एक दिवस : मोबाईल शिवाय
सौ. भारती गाडगिलवार
काही दिवसांपूर्वी एक हाॅलीवुडचा चित्रपट बघितला होता ” Baby’s day out.” हा चित्रपट एका एक वर्षाच्या मुलाच्या धमाल मस्तीवर आधारित आहे. तो कसा किडनॅप होतो, त्यातुन तो कसा निसटतो, आपल्याला किडनॅप करणाऱ्याच्या नाकात नऊ कसे आणतो याभोवती कथा फिरते. यावरुनच एक कल्पना सुचली की, एक दिवस मोबाईल शिवाय असु शकतो का?
आज जो मोबाईलचा सुळसुळाट झाला आहे, मोबाईल म्हणजे एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. परंतू चांगले आहे तर वाईटही याप्रमाणे मोबाईल च्या उपयोगिते प्रमाणे मोबाईलचे दुष्परिणाम देखील आहेतच.
तसे पाहता ही अशक्य बाब आहे पण विचार करुन बघा, जर मोबाईल जवळ नसल्यास आपली एक दिवसाची दिनचर्या कशी असेल?
एक दिवस आपण मोबाईल शिवाय कल्पना करु शकतो का?
आज मोबाईल शिवाय एक क्षण कठीण असतो. सकाळी उठल्या उठल्याच हातात मोबाईल हवा असतो, असे चित्र प्रत्येक घरात पाहायला मिळते. मोबाईल मुळे जीवन सहज झाले आहे यात वादच नाही. परंतु नात्यातील ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम या भावना लोप पावत चाललेल्या आहेत.
एक शुष्क पणा जाणवतो. संवाद हरवत आहेत. ती कधी काळी असलेली नात्यातील ओढ, आई बाबा बाहेर गेले तर बाहेरून येताना बाबा खाऊ आणा ह म्हणणे. त्यासाठी वाट बघणे. आॅफीसमधून परतल्यावर बाबा, बाबा म्हणत बिलगणारी मुलं आज बाबा घरी आले तरीही आपापल्या मोबाईल मध्ये गुंतलेली दिसतात.
सुटीच्या दिवसांत घरी येणारे पाहुणे त्यांच्यासाठी पाहुणचाराची लगबग, त्यांच्या सोबतची मस्ती आता कमी होते आहे. मोबाईल मुळे विडियो काॅलवर सगळ्यांचीच भेट होत असल्याने आता एकमेकांकडे कारणानेच जाणे होते.
मोबाईलने जसे जीवन सोयीस्कर झाले असले, तरीही त्याचे काही दुष्परिणामही आहेतच. मोबाईल मुळे निद्रानाश, डोके दुखी, कानांचे दोष, डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
त्यामुळे बऱ्याचदा घरात सारखी ओरड सुरु असते की, जरा वेळ मोबाईल बाजूला ठेव, सतत हातात मोबाईल असतो त्याच्यामुळे डोळ्यावर तर परिणाम होणारच ना….. याप्रमाणे. शिवाय आपापसांतील संवादाचे रुपांतर विसंवादातही होताना दिसते.
यावर उपाय म्हणून आपण किमान आठवड्यातून एकदा तरी मोबाईल हाताळू नये. कल्पना करायला काहीच हरकत नाही. आपण म्हणतो की, ही अशक्य बाब आहे. पण अशक्य अशी कोणतीही गोष्ट कधीच नसते. अवघड वाटणारी गोष्टही प्रयत्नाने शक्य होते. तेव्हा यावर एकदा विचार करायला हवाच.
आपल्या कडे बऱ्याचदा उन्हाळ्यात लोड शेडींग असते इलेक्ट्रीसिटीचे, होय ना. दिवसातील ६ ते ७ तास घरात लाईट नसतात. एवढ्या गरम वातावरणात देखील मनुष्य तडजोड करतोच ना?
तसेच जर एक दिवस आपण मोबाईल बंद ठेवला तरीही आपल्या जीवन शैलीत फारसा फरक पडत नाही. उलट आपण कुटुंबातील व्यक्तींच्या अधिक जवळ जाऊ शकतो. दिवसभरात घरातील स्त्रीया किती मेहनत घेतात हे समजते.
कोणत्या तरी काळजीने एखादा सदस्य घरात वावरतोय हे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून समजते, आज आपण सगळे मिळून एखादा बेत करुया असे वाटते. सर्वांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या जातात. जे आज मोबाईल मुळे क्वचितच पाहायला मिळते.
एखाद्या विक एंडला सारे मिळून कुठेतरी धमाल करायला जाता येते. या सर्वातून प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी अगदी मनापासून जोडल्या जाऊ शकतो. नात्यातील ओलावा, प्रेमळ शब्दांनी केलेली विचारपूस, प्रेमाची उधळण हे सारं काही शक्य आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याला केवळ आत्मिक सुखाची इच्छा असते. पण वेळेअभावी किंवा नात्यातील औपचारिकता यामुळे हे शक्य होत नाही. प्रयत्न करणे मनुष्याच्या हातात आहे, प्रयत्नांनी आपल्याला आपल्या जीवनात आनंद निर्माण करता येतो असे मला वाटते.
शेवटी मोबाईल सारखे सुख देणारी यंत्रे मानवानेच मानवाच्या सुखासाठी निर्माण केली आहे. त्यांच्या आहारी जाऊन आपल्या जीवनात शुष्क पणा आणण्यात कसला शहाणपणा?
म्हणूनच म्हणावेसे वाटते की, किमान एक दिवस तरी आपण मोबाईलशिवाय जगले पाहिजे.


