प्रत्येकवेळी ‘Attach’ रहण्यापेक्षा ‘De-Attach’ राहून जगुया.
मेराज बागवान
आपण नेहमी म्हणतो, टच मध्ये राहुयात कायम, संपर्कात राहुयात. आणि हे गरजेचे देखील असते. माणूस समाजशील प्राणी आहे, तो एकटा कधीच राहू शकत नाही. पण तरीही , एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे ‘ De-Attach’ रहायला शिकले पाहिजे.
कित्येकदा आपण , ‘ हे माझं आहे, मी निर्माण केलं आहे, माझा ह्या गोष्टीवर, ह्या व्यक्तीवर जास्त हक्क आहे’ असे काहीसे बोलतो, विचार करतो. पण यात देखील मर्यादा हव्यात. ‘माझं, माझं’ करण्यापेक्षा, चांगले कर्म करीत राहावे, निरपेक्ष वृत्ती अंगी बाणावी आणि सोडून द्यावे.
नेहमीच त्या गोष्टीशी बिलगून राहू नये. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘आई-वडील’ , प्रत्येक ‘आई-वडील’ कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मुलांना मोठे करतात आणि आयुष्यभर त्यांची साथ देतात आणि त्याचा कोठेही , कोणापाशी देखील गाजावाजा करत नाहीत.
आपण आयुष्यात खूप साऱ्या व्यक्तींशी ‘अट्याच’ असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांचे नेहमी चांगलेच व्हावे असे आपणास वाटत असते. पण कधी कधी काही व्यक्तींकडून आपण हळू हळू, नकळत अपेक्षा ठेवू लागतो.
आपण जसे त्या व्यक्तीसाठी ‘समर्पण’ दिले आहे, तसेच आपण समोरच्या व्यक्तिकडून अपेक्षा करतो.आणि मग , ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे कधी नाही वागली, आपल्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकली की आपला भावनिक गुंता वाढतो.
मग आपण त्या व्यक्तीसाठी किती किती आणि काय काय केले, आपल्याला तिची किती काळजी आहे , हे बोलून दाखवायला सुरवात करतो.पण या मुळे होते काय, तर नाती दुरावली जातात, अपेक्षांचे समोरच्याला ओझे वाटू लागते, मानसिक त्रास होऊ लागतो आणि मग हळू हळू नाते संपुष्टात येऊ शकते.
मग यातून काय शिकायचे, तर एकच गोष्ट ध्यानी ठेवावी, ‘कर्म करीत राहा,फळाची अपेक्षा ठेवू नका’.फक्त देत राहा, आणि गोष्टी सोडून द्यायला शिका. इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘ “Let It Go” . अगदी तसेच.
अनेकवेळा आपण एखाद्यासाठी खूप काही करतो, अगदी आयुष्य देखील अर्पण करतो. आणि मग ती व्यक्ति, आपल्याकडे या विषयी कधीच ‘कृतन्यता’ व्यक्त करीत नाही, आपल्याला ‘Thank you’ म्हणत नाही. आणि म्हणून मग आपण चिडतो, रागावतो, आणि मग ‘मी तुझ्यासाठी किती केलं’ अस काहीसं बोलू लागतो, व्यक्त होऊ लागतो. आणि आपण इथेच चुकतो.
अपेक्षा असणं वाईट नाही, पण त्याचा ‘अतिरेक’ नसावा. समोरच्या व्यक्तीवर आपला पूर्ण विश्वास असेल तर अशा पद्धतीने वागणे निरर्थक ठरते. म्हणून चांगले काम करीत राहावे, आणि सोडून द्यावे, ह्याने नाती आणखीनच बळकट होतील आणि आयुष्ये समृद्ध होतील.
सहजीवन, वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधात खास करून ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सहजीवन असले तरीही, प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते. प्रत्येकाला आपले असे एक ‘खाजगी’ आयुष्य असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीशी फक्त अमुक एक नाते म्हणून वागण्यापेक्षा, ‘एक माणूस’ म्हणून त्या व्यक्तीचा सर्वार्थाने स्वीकार करता आला पाहिजे.
आपण माणूस आहोत, चुका प्रत्येकाकडून होतात, पण त्या चुकांमधून शिकले पाहिजे, समोरच्या कडे प्रामाणिकपणे त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करता आली पाहिजे. आणि एवढेच नाही, तर तीच चूक पुन्हा होता कामा नये.
प्रत्येकाचा आदर करावा, प्रत्येकाचा स्वभाव आहे तसा स्वीकारता आला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे ‘आपण जरी समर्पण वृत्तीने त्या व्यक्तीशी वागत असलो, तरीही तशीच भावना त्या व्यक्तीकडून अपेक्षित करू नये, मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरीही.’
समोरची व्यक्ती जरी तुमचा प्रथम ‘प्राधान्यक्रम’ असली तरीही तुम्ही त्या व्यक्तीसाठी तसाच ‘प्राधान्यक्रम, Priority’ असालच असे नाही. कारण प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे असते, कित्येकदा आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. प्रत्येकजण ‘संघर्षाशी’ लढत असतो. फक्त ती व्यक्ती आपल्याकडे हे कधी बोलून दाखवीत नाही इतकेच.
म्हणून फक्त एक संकल्प करूयात, “निरपेक्ष वृत्तीने प्रेम करूयात,आदर करूयात, काळजी घेऊयात, आणखीन समजुतदार होऊयात आणि नाती जपूयात, नाती फुलवूयात”.
म्हणूनच शेवटी एकच म्हणावेसे वाटते , ‘प्रत्येकवेळी Attach राहण्यापेक्षा De-Attach जगायला आता शिकले पाहिजे’.


