“मी खूप emotional आहे, काय करू?”
वसुधा देशपांडे-कोरडे
माइंडमास्टर कौंसेलर्स, पुणे
काही दिवसांपूर्वी एका ग्रुपवर एक प्रश्न वाचला,
“मी खूप emotional आहे, काय करू?”
Emotional आहे, म्हणजे चटकन रडू येतं वगैरे त्या ताईंना म्हणायचं असावं. आपल्या रोजच्या आयुष्यात चटकन रडू येणाऱ्यांसाठी आणि मनात भावनांचा कल्लोळ असणाऱ्यांसाठी हा शब्द वापरला जातो.
इमोशनल असणं, हे तुम्ही माणूस असल्याचं लक्षण आहे.
इमोशन्स म्हणजे भावना. मग ह्यांत जसं दु:ख आलं तसाच आनंदही आला. द्वेष आला तसं प्रेमही आलं. राग, घृणा, अपराधी वाटणं आलं, भीती आली, आश्चर्य आलं. ह्या भावना प्रत्येक माणसाला कधी ना कधी जाणवतात. भावना आणि विचार ह्यांचा खूप जवळचा संबंध असतो. विचारतूनच भावना जन्म घेते म्हणूयात.
रडणं, हसणं, ओरडणं, गाल फुगवून बसणं, तावातावाने बोलणं, म्हणजे ह्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम.
बरेचदा आपला कल हा सकारात्मक भावना व्यक्त करण्यावर आणि नकरात्मक भावना दाबून ठेवण्याकडे असतो. काही वेळेस भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्या नाकारल्या जातात. जेंव्हा ह्या भावना व्यवस्थित व्यक्त केल्या जात नाहीत तेंव्हा आपण आजारांना निमंत्रण देत असतो.
दडपून ठेवलेल्या भावना कितीतरी शारीरिक आणि मानसिक आजारांचं कारण ठरतात. निरोगी राहण्यासाठी ह्या भावना व्यक्त करणं आवश्यक ठरतं. त्या दाखवण्यात, मान्य करण्यात कोणताही कमीपणा वाटून घेऊ नका.
आता, आपण भावनेच्या भरात वावगे वागत असू तर भावना आपल्यावर राज्य करू लागल्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे कधी राग अनावर होऊन एखाद्याचा टोकाचा अपमान करणे, मारणे, तोडफोड करणे ह्या गोष्टी घडतात.
तर कधी दु:ख वाटून इतर गोष्टींमधली आनंद घेण्याची इच्छाच होत नाही. द्वेष वाटून एखादी व्यक्ति कशी वाईट आहे हे आपण सांगू लागतो, तिला खाली ओढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा भीती वाटते म्हणून एखादी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो.
ह्याचा अर्थ त्या भावना चुकीच्या आहेत असा नाही, तर त्या व्यक्त करण्याची आपली पद्धत बदलली पाहिजे.
ह्यासाठी आपल्याला नेमकं काय वाटतंय हे ओळखता येणं फार महत्त्वाचे आहे. हे ओळखून स्वीकारल्यावरच त्या भावना व्यक्त करण्याचा योग्य मार्ग आपण शोधू शकू. हे ओळखण्यासाठी आपल्या विचारांपर्यंत आपल्याला पोहोचता यायला हवं.
कधी-कधी एवढा पसारा असतो आपल्या मनात की त्या भावनेपर्यंत, तिच्या पाठीशी असणाऱ्या विचारपर्यंत पोहोचता येत नाही. मग हा गुंता सोडवताना समुपदेशक मदत करू शकतात.
तुम्हाला तुमचीच नव्याने ओळख करून देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या भावनेपर्यंत पोहोचवणारा पूल होऊ शकतात.


