Skip to content

‘अहंकार’ जास्त असल्यास त्रास आपल्यालाच होतो!!

अहंकार


सौ. भारती गाडगिलवार


आपण नेहमी जाणकार लोकांकडून ऐकतो की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. अहंकार एक प्रकारचं विष/जहर आहे. सगळ्या प्रकारच्या वादाचं मुळ म्हणजे अहंकार होय. प्रत्येक व्यक्ती हे सत्य जाणतो तरीही स्वतःला अहंकारा पासुन दुर करण्यास असमर्थ राहतो. कारणही तसंच आहे.

अहंकारच जीवनाला समोर जाण्याचं बळ देतो. अहंकारच व्यक्तीला कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यास मदत करतो. अहंकार नसेल तर आपण कोणतेही काम करु शकत नाही असं व्यक्तीला वाटते.

” अहंकार ” म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजण्याची अशी भावना ज्यातून त्याला सुख मिळते. मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या समोर इतर सर्व तुच्छ आहेत. असे आणि याप्रकारचे सर्व विचार ज्यात अहंपणा म्हणजेच‌ ‘ मी ‘ पणा असतो त्याला ” अहंकार ” म्हणतात. असे विचार बाळगणारी व्यक्ती अहंकारी आहे असे म्हटल्या जाते.

बऱ्याचदा व्यक्तीला स्वतःतील अहंकाराची जाणिवच नसते. पण दुसऱ्या व्यक्तीतील अहंकार लवकर दिसतो. आणि स्वतःतील अहंकाराची परिभाषा आत्मविश्वास किंवा राग या शब्दात केली जाते.

कधीं कधी असे देखील वाचण्यात आणि बघण्यात येते की दुसऱ्या व्यक्तीतील अहंकाराने आपल्या मध्येही अहंकाराचा जन्म होतो. पोहणाऱ्याला माहिती असतं की, छातीच्या भारावर पाण्याच्या पृष्ठभागावर उडी घेतली की पाण्याचा दाब छातीवर सहन करावा लागतो.

पाण्यात पडलेली कोणतीही गोष्ट प्रथमतः बाहेर ढकलल्या जाते. म्हणजेच पाणी त्या गोष्टीचा प्रतिकार करते. तसेच अहंकाराचे देखील आहे, व्यक्तीला जोपर्यंत जाणिव होत नाही की त्यालाही अहंकाराची बाधा झाली आहे तोपर्यंत तो मान्यच करत नाही आणि कायम प्रतिकार करतो अहंकारी असण्याचा.

लोकांना वाटते की, अहंकारा पासुन सुटका होणे कठीण आहे. कारण अहंकारामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होते. व्यक्ती आपल्या यशाचे श्रेय अहंकारालाच देतो. जसजसे यशाची दालणं व्यक्ती पार करतो त्याचा अहंकार अधिक वाढत जातो. त्याला वाटते की, आपल्यासारखा दुसरा कोणीच नाही.

म्हणजेच अहंकार यश आणि सुख प्राप्ती करवतो अशी धारणा प्रबळ होते. त्याचवेळी त्याला अपयश आले तरीही अहंकार येतोच, कसा तर आपण इतका संघर्ष केला तरी, आपल्या जागी दुसरा असता तर त्याने नक्कीच माघार घेतली असती. याचाही व्यक्तीला अहंकार येतोच. आणि त्यातही त्याला सुख मिळते की, कसा आपण संघर्ष केला याचे. म्हणजेच यश, अपयश या दोन्हीही वेळी अहंकार कायम असतो.

आता अहंकार नेमक्या कोणत्या भावनेला म्हणायचे? जेव्हा केव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वावर संकट येताना दिसतं तेव्हा आपल्यात अहंकार जागृत होतो. मी हे तर अगदी चुटकीसरशी करेन याप्रमाणे. समाजातील आपल्या प्रतिमेवर ती मलीन होण्याची शक्यता भासायला लागली तर अहंकार बळावतो.

जीवनाचा आधार म्हणजे प्रेम, यावर प्रश्न उठले की अहंकार प्रबळ होतो. संपत्ती आणि यश म्हणजे आयुष्यभराची मेहनत यावर आघात होत असेल तर व्यक्ती अहंकारी होते. असे विचार कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच ग्रासते. म्हणजेच सर्व लोकांमध्ये थोड्या फार प्रमाणात अहंकार असतोच असं म्हणता येईल.

अहंकार म्हणजे नेमकं काय?

अहंकार हा असा शत्रू आहे जो माणसाला जगात एकटा पाडतो. सुखाचे अनुभव तर देतोच पण वास्तविक पाहता आयुष्य दुःखाने भरुन देतो. गांभीर्याने विचार केला तर लक्षात येईल की अहंकार नेमका आहे तरी काय?

फक्त जिवंत राहण्याच्या इच्छेचं नाव अहंकार होय. खरं तर अहंकार विजयी होण्याची भावना नसुन जगण्याच्या इच्छेचं नाव आहे, अशा अर्थाने विचार केला तर, अहंकार नियंत्रित करणं आणि त्यातून मुक्त होणं शक्य आहे. परंतु जेव्हा हा अहंकार पुन्हा बळावत आहे असं वाटेल तेव्हा क्षणभर विचार केला की हा आपला अंतिम क्षण तर नाही ना?

याचे परिणाम आपल्याला विनाशाकडे तर नेणार नाही ना?
असा विचार केला तर अहंकारावर मात करु शकतो.

जीवन आहे तर यश, अपयश येणारच. यशामुळे हुरळून न जाता सदैव विनम्र राहिले तर अहंकार कोणालाच स्पर्श करु शकत नाही. हा अहंकार आपल्याला आपल्या लोकांपासून तोडू शकतो हा विचारच त्या अहंकाराच्या मुळावर घाव घालण्याचे सामर्थ्य ठेवतो. फक्त गरज आहे मनुष्याने आपली विवेकबुद्धी जागृत ठेवण्याची.

प्रत्येक गोष्टीला पर्याय हे निसर्गाने निश्चितच ठेवले आहेत. गरज आहे शोधक दृष्टीची. प्रश्न जर आहेत तर उत्तरही असणारच हा विचार करून कोणत्याही प्रसंगात प्रसंगावधान साधले की अहंकाराचा जन्मच होत नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “‘अहंकार’ जास्त असल्यास त्रास आपल्यालाच होतो!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!