जगण्याचा सर्वोच्च आनंद देणाऱ्या या ५ गोष्टी माहितीयेत का ?
टीम आपलं मानसशास्त्र
जन्मल्यापासून आनंदाचा शोध घेत असतो. आपण एकाचवेळी एकट्याने व इतरांबरोबरही घेत असतो. आपल्या कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींबरोबर व आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने आपण जगण्यातील गंमत, मजा हुडकत असतो. आनंदाचा शोध कधीही न संपणारा असतो. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. माणूस आनंदी होण्याची अनेक करणे असतात. यापैकी ५ कारणांचा किंवा गोष्टींचा आपण विचार करू.
१) प्रवास
प्रवास करणे नेहमी आनंददायी असते. जगणे म्हणजे जन्म आणि मृत्यू या ठिकाणांदरम्यानचा प्रवासच असतो. ऐन तारुण्यात प्रवास करण्याची जास्तीत जास्त संधी मिळणे यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आपण महाराष्ट्रात राहत असू तर वयाच्या पंचविशीपर्यंत निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र बघायला हवा.
विदर्भातील कडक उन्हाळा, कोकणातील मुसळधार पावसाळा, मराठवाड्यातील तीर्थक्षेत्रे, पश्चिम महाराष्ट्रातील जलाशय आपण पाहायला हवेत. उत्तर महाराष्ट्रातील दुर्गम ठिकाणांनाही आपण भेटी द्यायला हव्यात. जे राज्याबद्दल तेच देशाबद्दलही म्हणता येईल. अक्खा भारत बघण्यासाठी एक जन्मही पुरणार नाही.
आपल्या देशाचा जास्तीत जास्त भाग पाहायला मिळणे यासारखे भाग्य नाही. प्रवासाचे प्रत्येक ठिकाण तुम्हाला काहीतरी शिकवत असते, नवा अनुभव देत असते. प्रवासामुळे तुम्हाला नवी माणसे भेटतात. लोकांना समाजाला जाणून घ्यायचे असेल, तर प्रवास करावाच लागतो.
लोकांना जाणून घेण्याने आपली जगण्याची क्षमता वाढते. सतत नव्या गोष्टी आपण शिकत राहतो. एकट्याने प्रवास केल्याने आपण आव्हानांना सामोरे जायला शिकतो. कुटुंबासह प्रवास केल्याने आपण आवडत्या माणसांच्या सहवासाची मजा लुटतो. प्रवासात आपण मुलाबाळांशी संवाद साधू शकतो, त्यांना चार गोष्टी शिकवू शकतो.
प्रवासासाठी पैशापेक्षाही इच्छाशक्तीची जास्त जरुरी असते. प्रवास हा लांबचाच केला पाहिजे, असे नाही. अगदी हजार रुपयात तुम्ही कुटुंबासह वन डे ट्रिप करू शकता. प्रवासाची मनापासून इच्छा असली कि तो कमी पैशात करण्याचे मार्गही सुचतात. प्रवासामुळे तुमच्या जगण्यात सतत नावीन्य राहते, तुम्ही ताजेतवाने राहता.
२) नातेसंबंध
मित्र-मैत्रिणी जोडण्यासाठी तुम्ही नेहमी वेळ दिला पाहिजे. मैत्री संबंध निर्माण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या संघर्षाच्या काळात तुम्हाला मित्रांची मदत लागते. याचबरोबर तुमचे यश साजरे करण्यासाठीही तुम्हाला मित्रमैत्रिणी लागतात. कोणत्याही यशाचा पुरेपूर आनंद अनुभवायचा, तर सेलिब्रेट करणारे मित्र हवेतच.
मित्रांबरोबर तुम्हाला चांगल्या मैत्रिणी असल्यास तुमचा आनंद दुपटीने वाढतो. कोणत्याही मुलाला थोड्या तरी मैत्रिणी असाव्यात आणि कोणत्याही मुलीला थोडे तरी मित्र असावेत. जन्मतःच प्रत्येक वक्तीला काही नाती लाभतात, उदा. आई, वडील, बहीण, भाऊ वगैरे.
हि नाती जपणे हा आपला आनंद आणि जबाबदारीही असते. याबरोबर आपण प्रयत्नांनी काही नवी नाती निर्माण करतो. उदा. गुरु किंवा शिक्षक, सहकारी, शेजारी, मित्र, मैत्रीण. नात्यांशिवाय जगण्यात काही अर्थही नसतो आणि आनंदही. आपली नाती जितकी बळकट होतात तितके आपण समाधान होत जातो.
३) आव्हाने
आव्हाने पेलण्याचा बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळा येतो. ती नकोशी वाटतात. आव्हानांना सामोरे जाणे नक्कीच त्रासदायक असते. दररोजच्या कामाचे रुटीन सांभाळण्याचे आव्हान तर कंटाळवाणेही असते. ऑफिसमधील सहकारी आपल्याला वैताग आणतात. एक तर ते कामचुकारपणा करतात किंवा सारख्या तक्रारी करत असतात. आव्हानांमुळे आपली जगण्याची क्षमता वाढते.
अडचणी, अडथळे यांच्यावर मात करत उद्दिष्ट गाठणे यासारखी मजा नाही. आपण आव्हानांना सामोरे गेल्यावर आपल्या जगण्याला वेग येतो. एकाच जागी किंवा एकाच विषयात आपण अडकून पडत नाही. आव्हानांमुळे आपण बळकट होत जातो. या ताकदीमुळे आपण जगण्याच्या नव्या वाट शोधू शकतो. सर्वोत्कृष्ट अशा काही गोष्टी अनुभवण्याचा आनंद घेऊ शकतो.
४) खेळ
जगणे हा एक खेळ आहे. त्यात सुरुवात आणि शेवट आहे, हार-जीत आहे. विविध खेळाडूही आहेत. हा खेळ आपण खेळकरपणे खेळायला हवा. विविध खेळ तुम्ही एकदा तरी खेळून बघायला हवेत. एखाद्या खेळात तुम्ही तज्ज्ञ असायला हवेत. फुटबॉल हा युरोप-अमेरिका-आफ्रिकेत लोकप्रिय आहे.
भारतात सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट हाच आहे. त्याखालोखाल हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, कबड्डी या खेळांना भारतीय महत्व देतात. खेळामुळे आपण संघभावना शिकतो. कोणत्याही समूहात काम करण्यासाठी ती आवश्यक असते. सहकाऱ्यांशी संवाद कसा साधायचा हे खेळाचं आपल्याला सहजपणे शिकवतात.
खेळकरपणाने केलेला संवाद नेहमीच परिणामकारक ठरतो. खेळामुळे आपली चिकाटी वाढते. जिंकण्यासाठी खेळात शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागतात. या गुणांचा आपल्याला अभ्यासासाठीही उपयोग होतो. खेळ हा एकप्रकारे हसतखेळत केलेला अभ्यासाचं असतो. खेळामुळे आपली नाती बळकट होतातदोन .
दोन क्रिकेटप्रेमी परस्परांशी चटकन संवाद साधू शकतात. खेळासाठी आवश्यक असणारे गन आपल्याला नोकरी, व्यवसायात यश मिळवून देऊ शकतात. खेळाशिवाय आनंदाचा शोध कधीच पूर्ण होत नाही. खेळाचा समावेश नसेल, तर तुमचे जगणे बेचव होईल.
५) अन्न
अन्न हे परब्रम्ह असे आपण म्हणतो. अन्न केवळ जगण्यासाठीच नाही , तर आपल्या आनंदासाठीही आवश्यक असते. खाण्यासारखी दुसरी मौज नाही. आईने वा बायकोने केलेले उत्तम पदार्थ तर प्रत्येकाने खावेतच, पण स्वतःही एखादा पदार्थ करण्यास शिकावे. स्वतःने केलेला पदार्थ दुसऱ्यांना खिलवणे हा परमानंद असतो.
नाश्ता असो वा जेवण, आवडीच्या व्यक्तींच्या सहवासात गप्पागोष्टी करत ते करणे हा जगण्याचा खराखुरा आनंद. अन्नामुळेही काही नाती निर्माण होतात. काही उपहारगृहांशी आपण आयुष्यभरासाठी जोडले जातो. आपल्या सर्वांत चांगल्या आठवणी या आहाराशी जास्तीत जास्त संबंधित असतात. भरपेट खाणे हा माणसासाठी भरपेट आनंदच असतो.


