Skip to content

डिप्रेशन या आजारावर घरगुती नैसर्गिक उपचार पाहूया !!

डिप्रेशन या आजारावर घरगुती नैसर्गिक उपचार पाहूया !!


हरिकृष्ण बाखरू

(निसर्गोपचार तज्ज्ञ)


सध्याच्या आधुनिक राहणीमानातील वाढती गुंतागुंत आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न यांच्यामुळे मनावरील ताणतणाव खूप वाढतात, ह्याचा हल्ली प्रत्येक जण रोजच अनुभव घेताना दिसतो. मनाची स्थिती बदलत राहिल्याने भावनिक चढउतार होत राहतात. त्यातूनच नैराश्य हा मानसिक आजार जडतो.

या आजाराची तीव्रता कमी-अधिक असू शकते. कुणाला मनाची मरगळ येते किंवा काही जण नैराश्याने पूर्णपणे ग्रासले गेलेले असतात. नैराश्य किंवा औदासिन्य या मनाच्या फारच कठीण अवस्था आहेत. काही वेळा तर असेही म्हटले जाते कि, एकावेळेस शारीरिक व्याधींना तोंड देणे सोपे आहे, त्यामानाने मनातील नैराश्य दूर करणे अवघड काम आहे.

कारणे आणि लक्षणे

प्रचंड पोकळी जाणवणे, उघडपणे बोलून दाखवता येत नाही असे दुःख वाटत राहणे, गाळून गेल्यासारखे होणे, अवतीभवतीच्या जगातील कुठल्याही गोष्टीत रस न वाटणे आणि थकल्यासारखे वाटणे हि नैराश्याची प्रमुख लक्षणे आहेत. शांत, स्वस्थ झोप न येण्याची लक्षणे वरचेवर दिसू लागतात.

याबरोबरच भूक न लागणे, भोवळ येणे, मनाच्या अस्वस्थतेमुळे क्षुब्ध होणे, तिटकारा, निरुत्साह, मलावरोध, सर्व शरीरभर दुखल्या – खुपल्यासारखे वाटणे, मनाची एकाग्रता नष्ट होणे आणि कुठेही लक्ष न लागणे अशा तऱ्हेची लक्षणेही दिसू लागतात.

ज्यांना निराशेच्या तीव्र भावनांनी घेरलेले असते त्यांचे शरीर गार वाटते, रक्तदाब खाली जातो, भावनांचे आवेग येऊन कधी उकडते, तर कधी थंडी वाजते.

चिंता करणे आणि मनावरील तणाव या दोन गोष्टी दीर्घ चालू राहिल्या तर मनाचे नैराश्य वाढते. जास्त प्रमाणात आणि विपरीत परिणाम घडवून आणणारी औषधे घेतल्याने शरीरात जीवनसत्वे आणि खनिजे यांचे योग्य प्रकारे पचन होत नाही.

उपचार

सफरचंद :

सफरचंदामधील बी जीवनसत्व, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांमुळे ग्लुटॅमिक आम्ल तयार होते. या आम्लामुळे मेंदूच्या पेशींची पडझड सावरली जाते. दूध आणि मध यांबरोबर सफरचंद खाल्याने मानसिक उदासीनता कमी होते.

मानसिक आजारांवर सफरचंद हे उत्तम टॉनिक आहे. त्यामुळे नवी उमेद येऊन उत्साहपूर्ण आयुष्याचा लाभ होतो.

काजू :

सर्वसाधारण नैराश्य आणि उमेदीचा अभाव यांवर काजू हा एक मौल्यवान उपाय आहे. त्या ब वर्गीय जीवनसत्वे विशेषतः थायामीन असल्यामुळे त्याने भूक वाढून नवे चैतन्य प्राप्त होते. त्यातील रिबोफ्लेविनमुळे शरीर कार्यक्षम बनून मन आनंदी व उत्साही बनते.

शतावरी :

उदासीनता किंवा नैराश्य यांवर शतावरीची मुळी गुणकारी आहे. त्यात उत्तम पोषणमूल्ये असून मानसिक बिघाडांवर हि एक उपयुक्त वनस्पती आहे. मेंदू आणि एकूण मज्जासंस्था यांचे ते चांगले टॉनिक असून शतावरीच्या सुक्या मुळीची एक-दोन ग्रॅम पूड दररोज घेतल्यास नवचैतन्य प्राप्त होते.

वेलदोडा :

चहा करताना त्यात वेलदोड्याची पूड घालावी चहाला उत्तम वास येतो. नैराश्य घालविण्यासाठी ह्या वासाचा चांगला उपयोग होतो.

लेमन बाम :

हि एक औषधी वनस्पती आहे. अर्धा लिटर गार पाण्यात तीस ग्रॅम हि वनस्पती घालावी. बारा तास हे पाणी तसेच ठेवावे. नंतर गाळून दिवसभर थोडे-थोडे प्यावे. याने मेंदू ताजातवाना होतो. मनाची मरगळ जाते आणि मन उल्हसित होते.

गुलाब :

१५ ग्राम गुलाबाच्या पाकळ्या २५० मि.ग्रॅ उकळत्या पाण्यात घालाव्या. चहा आणि कॉफी यांच्याऐवजी हे पाणी अधून-मधून प्यायल्याने नैराश्य कमी होते.

ब जीवनसत्व :

कमकुवत मनाच्या  व्यक्तींच्या आहारात एखाद्या पौष्टिक घटकाची कमतरता झाली तरी त्यांच्या मनाला नैराश्य येऊ शकते. म्हणूनच मनाच्या आरोग्यात आहाराचा फार मोठा सहभाग असतो. उत्तम आहारपद्धतीमुळे आपल्या शरीरात सेरोटोनिन आणि नोरेपाइनफ्राईन ही रसायने तयार होतात.

या रसायनांमुळे माणसाची मनोवृत्ती चांगली राहण्यास मदत होते. निराश लोकांमध्ये वरील रसायनांची कमतरता आढळते. हिरव्या भाज्या, अंडी, मासे या पदार्थांमध्ये ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. हे पदार्थ खाल्ल्याने माणसाला आनंदी आणि सशक्त राहण्यास मदत होते.

आहार

औदासीन्य आलेल्या माणसाने चहा, कॉफी, मद्य, चॉकोलेट, शीत पेये, मैद्याचे पदार्थ, साखर, भात, मसालेदार पदार्थ, कृत्रिम रंग, रसायने घातलेले पदार्थ ही खाणी पूर्णपणे वर्ज्य करावी. दिवसातून तीन वेळा जेवावे. सकाळच्या न्याहारीला फळे, दूध आणि मूठभर सुका मेवा किंवा दाणे खावे.

जेवताना वाफवलेल्या भाज्या, कोंड्यासकट पिठाच्या पोळ्या आणि एक ग्लास ताक प्यावे. रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्यांची कोशिंबीर, मोड आलेली कडधान्ये  – विशेषतः मूग – आणि एक पेला ताक असावे.

इतर उपाय

आपल्या मनाची ही अवस्था घालवून टाकण्यासाठी अशा व्यक्तीने सतत कामात राहावे, स्वतःमधील लक्ष काढून इतर माणसांमध्ये किंवा गोष्टींमध्ये ते गुंतवावे. त्यामुळे काहीतरी मिळवल्याच्या आनंदात स्वतःच्या दुःखावर मत केली जाते.

व्यायामाचाही उपचार म्हणून खूप उपयोग होतो. व्यायामामुळे मन आणि शरीर यांचे आरोग्य उत्तम राहतेच शिवाय करमणूक होऊन मन ताजेतवाने होते. मन स्वस्थ ठेवण्याचा व्यायाम हा एक नैसर्गिक उपचार आहे.

व्यायामामुळे शरीराचेही स्वास्थ्य चांगले राहते. आपण काहीतरी मिळवले आहे, साध्य केले आहे असे वाटून असाहाय्यपणाची भावना कमी होते.

मनाचे नैराश्य कायमचे घालविण्यासाठी योग आणि प्राणायाम शिकलेच पाहिजे. अशा व्यक्तीने आपल्या मनावर काबू ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भावनिक आणि मानसिक ताकद स्वस्थता मिळणाऱ्या कामांमध्ये, धंदामध्ये गुंतवली पाहिजे. त्यासाठी शांत वातावरणात पुरेशी झोप आणि विश्रांती घेतली पाहिजे.

प्राणायमाने मेंदू आणि त्याच्याशी निगडित संस्था यांमध्ये संतुलन निर्माण होते. चेतासंस्थांमध्ये संतुलन निर्माण करण्याचे काम प्राणायामाने होते. त्यामुळे शरीरातील हॉर्मोन ग्रंथीतून पुरेशी हॉर्मोन तयार होऊन त्यांचे योग्य प्रमाण राखले जाते आणि नैराश्याची, औदासीन्याची भावना नाहीशी होण्यास मदत होते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!