आयुष्याचं मानसिक गणित चुकू देऊ नका !!
वैदेही राजशेख
(समुपदेशक)
जेव्हा रुळलेली मळलेली परंपरागत चाकोरितून जाणारी वाट सोडून तुम्ही तुमची नवीन वाट शोधून त्यावर वाटचाल करायचा विचार करता तेव्हा गोष्टी सोप्या राहत नाहीत, कारण यशापयंशाची जबाबदारी फक्त तुमची एकट्याची असते.
नवीन वाट कधीच सोपी नसते. अनोळखी खड्डे अविशश्वासनीय आणि अनपेक्षित धोके यांनी ती भरलेली असते पण ती सर्वस्वी तुमची असते, तुम्ही निवडलेली आणि तुम्हीच ती पुढे रूळवणार असता.
त्यावरून जाताना सर्वसाधारणपणे परंपराप्रिय समाज तुम्हाला मदत करण्याऐवजी विरोध करायला पुढे असतो. पण तुमच्यासारखेच काही जण तुम्हाला पाठिंबा द्यायला देखील उभे राहतात.
इथे पाऊल टाकण्याआधी तुम्हाला सर्वप्रथम स्वतःचा प्रामाणिक शोध घ्यावा लागतो (न्हवे तो खरं म्हणजे गरजेचा असतो) स्वतःच्या क्षमता, जाणीवांबरोबर स्वतःमधील कमतरता देखील समजावून घ्यावी लागते आणि स्वीकारावी लागते.
एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा की आपण ज्या दृष्टिकोनातून जगाकडे बघतो तस आपल्याला जग दिसत. आपल्या सर्व अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत आणि आपण आयुष्य तडजोडी करत जगत असतो.
आपण ज्याला आपल्या समोरच्या समस्या म्हणतो तो खरं म्हणजे आपल्याच दृष्टिकोनाचा परिपाक असतो. स्वभाव बदलणे अजिबात सोप्पे नसते पण दृष्टिकोन बदलणे त्यामानाने कमी अवघड असते आणि त्याची नक्कीच गरज असते आणि ते महत्वाचे पण असते.
त्यासाठी मानसिक कष्टांची – व्यायामाची, मदत होते. साध्या सोप्या भाषेत त्याला मनाचा व्यायाम असं म्हणता येईल.
भूतकाळात न गुंतता, भविष्याची चिंता न करता आलेला प्रत्येक क्षण आपला म्हणून प्रेमानी, चविनी जगणं म्हणजे वर्तमानात जगणे म्हणता येईल.
असा एकापाठोपाठचा दुसरा असे सर्व क्षण आनंदानी किंवा समाधानात जगले गेले की आयुष्य आनंदात जाण्यासाठी वेगळं काही कराव लागत नाही. तुमच्या जाणीवेमध्ये हळू हळू होणारा चांगला बदल तूमच्या आणि लोकांच्याही लक्षात यायला लागतो.
त्यामुळे आत्तापासूनच मनाच्या अश्या साफसफाईला सुरुवात करूया, स्वतःसाठी जगूया, आत्ताच्या क्षणात, वर्तमानात जगूया त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या भावना, जाणीवा ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत.
हे लक्षात घेऊन जीवनाकडे नवीन दृष्टिकोन ठेवून बघायला सुरुवात करूया नव्याने जगायला सुरुवात करूया!!


