Skip to content

आयुष्याचं कोडं हे आत्महत्येनं सुटत नसतं !!

आयुष्याचं कोडं आत्महत्येनं सुटत नसतं !


शिवाजी भोसले | 9689964143


गेली अलिकडची काही वर्षं झालीत सर्वांचं आयुष्य धावपळीचं झालंय. कधी नव्हे ते इतके धावपळीचे होऊन बसलंय. असं का झालं असावं? पद, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती कमविण्यासाठी सर्वजण धावू लागलेत. मात्र थांबन कुणालाच महत्त्वाचं वाटलं नाही. जितकं जोरात धावलं, तितकं आयुष्य उलट्या दिशेने वाहू लागतं. हे करण्यासाठी अनेकांना पुरेशी उसंत मिळत नाही. हे काळाच्या ओघात घडत जाणारच आहे.

काळ मागे मागे सरकतो आणि आयुष्याचं कोडं पुन्हा पुन्हा उभे राहत जातं. आयुष्याचं हे कोडे सोडविण्यासाठी काळालाही काही काळ मागे जाऊ द्यावं लागतं. काळाच्या सोबतीने आयुष्याचं कोडं सोडवणं सोपं जातं. काळ हेच अनेक प्रश्नाचे उत्तर असतं.

पण अनेकांना त्या क्षणाची व आपलेपणाची वाट पाहणं अवघड होत असतं. त्यामुळे आयुष्याचं कोडं अर्ध्यावर सोडून आत्महत्येला सोबत केलं जातं. मुळात हे असं का होत असावं ? याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं ठरतं.

सुंदर, समृद्ध असं आयुष्य जगायचं सोडून व्यक्तीला आत्महत्येला आपलं का करावसं वाटतं? खरंच आत्महत्यांनी आयुष्याच्या प्रश्नाचे कोडं सुटू शकतं का ? याचे उत्तर अंतर्मनातून हे नकारार्थीच यायला लागतं. मात्र तरीपण जीवन जगणं सोडायचं आणि आत्महत्येला जवळ करायचं हे कितपत योग्य ठरतं?

प्रत्येक व्यक्तीला निर्मिकाने सर्वांगीण सुंदर आयुष्य जगण्यासाठी संधी दिली असावी. या संधीचं सोनं करायचं आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मनमुरादपणे जगायचं. आयुष्यात आलेल्या प्रत्येक सुख दुःख, संकट आणि आनंदाला तेवढ्याच तत्परतेने स्वीकारायचं. त्यासाठी मनाच्या गाभाऱ्याला वाहत्या झऱ्याप्रमाणे मोकळ सोडायचं. तेव्हाच मनाचं रितेपण होतं आणि जगण्यातील कोतेपण जातं.

मन मोकळं झालं की आलेल्या संकटांना पुन्हा निर्भयतेने सामोरं जायचं बळ मिळतं. मनगटातील बळ हे लढण्याचं आणि मनातील बळ हे घडण्याचं व वाढण्याचं आत्मबळ देत राहतं. हे दोन्ही बळ आत्मसात करणे जीवनात आवश्यक ठरतं. ज्यांचं आत्मबळ कमकुवत ठरत, त्यांनाच आत्महत्येला आपलं करावसं वाटत असावं.

मुळात व्यक्तीला आत्महत्या का करावीशी वाटत असावी ? याचं गांभीर्याने चिंतन करणे गरजेचे ठरतं. आत्महत्यांचे मूळ हे अंतर मनाच्या गाभार्‍यात जोडलेलं असतं. मनाच्या गाभाऱ्याची गर्तता ओळखली की आयुष्याचं जगणं सुंदर होत जातं. या दोन्हीची नाळ व्यक्तीला आपलेपणाने व आपुलकीने जपता येणं आवश्यक आहे.

पण… मनाचं सामर्थ्य कुणाला ओळखता तरी आलं का? मन, मेंदू व विचार ही मानवी जीवनाला समृद्ध करणारी साधनं ठरतात. या साधनांना उजळणं आणि पाजळणं प्रत्येक क्षणाला करावं लागतं.

श्यामची आईतून साने गुरुजींनी समाजाला खूप सुंदर विचार दिलेत. आजही त्याच्या विचारांचं अवलोकन केलं जातं. त्यांचा शेवट काय होता? मन खंबीर करण्यासाठी शिक्षण देणारे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी घेत स्वतःला का संपवितात ?

पद-पैसा-प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व नव्हे हे डॉ. उदयसिंह देशमुख उर्फ भय्यु महाराज यांनीच सांगितलं आणि सिद्धही केलं, मात्र त्यांनीही आत्महत्या करून जीवन संपविलं. नैराश्यातून बाहेर कसं पडायचं हे डॉ. शीतल आमटे कर जगी यांनी सर्वांना सांगितलं. पण स्वतःच्या जीवनात आत्मसात करणं अशक्य झालं. त्यांनीही जीवनाचं कठोर पाऊल उचलत आत्महत्या केली.

सुशांत सिंह राजपूत यांना पॉझिटिव्ह विचार देणारे चित्रपट केलेत. मात्र स्वतःचे आयुष्य पॉझिटिव्ह करणेच विसरून गेला आणि आत्महत्या करून जीवन संपवलं. तर काल-परवा टिक टॉक स्टार समीर गायकवाड चव्हाण यासारखे कितीतरी नावं देता येतील, ज्यांनी स्वतःचा आयुष्य संपवलं.

अपयश, निराशा, ताण, स्वप्नभांग यावून अनेकांनी आत्महत्या, गोळीबारी, विष प्राशन करून स्वतःच आयुष्य नाहीसं केलं. आणि याच वाटेवर अजून कितीतरी तरुण तरुणी उभे आहेत. का उचलावी वाटत असतील यांना अशी टोकाची पाऊल?

एकंदरीत या माणसांचं सामाजिक, सांस्कृतिक आध्यात्मिक व राजकीय जीवन हे पूर्णार्थाने भरलेलं असेल..! मात्र त्यांचं व्यक्तिगत जीवन व्यथा वेदनानी भरलेलं असावं. एकीकडे पद पैसा, प्रतिष्ठा, अमाप असेल मात्र मनाचा व्याप व थरकाप थक्क करणारा असेल.

एकीकडे जिवनाची उत्तुंग शिखरे घातले असतील तर दुसरीकडे मनाच्या गाभार्‍यात कधीच शिरता आलं नसावं. एकीकडे सुख, शांती, समृद्धी व आनंद मनमुरादपणे अनुभवला असेल मात्र आपलेपणानं व आपुलकी न बोलणारा जीवनात गमावला असेल.

आयुष्य हे असंच असतं. जितकं जगायला जाऊ तितकं कमीच पडत जातं. त्यामुळेच काय घ्यायचं आणि काय सोडायचं इतकं तरी कळलं तरी आयुष्याच जगणं सुकर व सुखकर होतं जातं.

माणसाचं वरवरचा दिसणं खंबीर असू शकतं पण मनाचं खंबीर असणं गरजेचं ठरतं. चेहऱ्यावर असलेलं अंतर्मनात असतच असं नाही. अंतर्मनात असावं तेच चेहऱ्यावर भासाव इतकच जीवनाचं कोडं असतं.

आनंदी चेहऱ्याच दुःख अंतर्मनातून जाणून घेता यावं. आपलेपणानं कुणाशी दोन शब्दांचं संभाषण सांधता यावं. आयुष्याचे कोडं सगळ्यांनाच असतं पण हे कोडं सोडवता आला नाही, म्हणून जगणं सोडायचं नसतं. जिथं सर्वकाही सोडावं असं वाटतं, तिथं आपलेपणाने मागं ओढणार कुणी आपुलकीचं असावं. पुन्हा नव्या उमेदीनं.. नव्या आशेनं.. नव्या जिद्दीनं.. जगणं सांगणार…

आत्महत्येनं आयुष्याचं कोडं सुटत नसतं. तर आयुष्याचं कोडं हे आत्महत्येच्या विचाराने पुन्हा वाढत जात असतं. आयुष्याचं कोडं सोडवायचं तर आलेल्या संकटात आणि समस्यांना सर्वार्थाने सामोरं जायचं असतं. मनात नैराश्य, अपयश, चिंता आली तर मित्रांच्या सोबतीनं एकमेकांच्या सानिध्यात जावं.

मित्र व प्रेमानं अनेकांना आपलंसं करून ठेवलय. उमेदीची पालवी मनाच्या गाभाऱ्यातून पुन्हा अंकुरा वी आणि जीवन सर्वांग सुंदर बनत जावं. हे आयुष्याचं लेणं एकमेकांच्या प्रती जपाव… वाढवावं… आयुष्याचं कोडं आनंद व आपुलकीच्या ओलाव्यानं सोडवत जावं, या क्षणापासून त्या क्षणापर्यंत…

आत्मभान जगण्याचं ! या सदरातून…



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आयुष्याचं कोडं हे आत्महत्येनं सुटत नसतं !!”

  1. Actually खूप वर्षांपूर्वी माझ्या मनात सुद्धा असं काही करावं असं होतं परंतु वेळेवर पत्राद्वारे गुरुमहाराजांना कळल्याने त्यांनी त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून आमच्या गावी आले व तसे येण्याआधी मला कळवले नंतर मी त्यांच्या दर्शनाला गेलो व नंतरचा अनर्थ टळला .
    वेळीच आपण काय पावलं उचलतो त्यावर सर्व अवलंबून आहे .
    धन्यवाद!!!!????

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!