नक्की काय चुकले असावे..?
स्वाती किशोर पाचपांडे
त्याला ती बघता क्षणी आवडली..रीतसर बघण्याच्या कार्यक्रमात दोघे एकमेकांशी अर्धा तास बोलले आणि मग लग्न पक्के करण्याचे ठरविले..लग्न पक्के करण्याचा म्हणजे मुलीला साडी तसेच मुलाला नारळ देण्याचा कार्यक्रम ठरला..त्यासाठी रविवारचा दिवस ठरविला..भटजींना आमंत्रण दिले..
मग कुणीतरी सुचविले की साखरपुडा का नाही करून टाकत..? लग्नविधीतला तितकाच वेळ वाचेल आणि लग्न सुटसुटीत होईल म्हणजे इतर तयारीला वेळ मिळेल..लग्न तर नक्कीच होणार होते दोघांचे म्हणून साखरपुडा ठरला..तो फारच खुश होता..
दोघेही वयाने बरोबरीचे आणि अनुरूप पण ती जास्त परिपक्व भासत होती..मोजके बोलणे आणि लगेच प्रतिक्रिया न देणे अशी तिची सावध भूमिका होती.. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने कदाचित असावे असेही वाटले..अर्थात तिचे गुण सगळ्यांनाच आवडले होते..
सालस गुणी कन्या आपल्या घरी येणार म्हणून मुलाकडील मंडळींनी तिला भरपूर भेटवस्तू देण्याचे ठरविले..सगळे काही इतके झटपट आणि स्वप्नवत घडले की विचार करायला वेळच नाही मिळाला.
दोन्ही घरी आनंदाचे वातावरण होते..साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तिथी ठरवली जात होती..आठ दिवसांनी दोघे त्यांच्या सुटीच्या दिवशी दूरवर फिरायला गेले..साखरपुडा झाला असल्याने दोघांनाही तशी परवानगी मिळाली होती.. तो तर अगदी हळवा झाला होता..तिच्या रुपात जणू काही त्याला नवे आयुष्य गवसले होते..
तसा एरवी तो अबोल स्वभावाचा पण ती भेटताच तिच्याशी तो गप्पा मारू लागला.स्वतःबद्दल सांगत होता आणि तिच्याबद्दल जाणून घेत होता..तिला तो म्हणाला..’ गॉड प्रॉमिस आहे तुला..
आता एकमेकांपासून काहीच लपवून ठेवायचे नाही म्हणून काही गोष्टी मी तुला सांगणार आहे..आज मी खरच खूप खुश आहे कारण तू माझ्या सोबत आहे..’
ती म्हणाली..’ सांगून टाक..असेही आपले लग्न पक्के झालेच आहे..’
मग त्याने अगदी सहजतेने त्याच्या करिअरमधील अपयशाबद्दल सांगितले..त्याला स्पर्धा परीक्षा देवून मोठा सरकारी अधिकारी बनायचे होते पण प्रचंड स्पर्धेमुळे त्याला तो प्रयत्न सोडून द्यावा लागला..
घरची मंडळी नोकरीसाठी मागे लागली होती कारण पुढे त्याचे लग्न करायचे होते..अशातच करोना आला आणि त्याला नोकरीच्या गावी अडकून पडावे लागले..
एकटाच रूमवर असायचा आणि मनात स्थिरता नव्हती..तो काळ अवघडच गेला आणि त्याला बी पी ची गोळी सुरू झाली..तो घरी आला खरे पण मन शांत नव्हतेच..मनात असुरक्षिततेची भावना मूळ धरू लागली..जगणे नको नको वाटू लागले ..असे का व्हावे हेही कळत नव्हते..
एकदा घरात आईवडील नसतांना त्याने बी पी च्या जास्त गोळ्या खाल्ल्या आणि स्वतःच घाबरून गेला..काही त्रास व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचला आणि संकटाच्या दारातून सहीसलामत बाहेर आला..बाहेर फारसे कुणाला कळलेच नाही..त्याचे लग्न जमवून आणणाऱ्या मध्यस्थांना ही कल्पना दिली नाही..
एका मानसोपचार तज्ञाची मदत घेतली आणि एका महिन्याच्या आत तो बरा देखील झाला..म्हणजे तशी भावना त्याला आता होत नव्हती..तो प्रांजळ मनाने सारे काही तिला सांगत होता आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत होते..
त्याला वाटले की ती हळवी होईल..डोळ्यात पाणी आणून विचारेल की असे पुन्हा नाही ना तुला कधी वाटणार..?मुली खूप भावनाशील आणि संवेदनशील असतात असे त्याचे मत होते..ती मात्र एकदम निर्विकार होत त्याला म्हणाली..’चल आता निघू या..’
खरंतर तिला तो एक मोठा मानसिक धक्का नक्कीच होता..घरी गेल्यावर तिने आईला सगळा प्रकार सांगितला आणि परिणामतः त्यांचे लग्न मोडले..ज्या वेगाने झटपट लग्न जुळले होते त्याच वेगाने ते मोडले सुद्धा..
सगळ्यांनाच खूप हळहळ वाटली..अनेक प्रश्न उपस्थित झाले..त्याचे जवळचे लोक म्हणाले की तुला इतके काही खरे बोलायची गरज नव्हती..राजा हरिश्चंद्र ना तू जो काहीच लपवून ठेवू शकत नाही..हो पण त्याने ठरविले होते की जिच्याशी आपण लग्न करत आहोत तिला सारे काही सांगितलेच पाहिजे..
त्याला अपार आत्मविश्वास होता की ती समजून घेईल..तो त्याचा भ्रम ठरला..तिला ते लग्न सुरक्षित वाटले नसावे..तिचे काही चुकले असेही म्हणता येणार नाही..
त्या भेटीनंतर तिने त्याचे फोन कट केले आणि अवाक्षरही बोलली नाही..त्याला तिला समजावून सांगायचे होते पण….सगळ्या वाटा आता बंद केल्या होत्या तिने आणि त्यानेही ते स्वीकारले होते..ती थोडे त्याच्याशी माणुसकीच्या नात्याने बोलली असती तर त्याला थोडे कमी अपराधी वाटले असते..
दोघांच्या घरातील आनंद गढूळला होता..
लग्न ठरविताना काही गोष्टी समोर येत नाही आणि त्या आल्या तर त्याची परिणीती अशी होते हा प्रत्यय सगळ्यांना आला..
त्या अतिप्रामाणिक मुलाला आणि दोन दिवसांत त्या मुलीवर जन्मोजन्मीचा विश्वास टाकणाऱ्या मुलाला आयुष्याने आणखी एक धडा दिला होता..सत्य परेशान होता है..पराजित होता है..ते स्वीकारणे जमतेच असे नाही. भविष्यात दोघांचे भले व्हावे खूप अशा शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या.
त्याने स्वतःबद्दची ती माहिती सांगायला हवी होती का? खाली कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.



मला असे वाटते, या सगळ्या गोष्टी साखरपुड्या आधीच मुला मुलींनी एकमेकांशी बोलून घ्यायला हवे. त्यानंतर विचार करायला थोडा वेळ दिला पाहिजे आणि या सगळ्या मनातल्या गोष्टी ज्या त्यांना एकमेकांना सांगाव्या वाटतात, ज्यामुळे पुढे लग्नानंतर भविष्यात त्यांना त्रास सहन करावा लागेल, त्या गोष्टींवर एकमत झाल्यानंतरच साखरपुडा आणि पुढे लग्न करावे. अन्यथा साखरपुडाच करू नये.
‘त्या’ मुलीला समजूतदार पणा नव्हता आणि त्या मुलाला
देखील ज्या गोष्टी मध्ये काहीही तथ्य नाही त्या गोष्टी का
एखाद्याला सांगाव्यात ह्याचे भान नव्हते.
ज्या जोडीदारामध्ये जर अशा प्रकारची अपरिपक्व
मानसिकता असेल तर त्यांचे लग्न न झालेले बरे.
असे लग्न किती काळ टिकले असते?
All girls are nowadays very smart so I requested to everyone men please don’t tell your valuable things to wife or girlfriend because this is kalyugand enjoy with life
Yes, he did right. If she get to know this thing after marriage then they have to gone through divorce and betrayal feeling always.
Transparency आणि Mutual Trust हा लग्नसबंधासाठी अनिवार्य आहे असे मला वाटते. त्यामुळे, जे काही आहे ते समोर मांडण्याचा त्याचा विचार योग्य होता आणि प्रामाणिकही! तसेच, भूतकाळातील वास्तवावरुन भविष्यातील जोखीम टाळण्याचा तिचा निर्णयही चुकीचा आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही.
सत्य माहीत असतानाही समोरच्या व्यक्तीला स्वीकारणे हेही एक Challenge च असते. काही व्यक्ति हे Challenge स्वीकारतात तर काही व्यक्ति नाही स्वीकारत. यात कोणीही चुकीचे आहे किंवा कोणीही बरोबर आहे असे नाही! एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा आपआपला दृष्टीकोन असतो.
100% टक्के सगळ्याच गोष्टी एकमेकांशी शेयर करू नयेत…. असे करताना समोरच्याचा विश्वास घात ही करू नए…