साधा ताप आल्यास हे घरगुती उपाय करून पहा !!
आपलं मानसशास्त्र टीम
शरीराचे नेहमीचे तापमान वाढले कि ताप आला असे समजावे. आपल्या शरीराच्या रोजच्या कार्यमध्ये काही अडथळा निर्माण झाला आहे, हे ओळखण्याची खूण ताप येणे हि आहे. मोठ्या माणसांनाही बऱ्याच वेळा ताप येतो.
निरोगी माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६* से. ते ३७.५* से. किंवा ९८.४* फॅ. ते ९९.५ फॅ. या दरम्यान असते. तुम्ही काय खाता, व्यायाम कसला करता, त्याचप्रमाणे तुमच्या भोवतीच्या वातावरणातील तापमान किती असते यावर त्यामध्ये थोडाफार फरक पडतो, एवढेच. मध्यरात्रीनंतर म्हणजे रात्री दिड ते सकाळी सात या वेळात शरीर कमी गरम असते, तर दुपारी चार ते रात्री नऊ या वेळात शरीर सर्वात जास्त गरम राहते.
कारणे आणि लक्षणे
साधा ताप हा किंचित थंडी वाजून बहुधा येतो. त्याच वेळी डोके व अंगही दुखते. ताप येण्याच्या वेळी माणसाला खूप तहान लागते, अंग कसकसते, लघवीला कमी होते. हा ताप वाढत गेला तर नाडीचे ठोके जलद पडू लागतात आणि श्वासोच्छवासही जोरात होऊ लागतो. ताप उतरताना अंगाला दरदरून घाम येतो. लघवीलाही भरपूर होते.
ताप येतो ह्याचाच अर्थ शरीरात काही तरी बिघाड झालेला आहे आणि त्यासाठी शरीराने त्यावर प्रतिहल्ला करण्याची तयारी केलेली आहे. बऱ्याचदा आजारांमध्ये ताप येणे हि त्या आजाराची प्राथमिक सुरुवात असते. काही आजारांमधील ताप हि आजाराची दुसरी अवस्था असते.
परंतु कुठल्याही प्रकारचा ताप येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात दूषित पदार्थ साठले आहेत हे असते. अनेकदा चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि अस्वच्छता या दोन गोष्टींमुळे शरीराचे निरोगीपण जाते. म्हणूनच आपले शरीर पुन्हा निरोगी व्हावे यासाठी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी तापाच्या वाटेने ते प्रयत्न करते.
उपचार
१) तुळस
सध्या उपचारासाठी तुळशीचा घरगुती उपचार गुणकारी ठरतो. अर्था लिटर (साडेतीन कप) पाण्यात सुमारे १०-१२ ग्रॅम तुळशीची पाने उकळवावीत. हा तुळशीचा काढा दिवसातून दोन वेळा त्यात अर्धा कप साखर आणि थोडी कुटलेली वेलचीची पूड घालून प्यावा. ताप कमी होण्यास मदत होते.
२) मेथी
मेथ्या घालून केलेला चहा हे कोणत्याही गोळ्यांएवढेच प्रभावी औषध आहे. मेथ्या पाण्यात भिजवल्या कि थोड्याशा चिकट होतात. मेथ्या घालून प्यायलेल्या चहामध्ये शरीरातील चिकट पदार्थ विरघळवून टाकण्याची क्षमता असते. म्हणूनच मेथ्यांचे पाणी हे शरीर स्वच्छ आणि शांत करणारे पेय आहे.
३) केशर
पाव काप उकळत्या पाण्यात अर्धा चमचा केशर मिसळून केशराचा चहा तयार करावा. ताप आलेल्या व्यक्तीला दर तासातासाने केशराचा चहा ताप उतरेपर्यंत पाजत रहावे. हा घरगुती उपाय खूपच गुणकारी आहे.
४) मनुका
२०-२५ मनुका अर्धा कप पाण्यात भिजत घालाव्या आणि त्याच पाण्यात कुस्कराव्या. हे पाणी गाळून घ्यावे. त्यामुळे मनुकांची साल पाण्यात राहत नाही. या मनुकांच्या पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घातल्याने त्याची चव आणि उपयुक्तता चांगलीच वाढते. हे पाणी दिवसातून २ वेळा प्यावे.
५) जर्दाळू
एक कप जर्दाळूचा रस व एक चमचा ग्लुकोज पावडर किंवा मध एकत्र करून हे मिश्रण अंगात ताप असताना प्यावे. या पेयाने तहान भागते, शांत वाटते. शिवाय शरीरातील दूषित पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
६) पपनस
तापाने आपल्या अंगाची लाहीलाही होते. ती कमी करण्यासाठी पपनसाचा रस प्यावा. हा रस अर्धा पेला पाण्यात मिसळून प्यायल्याने रोग्याची तहान कमी होते आणि आग कमी होते.
७) संत्र्याचा रस
कुठल्याही प्रकारच्या तापावर हा रस उत्तम अन्न म्हणून उपयोगी पडतो. कारण बऱ्याचशा तापांमध्ये माणसाची पचनशक्ती मोठ्या प्रमाणात बिघडलेली असते. आपल्या रक्तामध्ये विषारी पदार्थ तयार होतात. अशावेळी संत्रे उपयुक्त असते.
८) रोजमेरी
हि एक वनस्पती असून ताप उतरविण्याचे काम करते. १५ ग्रॅम वनस्पती सुमारे दीड-दोन कप पाण्यात भिजत घालून हे पेय दिवसातून दोन वेळा घेऊन संपवावे त्यामुळे घाम येऊन ताप उतरतो आणि घामावाटे विषारी घटक बाहेर पडतात.
९) घेटुळी
घेटुळी किंवा पुनर्नवा हि वनस्पती तापावर चांगली उपायकारक आहे. घेटुळीची १५ ग्रॅम पाने दीड-दोन कप पाण्यात भिजत घालावी. अशाप्रकारे बनवलेले हे पेय दिवसातून दोन वेळा प्यावे.
आहार.
तापावर उपचार सुरु करताना प्रथम संत्र्याचा रस आणि पाणी एवढेच प्यावे. सकाळी ८ ते रात्री ८ असे दिवसभर दर दोन तासांनी कोमट पाण्यात संत्र्याचा रस घालून प्यायला द्यावा. ताप उतरला आणि रोग्याची जीभ स्वच्छ दिसू लागली कि रोग्याला दिवसातून ती वेळा रसाळ फळे खायला द्यावी. त्यानंतर हळू हळू त्याच्या वयानुसार त्याला नित्याचे जेवण घेऊ द्यावे. अर्थात त्यात ताजी फळे आणि कच्चा किंवा किंचित उकडलेल्या भाज्या यांचा भरणा असावा.
इतर उपाय.
रोग्याचे स्वच्छ राहण्यासाठी सुरुवातीला गरम पाण्याचा एनिमा रोज द्यावा. ताप जर १०३* फॅ. पेक्षा जास्त असेल तर कपाळावर गार पाण्याचा घड्या ठेवाव्या. त्या ठेवूनही ताप उतरला नाही तर सर्व अंगावर लांबसर कापडाचे आवरण ओले करून ठेवावे.
डोक्यापासून पायापर्यंत गार पाण्याने दोनदा पुसून काढल्यावर रोग्याच्या शरीरावर पातळ परंतु गरम पांघरून घालावे. ताप जास्त असल्यास दर तीन तासांनी हा उपचार करावा. रोग्याच्या पायांवर आणि अंगाच्या दोन्ही बाजुंना गरम पाण्याच्या बाटल्या ठेवल्यानेही ताप खाली येतो.


