आयुष्य साजरं करुया…
श्रुती वालकर
कधीतरी आपण आपल्याच विचारात सहज चालत चालत जर एखाद्या तळ्यावर,सरोवरा वर गेलो तर तिथली शांतता आपल्याला आपल्याच आत डोकवायला भाग पाडते. हेच आपण एखाद्या नदी किंवा धबधबा बघतांनाही अनुभवतो. पण या दोन्ही स्थळी मनाची होणारी अवस्था आणि मनात येणारे विचार,विषय मात्र खूप भिन्न असतात.
म्हणजे आपण तळ्यावरच्या शांत,नितळ पाण्याकडे बघुन जशी शांतता,स्थैर्य,स्तब्धता हे सगळं अनुभवतो. तसं स्वच्छंद वाहणारया एखाद्या धबधब्या जवळ किंवा नदी किनारयावर उभे असु तर आपसुक प्रसन्न, प्रफुल्लीत,उत्साहीत वाटायला लागतं. आणि तसेच उत्साहीत,खळाळणारे,नवी उमेद देणारे,नवं चैतन्य निर्माण करणारे, नवी क्षितिज खुणवणारे असंख्य विचार, अगणित कल्पना,क्षणात मनाची दारं ठोठावुन जातात.
हेच ते विचार,जे जगणं जिवंत करतात. सतत काहीतरी नवं करण्याची, शिकण्याची धडपड जागृत ठेवतात. खरं तर आपल्याला रोज नवा दिवस,नवा डाव,कोरं पान मिळतं. तरीही आपण बरेचदा ही सगळी पानं त्याच त्याच रंगांनी,अनुभवानी रंगवतो. मग सतत तेच तेच जगुन आयुष्य निरस वाटायला लागतं. आणि एक दिवस याच सगळयांनी जो थकवा जाणवतो,तो म्हणजे मानसिक थकवा!
पण हाच थकवा घालवायला आपण स्वतः बरंच काही करू शकतो,फक्त त्याकरता आपल्याला या आयुष्याच्या शाळेचा सामान्य विद्यार्थी राहुन चालणार नाही. तर एक सक्रीय विद्यार्थी म्हणुन त्यात दाखल व्हावं लागेल.
आयुष्याच्या,थोडक्यात वयाच्या कुठल्याही अवस्थेत आपण नवं कौशल्य आत्मसात करुच शकतो. अगदी आवडेल ते! मग ते गाणं शिकणं असो, नृत्यकला, पाककला,चित्रकला, बागकाम,योग,पोहणं, अध्यात्मिक शिक्षणाचे वर्ग,असे अनेक पर्याय आहेत.आपल्याला आवडेल तो पर्याय आपण निवडू शकतो.
प्रयत्न आणि प्रयोग करत राहिलो, तर यातल्या काही गोष्टी जमतील काही जमणार नाहीत. पण उत्साह आणि कुतुहल मात्र सतत जागृत राहील. आणि हेच शिकवेल की आयुष्य साजरं करायला आहे. सक्तीचा रामराम म्हणुन जगायला नाही.
दरवर्षी एक नवं कौशल्य आत्मसात करायचं ठरवलं, तर रोज एक उत्साही आयुष्य पुढ्यात असेल. जे जगण्याची नवी उमेद,जगण्याचा नवा दृष्टीकोन देईल.
मित्रांनो,नवं काही करायचं ठरवलं तर वेळ खुप कमी आणि आयुष्य खुप छोटं वाटतं. काहीतरी नवं शिकल्याचा, केल्याचा आनंद रोजच जगणं समृद्ध करतो. कारण जगण्यात वेगळेपण नसतं, जिवंतपणे जगायला वेगळेपण असावं लागतं.
चला तर मग,आता तुम्ही कुठलं नवं कौशल्य आत्मसात करणार आहात ते मला कॉमेंट्स सेक्शन मधुन कळवा. आणि आयुष्य साजरं करायला सुरवात करा.



Jabrdast
Yoga
मी 40 व्या कवरषी शास्त्रीय संगीत आणि का कथ्थक नृत्य शिकत आहे…आणि मला यातून खूप आनंद मिळतो.
Cooking and pending
मी नव्यानं सायकलिंग सुरू केलीय, आणि माझी पहिली राईड ही 106.8km ची होती ती म्हणजे आपलं औरंगाबाद जिल्ह्याची शान नाथसागर येथे….आपण सांगितलेल्या नितळ पाण्याचं उदाहरण मी अनुभवलंय……..?️?️