ध्यान
मयूर जोशी
गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे.
मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो.
खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.
असो तर,
आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो. हल्ली तर मेडिटेशन करण्याचे फॅड आले आहे. मी मेडिटेशन सुरू केले आहे असे सांगणारे भरपूर जण आजूबाजूला दिसतात.
मग त्यामध्ये काही दिवस ते करून झालं की आपल्याला जमत नाही म्हणून सोडणारे त्यात 90% असतात. मला नाही जमत ध्यान करायला किंवा माझे ध्यान लागतच नाही, मी ध्यानाला बसल्यावर त्याच वेळेला सगळे विचार चालू होतात, पुरुषांना उद्या असलेल्या ऑफिसच्या मिटिंग आणि काम आठवतात तर बायकांना उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचे आहे असे सर्व विचार ध्यानात यायला सुरू होतात…. असे विविध प्रकार ऐकायला मिळतात.
परंतु मुळातच ध्यान काय आहे आणि कशासाठी आहे हे खोलात जाऊन समजून घेण्याचा आणि सांगण्याचा प्रकार तसा कमीच. श्वासावर लक्ष ठेवा किंवा मनामध्ये एखाद्या दैवताची किंवा आपल्या गुरु ची मूर्ती समोर आणा किंवा मेणबत्तीच्या, निरांजनाच्या ज्योती कडे एक टक बघा किंवा काळया बिंदूकडे एक टक बघा असे विविध उपाय असतात.
ध्यान किंवा मेडिटेशन हे एक औषध आहे किंवा एक हत्यार आहे. ज्याच्या सहाय्याने आपले मन इकडे तिकडे विखुरलेले असते त्याला कसे एकत्रित करून एकाच बिंदूवर फोकस करता येईल. म्हणजेच थोडक्यात ज्यांचे चित्त व मन विचलित आहे त्यांनाच ध्यानधारणा करण्याची गरज असते.
त्यामुळे ध्यानाला बसल्यावर माझ्या मनात वेगवेगळे विचार येतात हे तक्रारच पूर्ण चुकीची आहे. कारण ज्याचे चित्त व मन हे पूर्णपणे एकाग्र असते त्याला ध्यानाची गरज लागणार नाही.
ज्याप्रमाणे आपल्याला एखादा रोग झाला किंवा आजार झाला तर मग आपण डॉक्टरांकडे जातो. जर आपल्याला काहीच झाले नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊ का किंवा ती गरज तरी असेल का? त्याचप्रमाणे जो मनुष्य अत्यंत एकाग्र आहे त्याला ध्यानाची काय गरज??
असो भरपूर टीका करून झाली. आता मूळ मुद्द्याकडे वळतो.
ध्यानाची गरज काय?
मनुष्याच्या आयुष्याचे ध्येय आहे ते म्हणजे पूर्णपणे आनंदी व समाधानी होणे. हा आनंद किंवा समाधान हा बाहेरील वस्तूंवर किंवा व्यक्तींवर कधीच अवलंबून नसतो. ते आपल्या आतून यायला लागते.
म्हणजेच थोडक्यात स्वतःची जाणीव होणे व मी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे ही गोष्ट अनुभवणे हे मानवी जीवनाचे साध्य आहे. परंतु या शरीरामध्ये व मनाच्या आत मध्ये असलेला मी हा आपल्याला कधीच सापडतच नाही. कारण आपले मन विखुरलेले असते. जोपर्यंत मन पूर्णपणे आणि 100% एकाग्र होणार नाही तोपर्यंत तो मी सापडणे शक्य नाही. मग ते कसे करावे बरे?
त्याच्यासाठी ध्यानधारणा हा एक रस्ता आहे किंवा मार्ग आहे. असे अनेक मार्ग आहेत परंतु त्यातील सोपा व सहजपणे साधला जाणारा मार्ग म्हणजे ध्यान.
थोडक्यात आपल्या मनाला बाकी सर्व विषयांपासून व विचारांपासून निवृत्त करून आपले मन फक्त एका विचारावर किंवा एका गोष्टीवर पूर्णपणे लावून धरणे याचा अभ्यास म्हणजे ध्यान. म्हणजेच ध्यान हे अंतिम साध्य नाहीये. ते फक्त हत्यार आहे किंवा टूल आहे, जेणेकरून आपण आपले मन एकाग्र करण्यास शिकू.
ज्या लोकांनी कधीही ही एका जागी शांत बसून स्वतःच्या आत बघण्याचा प्रयत्न केलेला नसतो आणि जेव्हा ते ध्यानाला बसतात त्यानंतर मात्र शांत होण्यापेक्षा प्रचंड जास्त खळबळ झालेलीच त्यांना जाणवते. असे काही दिवस झाल्यावर ते गोंधळलेले होतात आणि मग त्यांना ध्यानाची एकाप्रकारे भीती वाटायला लागते.
कारण इतक्या आयुष्यामध्ये अश्या कोणत्याही गलिच्छ किंवा वाईट विचारांचा विचार मुद्दामून केलेला नसेल असे विकृत आणि भीतीदायक विचार देखील ध्यानाच्या वेळेला मनात येतात असे अनेकांना अनुभव आहेत. पण पण त्याला घाबरून ध्यान करणे सोडून देणे हे मात्र चुकीचे.
तर असे का होते हे माहिती करून घेतले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे धूळखात पडलेले एखादे भांडे स्वच्छ करायला घेतले की त्यामधून पहिले गढूळ आणि घाणेरडे पाणीच बाहेर निघते. काहीवेळाने नंतर मग स्वच्छ व निर्मळ पाणी येण्यास सुरुवात होते.
आपल्या अनेक जन्मांची व त्याच प्रमाणे या जन्माची पुटे आपल्या मनावर साठलेली असतात. ध्यान करणे म्हणजे थोडक्यात आपले मन स्वच्छ करत जाणे. त्यामुळे या स्वच्छतेला सुरुवात केली की प्रचंड वेगवेगळे विचार जे चांगले देखील असतील किंवा भयानक देखील असतील असे डोक्यामध्ये माजायला सुरुवात होणे हे नवल नाही. हे तर त्या स्वच्छतेची पहिली पायरी आहे आणि ते अत्यंत गरजेचे आहे.
काही दिवस किंवा महिने ध्यान केल्यानंतर देखील फारसा काही फरक नाही ही तक्रार देखील आढळून येते. तुम्ही कधी व्यायाम शाळा किंवा जिम लावली असेल तर हे लक्षात येईल की जिमच्या पहिल्या महिन्यात तुमच्या तब्येतीत फारसा काही फरक झालेला नसतो.
उलट सुरुवातीला काही दिवस प्रचंड अंग दुखून येते कारण शरीराला सवय नसते. पण त्याला घाबरून व्यायाम सोडून दिला तर त्याचा काय उपयोग? पण जर का रोज नियमितपणे त्याच वेळेला व योग्य आहार व निद्रा ठेवून जिम करण्यास सुरुवात केल्यावर तीन चार महिन्याने हळूहळू खरोखर फरक दिसून यायला लागतात. परंतु त्यासाठी अत्यंत नियमित असणे आवश्यक आहे.
ध्यानाच्या बाबतीत ही नियमितता कोण पाळते बरे? ज्याप्रमाणे आपण जिम लावून आरामात सोडून देतो तसेच ध्यानात देखील बऱ्याच जणांचे होते , नाही का? शरीराला पिळदार बनवण्यापेक्षा मनाला निर्मळ बनवणे नक्कीच जास्त कठीण आहे आहे पण अशक्य मात्र नाही पण त्यासाठी ती तळमळ हवी. त्यासाठी नियमितता हवी. एक वेळ व जमल्यास एकच जागा ही पक्की असावी.
आपले काम केवळ ध्यानाला बसणे इतकेच असते. ध्यान लागेल किंवा लागणार नाही ही काळजी आपण करायची नसते. ज्यांचा ज्या गोष्टीवर विश्वास असेल त्यावर ही कामगिरी सोडून द्यावी. म्हणजेच आपण ध्यानाला त्याच वेळेला बसण्याचा प्रयत्न करावा.
त्यानंतर ज्या शक्तीला आपण मानतो मग भले ती मूर्ती असेल किंवा अद्वैता मधील निर्गुण निराकार असा परमेश्वर, त्यावर हा भार सोपवून द्यावा ते ध्यान लागले तरी तुझी इच्छा नाही लागले तरी तुझी इच्छा. आपण मात्र त्यावेळेला बसत राहावे. यासाठी प्रचंड चिकाटी लागते.
केवळ काही महिने नाही तर पाच वर्ष किंवा दहा वर्ष असा वेळ लागतो. ज्याप्रमाणे रोज व्यायाम शाळेत गेल्यावर वर्षभराने आपल्याला आपोआप झालेला आपल्या शरीरामधील बदल अत्यंत सुखावह असतो तसेच वर्षानुवर्षे केलेल्या ध्यानामुळे होणारी प्राप्ती नकळत व प्रचंड मिळालेली असते.
लोकांचे अनुभव वाचून किंवा ऐकून ध्यान करण्यात काही अर्थ नसतो. आपल्याला देखील तसे अनुभव किंवा दर्शने किंवा कुंडलिनी जागृत होणे अशा अनुभवांची अपेक्षा वाढत राहते. त्यामुळे ध्यानाला आपल्या वेळेवर बसणे व पुढचा भाग आपल्या गुरुवर किंवा दैवतावर किंवा आपण ज्याला मानतो त्यावर सोपवून मोकळे होणे हे सगळ्यात सोपे आहे.
आता हे झाले सर्व प्राथमिक गोष्टींविषयी.
एका आत्मसाक्षात्कार व्यक्ती ने मला सांगितले होते की ध्यानाच्या तीन प्रक्रिया असतात. ध्यानाला बसणे, ध्यान लावणे आणि ध्यान लागणे.
यामध्ये ध्यानाला बसणे या प्रक्रियेत आपल्या शरीराला समजवायचे असते ही बाबा 24 तास मधले 23 तास तर तुला जसे हवे तसे तू करत असतोस. आता अर्धा तास किंवा तासभर अजिबात वळवळ करू नकोस. किंवा कोणत्या मागण्याही करू नकोस. असे सांगून ध्यानाला बसणे ही पहिली प्रतिक्रिया.
ध्यान लावणे म्हणजे एकदा शरीर स्वस्थ झाले की मग आपल्या पंचेंद्रिये यांना हळूहळू बंद करीत जाणे. डोळे कान स्पर्श या त्यातील मुख्य इंद्रियांना हे सांगावे की दिवसभर तुम्हाला हवे ते ऐकत असता बघत असता, आता आजूबाजूने कितीही आरडाओरडा ऐकू आला किंवा समोर कितीही सुंदर दृश्य दिसत असले तरी थोड्या वेळासाठी जरा बंद पडा.
मनाला मनानेच समजावून सांगावे लागते की आता कितीही विचार मनात आले तरीदेखील ते येऊ देत परंतु त्यावर लक्ष ठेवू नकोस. विचार येतील आणि जातील परंतु कोणत्याही विचाराला पकडून त्यावर अजून विचार करण्यास सुरू करू नकोस.
ध्यानाला बसणे ही प्रक्रिया त्यामानाने सोपे परंतु ध्यान लावणे या प्रक्रियेला अनेक वर्ष देखील जाऊ शकतात. परंतु ते चिकाटीने करत राहणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्यातून जो काही फायदा होतो त्याला या जगात कोणत्याही गोष्टीने मोल देऊन विकत घेता येऊ शकणार नाही. त्यामुळे कितीही महिने किंवा वर्ष लागली तरीदेखील यात खंड पडता कामा नये याची काळजी घ्यावी.
ध्यान लावणे ही प्रतिक्रिया हळूहळू सवय बनत जाते. त्यानंतर त्यासाठी मुद्दामून खटाटोप करावी लागत नाही. आपोआप कानांना आजुबाजूचे ऐकू येत असेल तरीदेखील मेंदूपर्यंत या गोष्टी पोहोचत नसल्याने त्याची जाणीव निर्माण होणे बंद होते. असेच प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत घडत जाते जेणेकरून मनाला विचार करण्यासाठी आवश्यक असलेले एक शारीरिक इंधन बंद होऊन जाते.
मनाला देखील कितीही विचार आले तरी देखील त्याकडे लक्ष द्यायची सवय लागते. मग हळूहळू विचारांचा प्रवाह देखील कमी होऊ लागतो. मग खरी शांतता अनुभवायला सुरुवात होते जी शब्दातीत आहे. यातून मग आपोआप ध्यान लागणे चालु होते व क्रमाक्रमाने त्याची परिणिती पातंजल ऋषींनी सांगितल्याप्रमाणे, धारणा व शेवटी समाधी पर्यंत होत जाते.
त्यामुळे या सगळ्या लिखाणाचा सारांश एकच आहे की एक वेळ व शक्यतोवर एक जागा या गोष्टी ध्यानासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जागा जरी बदलली तरीदेखील ती वेळ साधणे फार गरजेचे आहे. आपण एका जागेवर बसून ज्या कोणत्याही शक्तीला किंवा स्वतः मधीलच स्वतःला जागवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला. ते दैवत किंवा ते गुरु किंवा ती शक्ती यांनादेखील ती सवय लागते की त्या वेळेला ते आपली वाट बघतात.
या सगळ्या गोष्टींमध्ये दैवी किंवा अमानवी किंवा अध्यात्म परमार्थ असे प्रकार कुठेच नाहीत. ज्याप्रमाणे जिम मध्ये जाऊन व्यायाम केले असता शरीर बलवान बनते त्याचप्रमाणे वरील मनाचा व्यायाम केल्याने मनाला निर्मळता व आनंदाने समाधान हे मिळतेच.
या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी मी कोणी महान नाही. अत्यंत अतिसामान्य आणि छोटा असाच आहे मी. हे फक्त बुद्धीचे उपद्व्याप असतात व लोकांनी प्रश्न विचारलेले असतात म्हणून हा सगळा लिखाणाचा प्रपंच.
परंतु मी स्वतः अननुभवी व अत्यंत लहान आहे. मोठ्या संतांनी आणि आत्मसाक्षात्कार ई लोकांनी सांगितलेल्या गोष्टी मी फक्त येथे पोपटपंची करून मांडत असतो इतकेच माझे काम. त्यामुळे त्यात चुका व्हायची देखील प्रचंड शक्यता आहे. त्यामुळे त्या चुकांना आपण मोठ्या मनाने माफ कराल अशी अपेक्षा आहे.
या सर्वातून कोणाचाही फायदा झाला तर त्याचे श्रेय केवळ त्या सर्व आत्मसाक्षात्कारी संत व योग्यांचे आहे.



हा लेख खुपच आवडला, कारण त्यातल्या भरपूर काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत,….. सुंदर लिखाण आहे… ???
Very nice post.