Skip to content

मनातली सकारात्मकता कशी वाढवावी ???

सकारात्मकता कशी वाढवावी?


सौ. भारती गाडगिलवार


आपले जीवन हे सकारात्मक विचारांवर अवलंबून असते. आपल्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे सकारात्मक विचार. माणसाने एकदा ठरविले की, आणि त्याचा स्वतःवर ते कार्य करण्याचा विश्वास असेल तर, कोणतीही गोष्ट साध्य करता येते.

एकदा जाॅर्ज नावाचा मुलगा रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यामुळे सकाळी लवकर उठू शकला नाही. त्यामुळे तो उशिरा शाळेत गेला. वर्गात टिचरने काही प्रश्न फळ्यावर लिहून ठेवले होते. जाॅर्जने टिचरच्या समजवण्या आधीच उत्तर दिले.

यावर टिचर म्हणतात की, या प्रश्नाचे उत्तर आईन्स्टाईन यांना देखील जमले नव्हते. जाॅर्जसोबत सगळ्यांना हे कळल्यावर आश्चर्य वाटले.

तात्पर्य हे की, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल पुर्वज्ञान नसते तेव्हा ती साध्य करण्यासाठी आपण आपले संपूर्ण प्रयत्न पणाला लावतो आणि ती गोष्ट साध्य करतो. परंतु जर आपल्याला त्या बद्दल माहिती असेल की ही अशक्य बाब आहे तर, आपल्या मेंदूकडून पाहिजे तशी प्रतिक्रिया मिळत नाही. म्हणजेच एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मेंदू प्रयत्न करतो, त्यानंतर नाही.

वरील उदाहरणात जर जाॅर्जला अगोदरच माहीत असते की आईन्स्टाईन सारखी बुद्धीमान व्यक्ती जर हे प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ आहेत तर आपण कसे सोडवणार? असा समज मेंदूने त्याला दिला असता, तर त्याचे प्रयत्न तेथेच संपले असते.

म्हणूनच मनुष्याने कोणतेही कार्य हे पुर्वग्रह दुषित विचाराच्या आधारावर करु नयेत. त्याने विचारांवर मर्यादा येतात. त्यातुन नकारात्मकता वरचढ होऊ शकते.

प्रत्येक मनुष्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही विचारांनी घेरलेले असते. सकारात्मक या प्रश्नाचे उत्तर मुळात होकार, शक्य या शब्दात अंतर्भूत आहे.

जेव्हा आपण एखादे काम करु शकतो म्हणतो तर, ते करण्यासाठी आपल्या मेंदूने तसे सुचविलेले असते, मनातुन असे वाटते की, हे मी करु शकतो आणि म्हणूनच ते काम पुर्ण होते. म्हणजेच स्वतःवर विश्वास आहे म्हणूनच त्याने ते कार्य सिद्धीस नेले. म्हणजेच त्याच्यात सकारात्मक विचारांचा प्रभाव आहे.

उदाहरणार्थ

धावण्याच्या शर्यतीत बऱ्याचदा मुले हारण्याच्या भितीने सहभागी होत नाही. पण तीच मुले जेव्हा घराजवळील गल्लीमध्ये खेळताना एखादा कुत्रा पाठिमागे धावत असेल तर इतक्या वेगाने पळतो की, त्या कुत्र्याच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेतो. येथे त्याला त्याचा जीव वाचविणे हा हेतू होता परंतु यातुन त्याला तो वेगाने धावू शकतो याची जाणीव होते म्हणजेच सकारात्मक विचार जन्म घेतो की, मी सुद्धा धावण्याच्या शर्यतीत जिंकू शकतो.

म्हणजेच सकारात्मक विचार हे त्या त्या परिस्थितीतून जन्म घेतात आणि आलेल्या अनुभवातून अधिकाधिक दृढ होत जातात. स्वतःवरील विश्वास मी हे नक्कीच करु शकतो हा देखील सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी सहायक ठरतो.

बऱ्याचदा असे काही प्रसंग जीवनात येतात तेव्हा असे वाटते की, आता संपले सगळं, माझ्यासोबतच असे का झाले?, मला कोणतीच गोष्ट मनासारखी मिळत नाही, सगळे माझा उपयोग करुन घेतात, माझ्या जीवनात कधी चांगले झालेच नाही इ.

याच प्रश्नांना वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले तर, जसे आता सगळे संपले यावर, अरे आता मी नक्कीच नवीन काही करु शकतो असा विश्वास मनात आला की मनाला प्रसन्न वाटते. माझ्यासोबत असे का झाले? याचे उत्तर कदाचित माझे प्रयत्न कमी पडले हे आहे. माझ्या जीवनात काही चांगले झालेच नाही म्हणण्यापेक्षा मी चांगले काही करण्यासाठी काय करु शकतो असा विचारच त्या प्रश्नाचे उत्तर होय.

थोडक्यात, कोणत्याही प्रश्नाने नकारात्मकता येत असेल तर त्यावर का नाही हा प्रश्न स्वतःलाच विचारा. अनेक विचारांची मालिका तयार होते मनात. आणि त्यातूनच सकारात्मकता विकसित होत जाते. म्हणजेच प्रयत्न, स्वतःवरील विश्वास, जिद्द आणि मेहनत हे असे शस्त्र आहेत जे मनुष्याला कायम सृजनशील बनवतात. आणि सृजनशील व्यक्तीला नकारात्मकता कधीच घेरत नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!