम स्वभाव गुणवैशिष्टांची लक्षणे आहेत.

घडलेल्या घटना पूर्णपणे विसरू नका :

तुमच्या भूतकाळातील घडलेल्या घटना दुर्लक्षित करू नका. त्यातून प्रेरणा आणि जिद्द कशी उत्पन्न होईल यासाठी स्वतःला एका कर्त्यव्यामध्ये कटिबद्ध करा. कारण कित्येकवेळा यशापेक्षा अपयशातूनच आपण सगळे शिकत असतो.

ज्या काही चुका घडल्या आहेत किंवा इथून पुढे घडणारे आहेत त्या चुका सुद्धा नवीन असाव्या. नाहीतर पारंपरिक चुकांचं वर्तुळ जर असेच सुरु राहिले तर तुम्हाला पुढे सरकत येणार नाही.

सतत दुसऱ्याशी तुलना करू नका :

आपल्यापेक्षा अनेक व्यक्ती विविध कामांत छानपैकी पारंगत असतात. अशा व्यक्तींकडे संकुचित दृष्टिकोनाने पाहण्यापेक्षा ज्ञानाचा एक साथीदार म्हणून पाहिल्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किंवा काळत-नकळतपणे आपली मानसिकता सुद्धा त्या त्या विषयांमध्ये परिपक्व होत जाते.

आपल्याकडेही काही वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहेत. आपल्यालाही विशिष्ट गोष्टींचे ज्ञान असते. या असलेल्या ज्ञानाची तुलना सुद्धा आजूबाजूच्या कमी ज्ञानी असलेल्या व्यक्तीशी अजिबात करू नका.

जास्तीत जास्त आपले ज्ञान प्रवाही कसे होत जाईल याबद्दल स्वतःला एक्सप्रेस करा.

कोणत्याही प्रसंगात कुढत बसू नका :

गतकाळामध्ये घडलेल्या एखादा प्रसंग किंवा एखादा जुना प्रसंग वारंवार आठवून स्वतःची मानसिक ऊर्जा वाया घालवू नका. तुम्ही ते जितकं आठवाल तितका तो प्रसंग तुम्हाला वर्तमानापासून किंवा वास्तवापासून ओढून नेईल.

‘मी असं केलं असतं, मला असं करायला हवं होतं, त्यांनी माझा अपमान केलाच कसा, माझ्याच आयुष्यामध्ये असं का घडतं’ वगैरे गोष्टींमध्ये स्वतःला झोकून देऊ नका. पुढे तुम्हाला काय सध्या करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्याकडे पूर्णपणे एकाग्र होण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही प्रसंगात जास्त गुंतू नका :

प्रत्येक व्यक्ती स्वतःजवळ एक स्वप्न किंवा ध्येय बाळगून असतो. अशा पद्धतीचे ध्येय बाळगणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु निव्वळ याला भावनिक आकार देऊन प्रत्यक्षात तशी कोणतीही कृती जर आपण करत नसू तर आपल्याला जे काही मिळवायचं आहे ती केवळ एक भावनाच राहून जाईल.

अशा प्रकारच्या अनेक व्यक्ती आपल्या अवतीभवती वावरताना आपण सर्रास पाहतो. अनेक वर्ष उलटूनही त्यांनी त्यांच्या स्वप्नानुसार कुठचीही गोष्ट साकार केलेली नसते.

याला कारणीभूत प्रत्यक्ष कृती अत्यंत कमी आणि भावनाच अधिक. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रसंगात किंवा कामात भावनेपेक्षा योग्य आराखडा आखण्याकडे कल असू द्या.

समस्या म्हणजे जगणं संपलं असं नाही :

शेवटच्या श्वासापर्यंत आपण समस्यांच्या अवतीभवतीच असणार आहोत. ज्या व्यक्तींना इथून पुढे समस्या नकोय त्यांच्या मानगुटीवरच असंख्य समस्या आव आसून उभ्या आहेत.

समस्या जगणं थांबवतात हा खूप मोठा भ्रम आहे. कोणत्याही आनंदी आणि यशस्वी व्यक्तीचा भूतकाळ पहिला तर समस्येतून न खचलेली मानसिकता असाच अनुभव आपल्या सगळ्यांना येईल.

ज्यांनी समस्येला प्रेरणा बनवली तेच स्पर्धात्मक युगात टिकून आहेत आणि जे समस्येत घुटमळत गेले त्या सर्वांनी आपलं जगणं थांबवलं.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आनंदाने जगण्यासाठी मनाच्या या रिकाम्या जागा भरा !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!