मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी महत्वाचे १० टिप्स !!
मिनल मोरे
(संकलन)
आज आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला असे व्यक्ती दिसतील जे शरीराने तर हेल्थी आणि फिट दिसतात पण आतल्या आत ते पूर्णपणे खचलेले असतात. जर आपल्याला शारीरिक रित्या स्वतःला जपायचं असेल तर आपण मानसिक स्वास्थ्य जपण्याला प्राधान्य द्यायला हवं. बाकी सर्व गोष्टी आपल्याला बाहेरून विकत घेता येतील.
पण मानसिक स्वास्थ्य मात्र आपल्याला स्वतःकडूनच मिळणार, जर आपण स्वतःची पुरेशी काळजी घेतली तर. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी काही महत्वाचे टिप्स पाहूया..
१) पुरेशी झोप
पुरेशी झोप घेणे हे आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम टिकवण्यासाठी महत्वाचे असते. मेंदूमधील रसायन नियंत्रित करणे आणि माहिती पुढे पाठवण्यासाठी झोप मदत करते आणि हेच रसायन आपल्या मनाचा कल आणि भावना व्यवस्थापित करण्याचे कार्य करते. आणि आपण नियमित पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला उदास वाटणे, चिंताग्रस्त वाटणे अशा समस्यांची सुरुवात होते.
२) योग्य आहार
योग्य आणि पुरेसा आहार घेणे हे फक्त शरीरालाच नव्हे तर मनासाठी सुद्धा तेवढेच महत्वाचं असतं. आहार जर पुरेसा नसेल तर शरीरात कमतरता निर्माण होते.
उदा. आयरन, व्हिटॅमिन बी-१२ आणि अशा खनिजांच्या कमतरतेमुळे मनाचा मूड डाऊन होतो. जर तुम्ही चिंताग्रस्त असाल, जास्त ताणतणावात असाल तर चहा-कॉफी यांचे सेवन टाळायचा प्रयत्न करा. कारण त्यामधले द्रव्य चिंताग्रस्त होणे, भिती वाटणे यासाठी कारणीभूत ठरतात.
३) व्यसनापासून मुक्त व्हा.
दारू, सिगरेट, ड्रग्स यांचे सेवन केल्यामुळे आपले पैसे खर्च होतात. इतकच नसून त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडते. जर तुम्ही दारूचे सेवन केले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जास्त ताण जाणवेल. जेव्हा अतिप्रमाणात दारूचे सेवन केले तर त्यामुळे लक्ष केंद्रित करण्यास अडथळे निर्माण होतात आणि त्यासोबतच स्मरणशक्ती कमी होत असते. गोंधळणे, डोळ्यांचे त्रास अशा अनेक समस्या दारूचे सेवन केल्यामुळे होतात.
तसेच सिगरेटचा परिणाम शरीर आणि मेंदूवर होऊन चिडचिड करणे, चिंताग्रस्त होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. ड्रग्स घेतल्यामुळे मनाचा मूड खूप जास्त कमी होणे, चिंताग्रस्त होणे यासोबतच मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचे कार्य ड्रग्स करते.
४) पुरेसा सूर्यप्रकाश घेणे.
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन-डी चे मोठे स्तोत्र समजले जाते. व्हिटॅमिन-डी हे शरीरासाठी आणि मेंदूसाठी महत्वाचे आहे. यामुळे मनाचा मूड सुधारतो. शक्यतो जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात बाहेर फिरायला जाणे, त्यासोबतच आपल्या डोळ्यांची आणि त्वचेची काळजी घ्यावी.
कमीतकमी अर्धा तास ते जास्तीत जास्त २ तास हि योग्य वेळ मानली जाते. हिवाळा ऋतूमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे बहुतेक लोक डिप्रेशन मध्ये जातात.
५) ताण-तणाव व्यवस्थापन.
ताण हा कधी दुर्लक्षित करता येत नाही. पण आपल्याला जाणवणाऱ्या ताणाचे मुख्य कारण कोणते हे शोधून येणाऱ्या ताण-तणावांना तोंड देत पुढे जाणे हि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याची चावी आहे. आपल्यासमोर असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि आपल्याला तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींची एक यादी बनवून त्या कमी-कमी कारण्याचा प्रयत्न करायचा.
जस जसे आपले ताण-तणाव कमी होतील तस-तसे लिहून नोंद करायची. त्यामुळे आपल्याला कळते कि त्याचे व्यवस्थापन करता येते. आपल्याला झोप लागत नाही किंवा सकाळी उठताक्षणी आपल्यासमोर त्याचीच आठवण येत असेल अशा ताण देणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी सकाळी उठल्यावर स्वतःच स्वतःला आव्हान देऊन त्यांचं योग्य व्यवस्थापन करावे.
६) ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाईज.
हि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाचं ठरते. ऍक्टिव्ह राहिल्यावर फक्त यश मिळते असे नसून त्यासोबतच आपल्या मनाचा मूड सुद्धा कायम चांगला राहतो. व्यायाम केल्यामुळे उतरता मनाचा मूड, ताण-तणाव, चिंता, थकवा आणि आळस यासारख्या समस्या कमी होतात. व्यायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते.
७) आनंद मिळेल अशा कृती करणे.
आपल्याला ज्यामधून आनंद मिळेल अशा गोष्टींसाठी वेळ काढणे. जर आपल्याला फिरायला जाणे, कॅरम खेळणे, पेन्टिंग, टीव्ही शो पाहणे, यातून खूप आनंद मिळत असेल, आपल्या मनाचा मूड चांगला राहत असेल तर त्यासाठी आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढलाच पाहिजे. जर आपण आपल्याला आनंद मिळणाऱ्या गोष्टी किंवा छंद जपले नाही तर आपण नाराज राहतो आणि आपला स्वभाव चिडचिडा होत जातो.
८) सामाजिक आंतरक्रिया जपणे.
नाती सांभाळणे, जपणे तसेच संधी मिळेल तश्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. मित्र असणे म्हणजे आपली चांगली ओळख आहे असे नसून मित्रांचा आपला मूड सांभाळायला खूप चांगला पाठिंबा मिळतो. संशोधनानुसार फक्त १० मिनिटे जरी दुसर्यांसोबत बोललो तरी आपली स्मरणशक्ती सुधारते.
जर आपल्याला लोकांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधने जमत नसेल तर आपण सोशल मीडियाचा वापर संवादासाठी करू शकतो. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढविल्यानंतर सुद्धा आपलं मन प्रसन्न राहते.
९) इतरांच्या कामाला येऊया.
दुसऱ्या व्यक्तीला मदत करणे हे फक्त त्या व्यक्तीसाठी चांगलं नसून त्यांना मदत केल्यामुळे आपल्याला सुद्धा आनंद मिळत असतो. आपण आपल्या जवळपासच्या लोकांना मदत करतो. या भावनेत खूप समाधान असते. सतत स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी सुद्धा मदतीचा हात दिला तर त्यातून मिळणारा आनंद आपल्याला प्रेरणा देतो.
१०) इतरांची मदत घ्या.
सगळ्यात जास्त महत्वाचा मार्ग ज्यामुळे आपण मानसिक स्वास्थ्य उत्तम जपू तो म्हणजे ज्यावेळी आपल्याला ठीक वाटत नसेल मानसिक समस्या जाणवत असतील त्यावेळी अतिविचार न करता आणि कोणताही चुकीचा मार्ग (आत्महत्या) आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत. मित्र परिवारासोबत बोलून त्यामधून मार्ग मिळवता येतो आणि मानसिक स्वास्थ्य जास्त बिघडले असेल तर मानसशास्त्र तज्ज्ञांना भेटून योग्य तो उपचार घेऊन मानसिक संतुलन ठेवता येईल.


