या लेखात खऱ्या आनंदाचा शोध घेऊया….
टीम आपलं मानसशास्त्र
आनंद हा नुसता शब्द उच्चारला, तरीही आपल्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित येते. आपले मन आनंदाने आणि ऊर्जेने भरून जाते. ‘भूतकाळातील जुन्या आठवणी म्हणजे आनंद’ हेच आपल्या मनावर बिंबवलेले असते.
मी एक आत्मविश्वासू अशी तरुणी आहे. मला उत्तम करिअर होते. मला सुयोग्य असा आयुष्याचा जोडीदार मिळाला आणि तितकीच छान मुलगीही झाली. मी यशस्वी होते आणि माझ्यावर आयुष्याचा वरदहस्त कायम राहिला. या काही गोष्टी माझ्या मनात आल्यानंतर मी खूप आनंदी होते.
आनंद हि काही अंतिमतः प्राप्त करण्याची गोष्ट नाही. ती प्रदीर्घ काळ अनुभवत राहण्याची अशी गोष्ट आहे. आयुष्याचा प्रवास भलेही तो अवघड असेल, परंतु जर आपल्याला छोट्या-छोट्या आनंदाचा, यशाचा अनुभव घ्यायची सवय असेल, तर हा प्रवास देखील आनंददायी होऊ शकतो.
क्षणिक आनंद हा कायम भौतिक गोष्टींतून आणि बाहेरच्या गोष्टींतून मिळतो. भौतिक आणि जगातील अन्य गोष्टींतून खराखुरा आनंद अनुभवायला मिळतो असे अनेकांना वाटत असते. परंतु हा आनंद अल्पकाळ टिकतो हे कळेपर्यंतच हा समज कायम असतो. मनात याविषयीच्या प्रश्नांची मालिका अचानक सुरु होते आणि खऱ्या आनंदाचा शोध सुरु होतो.
“पैशांनी खरेदी करता येईल अशी प्रत्येक गोष्ट आज माझ्याकडे आहे. पण खरोखर हेच मला हवे होते का ? खरेच मी आनंदी आहे की काही हरवलेले आहे ? मला कायम ताण, अस्वस्थता आणि शारीरिक आजार का असतात ? आयुष्यामध्ये निराश का वाटते ? खरा आनंद काय आहे , कशात आहे ?
प्रगल्भतेने विचार केल्यास आणि मनाची व्यापकता विस्तारल्यास , आपली सत्याविषयीची सतर्कता विस्तारते. आयुष्यामध्ये आपण जशी प्रगती करीत जातो , तशी जगातील सर्व आकर्षणे आणि सुख खरा आनंद देऊ शकत नाहीत याची आपल्याला जाणीव होते .
साध्या राहणीमानात आणि वास्तववादी अपेक्षांमध्ये खरा आनंद दडलेला असतो . आनंदामध्ये तृप्तता असते, लोभ नसतो .कोणतीही अपेक्षा न बाळगता इतरांना मदत करण्यात व इतरांची सेवा करण्यात खरा आनंद दडलेला असतो . कोणत्याही अपेक्षेविना इतरांना मदत करणे , म्हणजे निष्काम कर्म . यातून मनाचे दरवाजे खुले होतात आणि उत्कट आनंदाने मन भरून जाते . निष्काम कर्मामध्ये खरा आनंद आहे .
आपल्या उच्च तत्वाचे अस्तित्व हे एकमात्र सत्य आहे . बाकी सारे म्हणजे भ्रम !परमात्म शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होणे आणि त्यांची मनःपूर्वक सेवा करणे यात खरा आनंद आहे . परमहंस योगानंद यांनी जो आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवून दिला आहे , त्यातून आपल्याला सत्वाची जाणीव होते .
आपला बाहेरील जगाचा शोध हा जेव्हा आंतरिक दिशेने सुरु होतो किंवा स्वतःला जाणून घेण्याच्या दिशेने सुरु होतो , तेव्हा ती खरी अध्यात्मिकता . माझ्या गुरूंनी यासाठी जो मला मार्ग दाखवला आहे – तो ध्यान , योगा आणि विविध साधनांद्वारे जाणण्याचा आहे . त्याद्वारे बदलत्या भावना , अस्थिरता , ताण आणि अस्वस्थता यांच्यापासून मुक्त होऊन आपण खऱ्या अर्थाने आनंदी आयुष्य जगू शकतो .
खऱ्या आनंदाचा शोधपरमात्म्याजवळ पूर्ण होतो . अर्थात आपल्या उच्च तत्वाजवळ . आध्यात्मिकतेच्या आणि मनःपूर्वकतेच्या मार्गावरून परमात्म्याचा शोध घेतला जातो .
अनंततेच्या त्या तत्वाशी जुळवून घेतले की खऱ्या आनंदाचा मार्ग गवसतो.परमात्मा आपल्यामध्येच वास करून असतो , त्यामुळे अर्थातच आनंदसुद्धा ! बाहेरच्या जगात तो कुठेही सापडणार नाही. तो आनंद आपल्या कामात , आपल्या विचारांत आणि आपल्या कृतीत असतो. आपण विश्वास ठेवला तर तो असतोच . आपण विश्वास ठेवला नाही , तर तो नसतोही !
गुरूंच्या मार्गदर्शनानुसार योग्य दिशेने आपण पावले टाकीत गेल्यास आपला धर्म आणि कर्म यांचा शोध घेताना आपल्यातील अचाट क्षमतांचा अंदाज आपल्याला येत जातो आणि त्या परमात्म्याशी असणारे एकत्व आपल्या अनुभूतीस येते. हा खरा आनंद आहे !


