मनातले माझ्या.. संवाद
सौ. सुप्रिया पुरोहित हळबे
“उसवले धागे कसे कधी….सैल झाली गाठ”…हे गाणं सहज गुणगुणत होते आणि मनात विचार आला की खरंच किती बोलके असतात ना शब्द … मनातल्या उदास भावना किती सुरेख मांडल्या आहेत….
आणि हा विचार चालू असतानाच अनेक, नानाविध विचारांचे वावटळ मनात आले की नेमके काय घडले असेल त्यांच्यात म्हणून असे गाणे लिहिले गेले…..काय चुकले असेल..? नक्की..कुणाचे चुकले असेल?…का अंतर पडत असेल नात्यात ..? एक ना अनेक प्रश्न…
मग ही तुटणारी, दुरवणारी नाती..नवरा बायकोची असोत….मित्र मैत्रिण, बालक – पालक किंवा आणखी कुणाचीही असोत….
कोणत्याही नात्यात आलेला दुरावा..विरह..फार त्रासाचा असतो हे मात्र नक्की..
जर मन संवेदनशील असेल तर ह्या दुःखातून पटकन बाहेर येणे फार अवघड होते..
काहीवेळा असे घडते की , हा नात्यातला दुरावा नेमका कशाने आला आहे ह्याचे म्हणावे तसे ठोस कारणच नसते….पण काहीतरी चुकलेले असते, अप्रिय घटना घडली असते किंवा मनात काही शंका कुशंकाची नकळत जळमटे तयार झालेली असतात.
आणि मग हे सावरणे किंवा असलेले नाते जपणे कठीण झाल्याने संवाद संपून जातो..उरते फक्त शांतता काहीशी चिडचिड , किंचित राग आणि बरचसे दुःख…
अशावेळी मन उदास असल्याने सारेच उदास वाटू लागते आणि सुचणारी गाणी सुध्दा उदास सुचतात…. सारेच केविलवाणे होऊन जाते….अगदी पिक्चर मध्ये दाखवतात ना… तसे पलंगावर अंग झोकून देत खूप रडवेसे वाटते खरे…
काहीवेळा सारं काही पुन्हा नव्याने सुरळीत सुरू व्हावे असे मनापासून वाटत असते…पण पुढाकार कुणी घ्यावा ..अशा विचारात काहीसा इगो आड येतो आणि कुणीच संवाद साधत नाही..
आणि मग आपल्याला मनापासून अमान्य असलेले निर्णय स्वीकारावे लागतात किंवा काही अंशी थोपवले जातात…
सगळी परिस्थिती म्हणावी तशी सोपी मुळीच नसते….कितीदा ही परिस्थिती कुणाला सांगता ही येणारी नसते. अशावेळी संयम राखत स्वतःला होणारा त्रास , मनाची चलबिचल, यातना सारे काही आक्रोश करत असते पण सामना मात्र फक्त त्या व्यक्तीलाच करावा लागतो.
पण जरा स्वतःचा इगो किंवा स्वाभिमान बाजूला ठेऊन समजुतीने संवाद साधला तर ..तर कदाचित सुरुवातीला वाद होतील, खूप काही ऐकावे लागेल…पण हळू हळू नक्कीच सर्व काही सुरळीत होईल…
किंवा सारेच कायमचे संपून जाईल…..
त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणून निदान अबोल्याचे कारण तरी कळेल आणि त्यामुळे दुसऱ्याच्या मनात कटुता निर्माण व्हायचे कारण तरी समजेल.
खेद आणि खंत काही अंशी दूर सरणे शक्य होईल. यामुळे निदान संपलेले नाते पुन्हा सुरू न करण्याच्या निर्णयापर्यंत तरी पोहोचता येईल… किंवा झाले ते योग्य झाले याचे समाधान तरी मिळेल.
म्हणूनच संवाद साधणे फार फार महत्वाचे असते…संवादाचा सेतू भक्कम असेल तर नाती शक्यतो तुटत नाहीत..आणि जर काही कारणाने दुरावा निर्माण झाला असेल तर तो योग्य पद्धतीने ,उत्तम रीतीने सांधला जातो…
जेव्हा ..नाते, मैत्री टिकवण्यासाठीचा संवाद असतो तेव्हा त्यात प्रचंड कळकळ असते. पण ती कळकळ समजून घेण्याची पात्रता आणि इच्छा समोरच्या व्यक्तीकडे निश्चित असावी लागते.
जर ह्या संवादामुळे नाते टिकले तर त्याहून समाधान देणारी घटना कोणतीच असू शकत नाही..जर नाही टिकले तर समजून जावे की हे नातं कमकुवत होतं किंवा सुरुवातीपासूनच समजून घेण्यात चूक झाली होती.
पण काही नात्यात कितीही दुरावा, रुसवे फुगवे असले तरीही सतत संवाद साधावा लागतो कारण ही ईश्वर निर्मित नाती असतात जी नाही दुरावता येत. कारण ती रक्ताची नाती असतात. त्या नात्यांना जपवेच लागते.
हातातून निसटत आहेत असे वाटले तरीही सावरावे लागते.
सगळीच नाती फार सुखद असतात असे नाही किंवा कायम स्वरुपी टिकतात असेही नाही. पण नाते टिकवण्यासाठी या अशा समजुतीच्या संवादाने सकारात्मक दिशेने पाऊले उचलली याचे समाधान नक्कीच मिळते.
आणि मग ह्या सुखद घटनेनंतर आनंदित झालेले मन अतिशय उत्साही गाणी गाऊ लागते.
दुःखाचे पडसाद उमटती
अश्रुंच्या थेंबातून
हृदयातल्या भावनांना
अर्थ गवसला संवादातून



योग्य वेळेची वाट पहा.
जर समोरची व्यक्ती संवाद करण्यास तयार नसेल तर मग अशावेळी काय करावे