Skip to content

समाधानी वैवाहिक जीवनासाठी उपयुक्त असे १० टिप्स !!

समाधानी वैवाहिक जीवनासाठी उपयुक्त असे १० टिप्स !!


मिनल वरपे

(संकलन)


कोणत्याही नात्यांमध्ये एक समाधानता येण्यासाठी किंवा त्यामध्ये घट्ट विश्वास बसण्यासाठी त्या नात्यातील प्रत्येकाला त्या-त्या जाणीवा असणे आवश्यक आहे. तसेच वैवाहिक जीवन समाधानाने जगण्यासाठी दोघांनाही आपआपले चाक सांभाळावे लागते. त्यापैकी एक चाक उत्तम असून उपयोग नाही. पुढील काही टिप्स वैवाहिक जोडप्यांना उपयुक्त ठरू शकतील.

१) तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते आणि अगदी तसेच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. नवरा-बायको हे नातं फक्त सुख-दुःखात एकमेकांची साथ देण्याचं नसून आपल्या जोडीदाराला त्याच्या कामात, व्यवसायात तसेच आवडीनिवडी जपण्यासाठी पाठिंबा आणि कौतुक करण्यासाठी असते.

आपल्या जोडीदाराला अपयशात साथ देणे आणि त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या यशात याचं कौतुक करणे किंवा अशा प्रसंगात सोबत असणे हे जोडीदाराचा आत्मविश्वास वृद्धिंगत करते.

२) लहान गोष्टीसाठी आभार व्यक्त करा.

सारखे एकाच आणि लहान-सहान गोष्टींवरून वाद घालणे, जशाच तसे वागून एकमेकांना दुखावणे यांमुळे दोघांमधला संवाद कमी होतो. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली नाही म्हणून तोंड उतरविण्यापेक्षा किंवा नाराज होण्यापेक्षा आज दिवसभरात आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी काय-काय चांगल्या गोष्टी केल्या हे आठवून त्याचे आभार मानल्यास आपला जोडीदार सुद्धा आपल्यासारखंच वागण्याची शक्यता हि दुपटीने वाढते. आणि नात्यातला गोडवा टिकून राहतो.

३) एकमेकांशी प्रामाणिक राहणे.

कोणत्याही नात्याचा पाया हा उत्तम संवाद असतो. पण संवाद हा फक्त आज दिवसभरात काय चांगलं केलं याचा नसून आपण आपल्या जोडीदाराला आपल्याकडून घडलेल्या चुका सांगण्याचा सुद्धा असतो. आपण आपल्या जोडीदाराकडून एखादी गोष्ट लपवली आणि तीच गोष्ट त्याला बाहेरून समजली तर विश्वास कमी होतो.

पुढे काय होईल, आपला जोडीदार काय प्रतिक्रिया देईल अशी भिती ठेऊन नात्यातला विश्वास कमी करण्यापेक्षा त्या गोष्टी सांगून नात्यातला विश्वास वाढवायचा प्रयत्न करायला हवा. नात्यात प्रामाणिक राहणे खूप महत्वाचे आहे.

४) आपलं अस्तित्व जपणे.

ज्यावेळी नाते हे नवीन असते त्यावेळी आपण आपल्या जोडीदाराला आवडेल तसे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा वेगळेपण जपणं आणि समानतेचा आदर करणं या गोष्टींपासून नात्यांची सुरुवात झाली पाहिजे. आपण आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना काही वर्षानंतर आपला जॉब, आपली कामे, मुलांकडे लक्ष देणे या सर्वांमुळे स्वतःकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतो.

तोचतोचपणा आला कि कोणालाही कंटाळा येतो. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष न करता अस्तित्व ओळखून पाऊले पुढे टाकल्यास त्याचा फायदा समाधानी वैवाहिक जीवनसाथी मिळेल.

५) शब्दांकडे लक्ष द्या.

आपण काय-काय बोलतोय याचा आधी विचार करावा. कधी-कधी आपण आपल्या जोडीदारासमोर एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचं कौतुक करतो. जरी आपल्या मनात तसे काही नसेल पण आपल्या जोडीदाराला ते ऐकायला आवडेल कि नाही याचा विचार करून बोलणे केव्हाही उत्तम.

केवळ एखाद्याचे कौतुकच नव्हेतर असे हि शब्द टाळावे ज्यामुळे वादाची ठिणगी लागू शकते.

६) काही वेळेस मुके आणि बहिरे व्हा.

सतत अरे ला कारे करणे, जोडीदार रागात किंवा आवाज चढवून बोलतोय तर आपण सुद्धा तेवढ्याच रागात आणि मोठ्या आवाजात बोलून आणखीन विचका करू नये. यापेक्षा एकजरी रागात बोलत असेल तर त्याच्या शब्दाला शब्द देण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच तुम्ही वाद होऊ नयेत किंवा दुरावा वाढू नये म्हणून शांत राहत आहात हे मॅसेज सुद्धा जोडीदारापर्यंत पोहोचविणे हे तुमचे कर्तव्य आहे.

७) नम्रपणे वागा.

आपला जोडीदार तर कायमच आपल्या सोबत आहे, असा विचार करून आपण वाटेल तसं वागतो. आपले एखादे काम झाले नाही म्हणून तो राग त्याच्यावर काढणे, चिडचिड करणे. यापॆक्षा आपल्या जोडीदाराला काय आवडते, त्याला कशातून आनंद मिळेल याचा विचार करून तशी कृती केली तर नाते अजूनच घट्ट होईल.

सतत एकमेकांना नकार देण्यापेक्षा जास्तीत जास्त होकार देण्याची सवय स्वःताला लावून नात्यात सकारात्मकता वाढवायला हवी.

८) फक्त शरीर संबंध ठेऊ नये.

केवळ बेडरूम मधल्या बेडवर असणारे शारीरिक संबंध म्हणजे नातं नव्हे. सुख दुःखात एकमेकांची विचारपूस करणे, न सांगता काही गोष्टी ओळखण्यास तत्पर राहणे किंवा डोके, पाय दुखत असल्यास बेडरूममधल्या बेडचा वापर डोके दाबून देण्यासाठी किंवा पाय दाबून देण्यासाठी सुद्धा करता यायला हवा. याने एक उत्कृष्ट लैंगिक संबंध जुळून येऊ शकतात.

९) जाणीवपूर्वक दुरावा निर्माण करणे.

नवरा-बायको म्हटलं कि कायम सोबत राहणे आलंच. पण या नात्यासोबतच मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारणे, त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाणे. यांमुळे दोघांमध्ये काही वेळेपुरता दुरावा निर्माण होत असतो आणि त्यामुळेच एकमेकांची ओढ सुद्धा लागते. आपलं लग्न, आपला जोडीदार हि जरी आपली प्राथमिक जबाबदारी असली तरी फक्त तेवढंच नातं आपल्या आयुष्यात नसते. त्यामुळे सर्वांना वेळ द्यायला हवा.

१०) नात्यातले चढ-उतार ओळखणे.

कोणतेही नाते कधीही एका सरळ मार्गाने जात नसते. त्यामध्ये चढ-उतार चालूच असतात. पण येणाऱ्या चढ-उत्तरांना घाबरून एकमेकांची साथ सोडून नातं संपविण्यापेक्षा नात्यातील चढ-उतार ओळखून एकमेकांना साथ देऊन नटे अजून जास्त स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात असते.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!