एकदा करुन बघाच
नितीन थोरात
डोळे बंद करायचे अन् शांतपणे पापण्यांच्या आतल्या अंधाराकडं पहायचं. विचारांच्या मुंग्याना गुंगी येईल. आईचे डोळे कसे शांत असतात. नदीशेजारचा जुनाट वड कसा स्थिर असतो.
माळावरचा भलामोठा दगड कसा गप बसलेला असतो. देवळातला दिवा कसा मंद तेवत असतो. तसं, अगदी तसच शांत व्हायचं. बालपण आठवेल.
मातीचा रस्ता आठवेल. कौलारु शाळा आठवेल. बाजारातून आणलेली नवी कोरी स्लीपर आठवेल. चिमुकल्या दोस्तांसोबत बाभळीच्या सावलीत बसून खाल्लेली चपाती आठवेल.
पंधरा ऑगस्टला भल्या पहाटे गरम पाण्यानं केलेली अंघोळ आठवेल. गालाला टोचणारी आजोबाची खुरटी दाढी आठवेल. घरावर धो धो कोसळणारा पाऊस आठवेल. शेतातली पायवाट आठवेल. शाळेच्या खिडकीतून दिसणारी नदी आठवेल.
शनिवारचं शक्तीमान, रविवारची रंगोली आठवेल. अंगणातला मोत्या आणि गोधडीवर बसलेली मनीमाऊ आठवेल. भावाचे हात आठवतील. बहिणीची वेणी आठवेल.
लेमन गोळ्या आणि खारी बिस्कीट आठवतील. रुपयाचा ठोकळा आठवेल. पायातला काटा अन् नाकाचा शेंबूड आठवेल. हाकमारी आठवेल. आज्जीच्या हातातल्या मिरच्या आठवतील. कपाळाचा अंगारा आठवेल. दिवाळीतला लवंगी फटाका आठवेल.
ना मोदी आठवेल. ना राहुल आठवेल. ना बाबरी आठवेल ना बलात्कार आठवेल. ना कोरोना आठवेल ना लॉकडाऊन आठवेल. ना फेसबुक आठवेल ना व्हॉटटसअप आठवेल. ना आजार जाणवेल ना पैशांची तंगी जाणवेल. ना भूक लागेल ना थकवा जाणवेल.
फक्त सुख डोळ्यापुढं नांदेल. फक्त गोड स्मित ओठावरं उमलेल. रोज रात्री फक्त पंधरा मिनिट बालपणात फिरून यायचं. खरंच… ना डोक्याला ताण येईल ना कुणाचा राग येईल.



I am Very unhappy filling