Skip to content

आत्मविश्वासाचे रहस्य काय आहे ??

आत्मविश्वासाचे रहस्य काय आहे?


स्वाती जाधव


आपली विचार करण्याची पद्धत हेच रहस्य आहे आत्मविश्वासाचं. आपण जर स्वतःविषयी सकारात्मक विचार केले तर आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्य आनंदी वाटेल.

एक छोटी गोष्ट आठवली त्यावरून मला काय म्हणायचं आहे समजेल.

एक मारिया नावाची मुलगी होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्या घरात राहायची. साधारण २४-२५ वय असणारी मारिया जास्त उंच किंवा जास्त बुटकी नव्हती, खुपच सुंदर किंवा खुपच कुरूप देखिल नव्हती. मारिया एक जगात असणाऱ्या बाकी सामान्य मुलिंप्रमाणे अगदी साधी मुलगी होती.

आय टी कंपनी मध्ये काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यां प्रमाणे ती देखिल एका मोठ्या आय टी कंपनीत नोकरी करायची. तिचं आयुष्य नेहमी कंटाळवाणं असायचं. जास्त लोक तिला बोलत नसत. तिला कधीच कुणी जास्त महत्व देखिल दिलं नव्हतं आणि जरी महत्व दिलं तरी लोक तिला कंटाळवाणी मुलगी समजायचे.

तिला वाटायचं की ती कदाचित दुसऱ्या मुलामुलीं प्रमाणे सुंदर नाही म्हणुन तिच्याशी लोक बोलत नाहीत. या नकारात्मक विचारांमुळे ती नेहमी सर्वांपासुन अलिप्त राहत असे. रोज खाली मान घालुन ऑफिसला एकटी जाणार व येणार. या व्यतिरिक्त तीच्या आयुष्यात काही वेगळं ती काहीच करत नसे.

एके दिवशी मारिया ऑफिस ला जात असताना तिला टोप्यांचं नविन उघडलेलं दुकान दिसलं . बाहेरून बऱ्याच सुंदर टोप्या तिला दिसल्या म्हणुन ती दुकानात गेली. आत गेल्यावर तिला आईसोबत एक छोटी मुलगी दिसली जी टोपी विकत घेत होती.

आणखी बरेचजण खरेदी करताना व सर्व टोप्या स्वतःवर घालुन पाहताना दिसले. मग मारियाने देखिल स्वतः वर काही टोप्या घालुन पाहण्यास सुरुवात केली. एकानंतर एक बऱ्याच टोप्या डोक्यावर ठेऊन पाहिल्यावर, अखेर तिला एक टोपी आवडली. ती अतिशय सुंदर होती आणि मारियावर आणखीच छान दिसत होती.

दुकानात असणाऱ्या त्या छोट्या मुलीने मारियाकडे पाहिलं आणि ती तिच्या आईला म्हणाली, “आई बघ ना त्या दीदीला ती टोपी किती सुंदर दिसत आहे.” त्या मुलीच्या आईने मारियाची प्रशंसा केली की, खरोखर तुमच्यावर ती टोपी खुप अप्रतिम दिसत आहे.

तिथेच उभ्या असणाऱ्या एका वृद्ध माणसाने देखिल मारीयला सांगितलं की, ती त्या टोपीसोबत खुप छान दिसत आहे. मारिया मग आनंदाने आरश्यात स्वतः कडे पाहू लागली. कित्येक वर्षानंतर तिला असं स्वतः विषयी छान वाटु लागलं. मग तिने कॅश काउंटर ला जाऊन ती टोपी विकत घेतली.

दुकानाच्या बाहेर पडल्यानंतर तिला एक वेगळं जग दिसु लागलं. आजुबाजुला असणारे प्राणी पक्षी, झाडे या सर्व गोष्टींना पाहत ती चालू लागली. तिने या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं . तिला सर्व गोष्टी सुंदर वाटु लागल्या.

तितक्यात, एक व्यक्ती जो रोज चहा पिताना तिला दिसायचा त्याने तिला हाक दिली.”तु किती छान दिसत आहेस, माझ्यासोबत चहा घेणार का ?” असं विचारलं. यावर ती लाजली आणि पुढे निघुन गेली.

मारियाला मिळालेल्या नविन टोपीच्या आनंदात ती प्रसन्न मनाने ऑफिसला पोहचली. मारियाकडे कधीच लक्ष न दिलेल्या दार उघडणाऱ्या शिपायाने तिला इतक्या वर्षात पहिल्यांदा, स्मित हास्य देऊन आत यायला सांगितलं.

ऑफिस मध्ये सर्व जण आज तिच्याकडे विलक्षण नजरेने पाहत होते. तिची प्रशंसा करत होते. एकमेकांना मारिया छान दिसत आहे असं कुजबुजत होते.इतकंच काय, तर मारीयाच्या सरांनी तिला जेवणासाठी आमंत्रण दिलं.

इतका सुंदर दिवस पार पडल्यानंतर रिक्षात बसुन मारिया घरी जात असताना, आजच्या जादुई अविस्मरणीय दिवसाबद्दल ती विचार करू लागली. तिचं आयुष्य एका क्षणात कसं बदललं याने आणखी आनंदी झाली. तिच्या नविन टोपीचे मनात च आभार मानू लागली.

घरी पोहचल्यावर आई मारियाच्या चमकदार डोळ्यांकडे पाहत तिला म्हणाली, मारिया तु लहानपणी जशी तेजस्वी लुक लुकणारे डोळे करून पाहायचीस तशीच आज पाहत आहेस. किती सुंदर दिसतेय मारिया माझी.मग मारिया हसत तिच्या आई ला म्हणाली, हो आई !! ही सगळी जादु या सुंदर टोपीची आहे.

या टोपीमुळे कित्तीतरी वर्षांनी माझा इतका छान दिवस गेला. आता मात्र मारिया ची आई आश्चर्याने पाहु लागली, “अगं काय म्हणत आहेस तु मारिया ?कुठल्या टोपीविषयी बोलत आहेस बाळा ? हे प्रश्न ऐकुन मारिया क्षणार्धात चलबिचल झाली व डोक्यावर हात ठेऊन चाचपडू लागली, माझ्या आयुष्यात बदल घडवणारी टोपी कुठे गेली.

त्यानंतर ती आठवू लागली की तिने तिची टोपी नेमकं हरवली कुठे? रिक्षात विसरली?जेवणाच्या टेबलवर ? ऑफिस मध्ये? नाही. ती सुरुवातीपासून सर्व बाबी आठवायला लागली, तिने स्वतः ला आरशात पाहिले होते, तीने कॅश काउंटर ला पैसे दिले. अरे बापरे!

तिला आता आठवलं की, तिने पर्स मधुन पैसे काढताना टोपी काउंटर वर कशी ठेवली व ती टोपी तिथेच विसरून ती दुकानाबाहेर बाहेर पडली होती. डोक्यावर टोपी न घालता पण अतिशय आत्मविश्वासाने ती रस्त्यावरून चालत गेली होती.

आता लक्षात घ्या, की मारिया तिच्या त्या डोक्यावर घातलेल्या टोपीमुळे सर्वांना भारी, सुंदर वाटत नव्हती. तिने जे स्वतः च्या मनाशी सकारात्मक विचार केले जे तिच्या चेहऱ्यावर झळकले. त्या विचारांमुळे ती आत्मविश्वासाने वावरत होती या. म्हणुन तिचा पुर्ण दिवस अविस्मरणीय, वेगळा गेला होता.

न घाबरता, नकारात्मक विचार न ठेवता जगल्याने सर्व गोष्टीत अमुलाग्र बदल होतो. आपण आपल्या मनाशी काय, कसे वाक्य बोलतो त्यामुळे आत्मविश्वास वाढतो किंवा कमी होत असतो आणि त्यावर आपलं काम, आपली प्रगती अवलंबून असते.

हे सकारात्मक विचार येण्यासाठी स्वतः ला वेळ द्यावा लागेल, स्वतः ला समजुन घ्यावं लागेल. रोज त्याच त्या गोष्टी करणं थांबवुन नविन गोष्टी अनुभव घ्यायला लागतील.आत्मविश्वासाने जगण्याचे असंख्य फायदे मग तुम्हाला आपोआप अनुभवायला मिळतील.

स्त्रोत्र: स्टोरी ऑफ मॅजिकल हॅट.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!