इथे कोणीच मानसिक समाधान अनुभवत नाहीये !!
टीम आपलं मानसशास्त्र
आपण केलेल्या कामाला जेव्हा एखादा दाद देतो आणि त्याचे कौतुक करतो , तेव्हा निश्चितच आपण आनंदी होतो. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो , तेव्हा आपण प्रेमळ होतो आणि त्याच्याविषयीचे आपले आकर्षण वाढते. जेव्हा आपण काही हरवतो किंवा एखादी गोष्ट आपल्यापासून हिरावली जाते, जेव्हा आपल्याला दुःख होते.
जेव्हा लोक स्वार्थी, धूर्तपणाने, असमंजसपणाने वागतात तेव्हा आपण त्रस्त होऊन जातो. दररोजच्या जगण्यात आपण प्रेम, आनंद, एकटेपणा, नैराश्य आणि इतर अनेक प्रकारच्या भावनांचा अनुभव घेत असतो. त्या नक्की काय असतात. आजच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण परिस्थितीनुरूप आणि आपली मनःस्थिती असेल, त्यानुसार आपण भावनांचे प्रगटीकरण करीत असतो.
आनंदी, दुःखी, क्रोधित, संवेदनशीलता, अनुकंपा या भावना या भौतिक जगात आपल्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवून देतात. आपल्या चांगल्या गोष्टींसाठी पाच सूक्ष्म घटक अवलंबून असतात. बहुतेकांना ही गोष्ट माहीतसुद्धा नसते. त्यांना “पंचतत्त्व ” म्हणतात . ते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
जागृत अथवा सुप्त पातळीवर आपल्या भावनिक मनःस्थितीवर या सूक्ष्म तंत्वाचा किंवा आपल्या शरीरामध्ये सातत्याने वाहत असलेल्या ऊर्जांचा परिणाम होतो. आपल्या सर्व भावना, सूक्ष्म आणि सूक्ष्म नसलेली ऊर्जा यांच्यामध्ये कायम सुसंवाद असणे हे निरोगी, ताणमुक्त, आनंदी तसेच कोणत्याही अडथळ्याविना आयुष्य जगण्यासाठी अतिशय महत्वाचे असते.
आपल्या दैनंदिन जीवनात विसंवाद किंवा भावनांच्या पातळीवरील चढउतार निर्माण झाल्यास त्याचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर निश्चितपणे होत असतो.
प्रत्येक भावनेचा एक परिणाम असतो आणि त्याच्याशी संबंधित सूक्ष्म असे तत्व असते. त्यामुळे आपल्या कृतीमध्ये विसंवाद, असंतुलन, हेलकावे आणि अस्थिरता दिसून येते. आजच्या तंत्रज्ञानाधारित, प्रगतशील आणि स्पर्धात्मक अशा युगात ताण, अस्वस्थता आणि नैराश्य या साऱ्या अनुभवांना आपण सामोरे जात असतो.
अत्यंत समाधानी अथवा स्वतःशीच सुरु असणाऱ्या युद्धात न अडकलेला एखादा माणूस क्वचितच आढळून येतो. शहरी भागांमध्ये स्वतःच्याच भावनांशी झगडणारे लोक प्रामुख्याने दिसत राहतात.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. क्वचितच एखादा असेल ज्याला एकट्याला राहायला आवडते. या असुरक्षिततेमुळेच एखादा त्याच्या सामाजिक गटामध्ये आनंदी दिसला, तर अनेक जण नीट न पाहता अथवा तपासून न घेता त्याच्याशी मैत्री करतात.
माझ्या मते ज्यांच्याशी आपण नीट जोडले जाऊ शकत नाही अशा भारंभार मित्रांपेक्षा अगदी मोजके ; पण खऱ्या अर्थाने मैत्री जपणारे मित्र केव्हाही श्रेयस्कर असतात. समान विचारधाऱ्या असणाऱ्यांची मैत्री सहज जमते.
चुकीच्या मित्रांच्या सहवासात राहिल्यानेदेखील विसंवाद आणि भावनिक आंदोलने निर्माण होत राहतात. घर, काम आणि मित्रांसमवेत चांगले संबंध नसल्यास त्याचीही परिणीती भावनिक विसंवाद आणि दुःखी वातावरणामध्ये होते.
सरळमार्गी राहिल्याने, खुल्या मनाने सामोरे गेल्याने आणि प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती असल्यास आपण आनंदी आणि सुसंवादी राहतो.


