Skip to content

नवऱ्याने बायकोला कामात मदत करणे चुकीचे का ??

“हो आहे मी बायकोचा….भाड्या !”


प्रभा कृष्णा निपाणे


सोसायटीत दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना झाली. दुपारी सत्य नारायणाची पूजा आटोपली. रात्री भंडारा होता. अलका , अरविंद आणि त्यांची चार वर्षाची जुळी मुलं, छान तयार होऊन होते. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले. मधला ब्रेक घेतला, कारण लहान मुल जेवणासाठी तगमग करत होती.जेवणावळी सुरू झाल्या.

अलकाने एक ताट वाढून घेऊन दोन्ही मुलांना भरवत होती. अरविंदने सुध्दा त्याचे ताट वाढून घेतले. जेवत जेवत तो अलका जवळ आला. अलकाला म्हणाला, अलका मिरची भजी खूप तिखट आहे. तु अजिबात खावू नको ह! तिने नाही खाणार असे म्हणताच अरविंद मित्रांसोबत जेवणाचा आस्वाद घेत होता. इकडे मुलांची पण जेवण आटोपली.

अलकाने मैत्रिणी बरोबर जाऊन आपले ताट वाढुन घेतले, बोलता बोलता मिरची भजी पण घेतली. मैत्रिणी मैत्रिणी गप्पा मारत जेवत होत्या. तिने दोन चार घास खाल्ले, आणि मिरची भजीचा देठ हातात धरून भजा तोंडात टाकला. जसा चावला तसा तिला जोराचा ठसका लागला.

अरविंद तसा तिच्या पासून लांबच होता. पण लागलेला ठसका आपल्या बायकोचा आहे हे त्याने तिच्या खोकण्याच्या आवाजा वरून ओळखले. वळुन पाहतो तर काय ?

अलका जोर जोरात खोकत होती. तसाच तो धावत गेला, आधी पेलाभर पाणी घेतले. तिच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत घोटभर पाणी प्यायला दिले. म्हणाला वर बघ, आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. तिचा ठसका थांबला.

अलका ! बोललो होतो तुला भजी खावू नको.

किती जोरात ठसका लागला ? किती लालबुंद झालीस बघ जरा ?
अग खूप तिखट मिरची आहे ही !
तुला जरा तिखट खाल्ले की त्रास होतो !
माहिती आहे न !

सांगितले होते खाऊ नको ! पण ऐकेल कोण?
अरे बोलता बोलता चुकून घेतली, आणि चुकूनच खाल्ल्या गेली.
खरच खूपच तिखट मिरची आहे बाबा !
रडवले रे !

हसून म्हणाली , तू नाही रडवत ना !
म्हणून ही मिरची रडवते कधी कधी !

अरविंद जरा रागानेच तिच्याकडे बघायला लागला.
तिला माहित होते हा त्याचा राग तिला झालेल्या त्रासामुळे आहे.
म्हणाली, सॉरी अरविंद !

अग सॉरी काय ?
माझाच जीव कासावीस झाला होता !
हो रे !
माहित आहे मला !
आता बरी आहे मी !
जा तू !

मुलांकडे लक्ष दे , नाहीतर जातील गेटच्या बाहेर !
हो !
असे म्हणून तो जायला निघाला.
पुन्हा तिच्या जवळ येऊन म्हणाला , अलका आता साधच काहीतरी खा !
डाळ भात वगैरे !
हो रे !

नको जास्त काळजी करू !
ठीक आहे मी.
जा तू मित्रांसोबत एन्जॉय कर!
तिचे जेवण आटोपले.
सर्व जण अरविंद आणि अलका कडे बघत होते.

इतका प्रेम करणारा नवरा म्हणजे समाजाच्या दृष्टीने बायकोचा….. भा…ड्या !

अरविंद पुन्हा पुरुषांच्या ग्रुप मध्ये जाऊन गप्पा मारत बसला. लक्ष मुलांकडे आणि बायको कडे.

इकडे बायका आणि तिकडे पुरुष अलका , अरविंद कुठे आजूबाजूला नाही हे बघून कुरबुरत होते.
म्हणत होते, इतक्या लोकात काय बाई यांचे थेर !
पाणी काय पाजतो ? पाठीवरून हात काय फिरवतो?
बायल्या नुसता… !

त्यात ती सुधा अजून तिखट मीठ लावत बोलली, अहो करंदीकर काकु ! हा घरी पण बायकोला सगळ्या कामात मदत करतो !
त्यांचे जेवण झाले की भांडी नेऊन ठेवणे , लादी पुसणे हे काम याचेच !
दिसते आमच्या खिडकीतून !

रोजचं बर का ?
हे मला म्हणतात तो बघ ! बायकोचा …. भा…. ड्या !
शी!!!! पुढचे मी नाही बोलत बाई !
त्यात तिच्या दुसऱ्या शेजारणी ने सांगायला सूरवात केली. अहो हे तर काहीच नाही !

त्या दिवशी तो त्यांचा मुलगा वंश खूप रडत होता. दोघांकडे सुध्दा राहत नव्हता. ताप होता म्हणे त्याला , तर अलका त्याला खांद्यावर घेऊन थोपटत होती. वंश झोपला म्हणून ती त्याला खाली टाकायला गेली. त्याने पुन्हा भोकाड पसरले.

तर ! तर ! अरविंद चक्क तिला घास भरवत होता. फार नाही हो दुपारचे दोनच वाजले होते ! आमच्या इथे चार वाजले तरी म्हणणार नाही जेऊन घे म्हणून !

काय बाई ही थेर ?

आपले नवरे नाही करणार हो असले फाजील लाड !
बऱ्याच दिवसा पासून अश्या गोष्टी अलका आणि अरविंदच्या कानावर येतच होत्या. आज मात्र स्वतःच्या कानाने ऐकत होते.

इकडे पुरुष पण कुजबुजत होते. एकतर त्यांना बायकोला कामात मदत करायला लाज वाटते, किंवा त्यांचा पुरुषी अहंकार दुखावल्या जात असावा.

अरविंदने सगळे उघड्या कानाने ऐकले. सगळी कडे एकदोन चक्करा मारल्या. पुढचे कार्यक्रम सुरू झाले. चर्चेला मात्र एकच उधाण. अलका आणि अरविंदचा विषय .

प्रोग्राम संपला, आभार मानायच्या आधी अरविंद म्हणाला मला थोडे बोलायचे आहे.

मित्र आणि मैत्रिणींनो अरविंदचा सस्नेह नमस्कार. आज इथे बच्चे कंपनीने खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आपण सर्वांनी खूप कौतुक केले. आपल्या सोसायटीतील मुले अशीच प्रगती करत राहो.

खरतर मुलांना स्टेज डेअरिंग येण्यासाठी सोसायटीतील प्रोग्राम हे एक मोठ माध्यम आहे. इथे त्यांना सेफ वाटत असते . मनातली भिड निघून जाते. खूप खूप अभिनंदन मुलांनो.

माझ्या बिल्डिंग मधील स्नेह्यांनो आज मी तुमच्या सोबत जरा वेगळ्या विषयावर संवाद साधणार आहे.

पण तुमची संमती असेल तर?

सर्वांनी होकारार्थी उत्तर दिले. सर्वांना वाटले अरविंद काहीतरी विशेष बोलणार.

त्याने बोलायला सुरुवात केली. आज इथे उपस्थित सर्वांनी पाहिले, अलका माझी धर्मपत्नी हिला जोराचा ठसका लागला असतांना मी पटकन जाऊन तिच्यासाठी पाणी आणले. तिला घोटभर पाणी पाजले. मुख्य म्हणजे तिच्या पाठी वरून हात फिरवत राहिलो. थोड्या वेळाने तिला बरे वाटले.

परंतु त्या नंतर इथे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. ते म्हणजे, मी कसा बायकोला सदैव मदत करत असतो!
बायकोच्या ताटा खालचे मांजर झालो!
कधी आपण मला बैल ही उपाधी दिली !
कुणी बायकोचा भा….ड्या…! म्हणाले !
बरोबर न!

मला सांगा खरच बायकोला कामात मदत करणं म्हणजे बायकोचा भा…ड्या…! होतो का ?

आपल्या सोसायटीत बऱ्याच बायका नोकरी करतात. रात्री आठ, साडेआठला येतात. त्याच्या पुढे बिचाऱ्या जेवण बनवतात. त्यानंतर जेवण, मग पुढची आवराआवरी आणि मुख्य म्हणजे उद्याची तयारी.

उज्वला वहिनी रात्री बारा परंत किचन मध्ये असतात. सॉरी, मी आज सगळ्याचे नावच घेऊन बोलतो. त्यांचे मिस्टर रवी दादा आणि मी आम्ही सोबतच घरी येतो. साडेसात पर्यंत. अलका आणि उज्वला वहिनी मागेपुढे येतात साडेआठ पर्यंत.

रवी दादा आल्यावर सोफ्यावर पडून मस्त टीव्ही पाहत बसतो.
मी मुलांना पाळणा घरातून घरी घेऊन येतो. आल्यावर चहा करतो. देवापाशी दिवा लावतो. मुलांशी खेळता खेळता कुकर लावतो. पोळीवाल्या मावशी भाजीची तयारी करून ठेवतात. जमले तर फोडणीला घालतो.

तोवर अलका येते. मग ती कोशिंबीर , आमटी असे काहीतरी बनवते. आम्ही लगेच नऊ, सव्वानऊ ला जेवायला बसतो. दहा वाजता आम्ही आमच्या दोन्ही मुलांना घेऊन शतपावली करतो. मुलं बागेत थोडावेळ खेळतात. अर्ध्या तासात घरी येतो. मग अलका मुलांना दूध गरम करून, पाजून दोघे झोपतात.

समजा मी ठरवले रवी दादा सारखे रात्री घरी आल्यावर सोफ्यावर पाय ताणून टीव्ही पाहत लोळत पडायचे तर काय फरक पडणार ?

नक्कीच पडणार, आता आम्ही दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकतो. कारण मी घरातली कामे फक्त बायकोची हा विचार न करता उलट बरोबरीने काम करतो. परिणाम अलका उज्वला वहिनी सारखी रात्री बारा परत किचन मध्ये अडकून पडत नाही. मुलांना वेळ देता येतो. आणि मुख्य म्हणजे, जी भांडणे, किंवा वाद इतर नवरा बायको मध्ये होतात ती आमच्या घरात होत नाही.

अजून एक, या कोरोना मध्ये कंपनीने मला पाच महिने अर्धा पगार दिला. आणि अलकाला पूर्ण पगार मिळत होता. मध्ये गीता वहिनी आणि संकेत दादा यांचे यावरूनच कडाक्याचे भांडण झाले होते. कारण दादाची पण तीच अवस्था झाली. त्याला पण अर्धा पगार मिळत होता. मी तर असे ऐकले की अजूनही अर्धाच मिळतो. त्यावरून दोघांची खूप भांडणे होतात .

पण अलका मला म्हणाली, अरविंद अर्धा का होईना येतोय रे पगार !
काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात!
कित्येक लोकांची उपासमार होतेय !
आपण तर त्या मानाने सुखीच आहोत!
तु नको टेंशन घेऊ. होईल सगळे नीट.

मग मला सांगा एकमेकांना समजून घेणं. एकमेकांना मदत करण, एकमेकांचा आदर करणं, दोघे नवराबायको कमावती असेल तर बरोबरीने काम करणं यात चूक काय ? कुठल्या पुस्तकात लिहिले आहे की घरातले काम फक्त बायकांनी करायचे असतात.

मला सांगा आपली आई, बहीण घरात एकटी असेल तिच्यावर कामाचा ताण पडत असेल तर आपण मदत करायला मागेपुढे पाहतो ?
नाही न ?

मग तीच स्त्री बायको असेल तर ! तर ! घरातले काम करायची जबाबदारी तिचीच. भले ती नोकरी करत असेल तरीही. नोकरी करायची वरून घर पण तिनेच सांभाळायचे. कधी केला का तिच्या मनाचा विचार ?

किती थकत असेल ती याचा सारासार विचार?
नाही न?

इथे बसलेल्या माझ्या माता , भगिनींनो, तुम्ही स्वतः एक स्त्री असूनही एका स्त्रीला समजून घेऊ शकत नाही.

काय म्हणावे तुम्हाला ?

आज मी जे अलका बरोबर वागलो, त्यावरून सर्व बायका या विषयावर चर्चा करत होत्या.
एकीला ही असे नाही वाटले की, किती नशीबवान अलका. नवरा तिची इतकी काळजी घेतो.

खरतर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला कामात हातभार लावला तर नक्कीच आवडेल. हो न अलका वहिनी !
अलका आणि तिथल्या प्रत्येक स्त्रीने खाली मान घातली.
तुमचे नवरे काम तो करत नाही म्हणून मग तुम्ही दुसरे करणारे असतात त्यांना दूषणे देत बसता.
असो…!

मला इतकेच म्हणायचे आहे, माझे माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. तिच्या प्रत्येक सुखदुःखात मी तिच्या सोबत आहे. त्यामुळे कुणी मला कितीही नावे ठेवली…. तुमचा तो फेमस शब्द… बायकोचा…. भा….ड्या…! वापरला तरी मला त्याची पर्वा नाही.

तुमच्या नजरेत बायकोवर प्रेम करणारा बायकोचा भा… ड्या असेल तर ..!
हो आहे मी….
बायकोचा भा…. ड्या …!
आणि कायम राहणार….
काही चुकीचे बोलल्यास माफ करा…

समोर बसलेल्या स्त्रिया जोरजोरात टाळ्या वाजवायला लागल्या.
अरविंद स्टेज च्या खाली उतरला. प्रत्येक पुरुष आज त्याची माफी मागत होता….
अरविंद ने आज प्रत्येकाच्या डोळ्यात सणसणीत अंजन घातले होते.

समाप्त….

? सर्वाना मिळो असा जीवनसाथी!! ❤



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!