कितीही टेन्शन असो, एखादं संगीत मनाचा ताबा घेतोच!
साधना जोशी
प्रत्येकजण मोठ्याने गाणं म्हणत नसला तरी गुणगुणतो मात्र नक्कीच. कधीकधी तर रस्त्याने जाताजाता सहज एखादं गाणं आपल्या कानावर पडतं, अनेकजण मन शांत करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकतात. आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधण्याचं साधन म्हणून संगीताकडे पाहिलं जातं. जीवनाचं मर्म उलगडण्याची, जीवन जगण्यासाठी दिशा देण्याची ताकद गाण्यातील शब्दांत आणि संगीतात असते, हे नक्की.
संगीतात विलक्षण जादू असते ना! मानवी मनातील प्रत्येक भावनेशी नातं जोडलेलं असतं त्याचं. मग ते आनंद, दुःख, नैराश्य, हुरहूर, व्याकुळता, प्रेम, विरह कोणत्याही स्वरूपात असो. आपल्या मनाचा ताबा संगीत घेतच घेतं. बरं, तो ताबा घेतल्यानंतर आधीची मनस्थिती पूर्णपणे बदलवून टाकण्याची अफाट शक्ती संगीतात आहे.
म्हणूनच कदाचित कधीकधी एखादं गाणं सहज जाताजाता आपल्या कानांवर पडतं, आपलं होतं आणि आपल्याही नकळत दिवसभर आपल्यासोबत राहतं. गम्मत अशी कि, ते गाणं आपल्यासोबत आहे, हे आपल्याला काळातही नाही, याची प्रचिती कालच मला आली.
कुठल्याश्या महत्वाच्या कामानिमित्त मला बाहेर निघायचं होतं. पण, का कोण जाणे सगळ्यात उशीर होत गेला निघतानिघता आणि पुढेही शाळाही वेळेत गाठायची होती. पण, घड्याळाचे काटे मस्टरवर लाल खून येणार असंच खुणावत होते. खूप चिडचिड झाली.
स्वतःवरच खूप चिडले. तशाच मनस्थितीत बाहेर पडले. माझ्या घराशेजारी एक लॉंड्री आहे. तिथे अहोरात्र राबणारे हात नेहमी एखाद्या गाण्यावर ताल धरलेले असतात. जसे बंगालमध्ये पालखी वाहणारे भोई ‘पालखी चोले, पालखी चोले’ च्या तालावर पावलं टाकत खांद्यावरच्या पालखीला या सुरांना सोबत घेऊन हलकी करतात.
तर त्या लॉन्ड्रीत असंच एक गाणं रेडिओवर सुरु होते. इतकं चिडलेल्या मनस्थितीतही कोणतं गाणं लागलंय, हे जाणून घेण्याची उत्सुकता होतीच. कदाचित, हीच संगीताची जादू म्हणावी का ? गाडी काढताकाढता कान मात्र तिकडे लागलेले. गीतकार शैलेंद्रजींचे शब्द..
किसी कि मुस्कुराहटो पे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वसते हो तेरे दिल मी प्यार
जिना इसी का नाम हेI
जादू व्हावी, अशी माझी चिडचिड कुठे नाहीशी झाली. मस्टरवरचं लाल रंगाचं लेटमार्क मला आवडू लागलं. होईल सगळं चांगलं. आपण निघूया, तर खरं. प्रचंड आशावाद निर्माण झाला. माझंच मन मला प्रोत्साहित करू लागलं.
एका क्षणात, ‘मी मज हरवून बसले….,’ अशी माझी अवस्था झाली आणि माझं मलाच हसू आलं. तुकाराम महाराज उगीच का सांगून गेलेत, ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.’
किती छोट्या-छोट्या गोष्टींनी आपण डिस्टर्ब होतो, झाला उशीर एखाद्यावेळी – माफी मागायची सोपं आहे. पण आपण अवघड करून ठेवतो. प्रत्येकवेळी परिपूर्णतेचा आग्रह आपल्याला संकटात टाकतो. नाही होऊ शकत आपण परिपूर्ण, मग स्वीकारायच्या आपल्या मर्यादा, वाढत्या वयाची जाणीव ठेवायची आणि ठेवायचं एखादं काम मागे.
पण छे! मी असं करीन ? केवळ अशक्य! हि वृत्ती बदलली कि बरंच काही बदलता येतं. त्या चार ओळींनी मनात प्रचंड आशावाद निर्माण केला होता. एव्हाना, मी अर्धा रस्ता पार केला होता. काय ताकद होती गाण्याची, संगीताची, शब्दांची. उगीच नाही आत्म्याचा परमात्म्याशी संवाद साधण्याचं साधन म्हणून संगीताकडे पाहिलं जातं.
बरं त्या चार ओळीने केईटी अर्थपूर्ण… आपण जन्माला का आलोय आणि आल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे. याचं सगळं सारं त्या चार ओळीत मला दिसू लागलं.
किसी कि मुस्कुराहोटो पे हो निसार….. आपल्यामुळे कोणी आनंदी होतंय, हसतंय आणि हे हास्य आपण आनंदानं पाहतोय, यापेक्षा वेगळं भाग्य ते काय असावं? असे भाग्याचे क्षण रोज आपल्या आयुष्यात आले तर मला वाटतं रोज आनंदाची झोप येईल.
तात्याराव लहानेंचं एक वाक्य आठवलं, ‘मी आठवड्यातून पाच दिवस पैसे कमविण्यासाठी शस्त्रक्रिया करतो आणि एक दिवस सुखाने – समाधानाने रात्रीची झोप यावी यासाठी करतो, म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ हातात हात घालूनच चालायला हवेत.’
किसी का गम मिले तो ले उधार… आर्थिक परिस्थिती आपल्या हुशार मुलाची फी भारत येत नाही, म्हणून वर्षभर पालकसभा चुकवणारे, वर्षाअखेरीस निकालाच्या दिवशी न येत मुद्दा सुटी लागल्यावर मुलाचा निकाल घ्यायला आल्यावर जेव्हा विनासायास निकाल हाती पडतो, तेव्हा फीबद्दल चौकशी केली जाते.
पण बाईनी फी भरली कळताच माझा फोन नंबर शोधला आणि अगदी सदगदित आवाजात ‘बाई थॅक्यू. हे शब्द कानावर पडतात, तेव्हा या ओळीचा अर्थ नव्याने कळतो.
किसी के वास्ते हे तेरे दिल मी प्यार… कुणीतरी आपल्यावर मनापासून प्रेम करतोय, हि जाणीव जगण्यासाठी पुरेसे बळ देऊन जाते. हे प्रेमच खऱ्या अर्थाने जगणं शिकवतं. या तिन्ही गोष्टींचा मेळ म्हणजेच शैलेंद्रजी म्हणतात तसं जिना इसी का नाम हेI
खरोखरीच त्या चार ओळींनी दिवसभर माझ्या मनाचा ताबा घेतला आणि त्या सुरांसोबतच उशिरा का असेना, मी माझी सारी कामं उरकत गेले आणि समाधानाने घरी परतले.


