Skip to content

अबोला आणि मौन यांची मानसशास्त्रीय व्याख्या!!

अबोला आणि मौन


मनोज कुरुंभटी


माणूस समाज प्रिय प्राणी त्यात संवाद हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. एक वेळ जेवायला नाही मिळाले तर चालेल पण बोलायला माणूस हवा,इतका संवादाचा भुकेला.

हा शब्दरूपी संवाद खंडित होतो त्याला मुख्य दोन कारणं, अबोला अथवा मौन. दोन्ही मध्ये शब्दाचा अभाव आणि शांतता.
अबोला असण्याचे प्राथमिक कारण एखादी गोष्ट मनाजोगी न घडणे अथवा समोरच्या व्यक्तीची वागणूक आपल्या इच्छेप्रमाणे होत नसल्याने एक नकारात्मक भावना वृद्धीस लागते आणि त्याचे पर्यवसन अबोल्यात होते.

आपल्या भावनांचा आदर होत नाही, समोरच्याचे वागणे पटत नाही त्यासाठी जाणीवपूर्वक खंडित केलेला संवाद.

अबोला काही वेळा गैरसमजुतीतून निर्माण होतो. मनात एक वैफल्याची भावना निर्माण होते आणि ती वाढीस लागून त्याचे पर्यवसन अबोल्यात होते. अबोला हा लादलेला असतो ज्या व्यक्तीने अबोल्यास सुरुवात केली ती व्यक्ती तर न बोलण्यावर ठाम असते मात्र दुसऱ्या व्यक्तीला बोलायची इच्छा असूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे अबोल्याची मालिका अखंडितपणे सुरू राहते.

अबोल्यात कोण चूक आणि कोण बरोबर ह्याचा विचार होऊ शकत नाही कारण चर्चेस प्रतिसाद मिळत नसल्याने संवाद अपूर्णच राहतो. अबोला हा परिस्थितीने लादलेला असतो.

अबोला हा जाणीवपूर्वक असतोच तसा तो लादलेला असतो. अहंकाराला कुरावळताना तो बराच काळ कायम राहण्याची शक्यता असते. अबोल्यात समोरच्याने बोलण्यास पुढाकार घ्यावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्यामुळे ‘ पहले तुम, पहले तुम’ करता करता बोलणे प्रलंबित राहते.

अबोला हा जीवघेणा असतो, कदाचित दोन्ही व्यक्तींना चुकांची जाणीव असते मात्र अहंकारापायी कोणीही पुढे येत नाही. अबोल्यात गैरसमज वाढीस लागतात कारण समोरच्या व्यक्तीबद्दल एक नकारात्मक भावना निर्माण झालेली असते त्यामुळे ती वाढीस लागते.

अबोला घालवण्यासाठी मध्यस्थी व्यक्ती उपयोगी पडते. अगदी घरात पती पत्नीच्या अबोल्यात त्याची मुले मध्यस्थी करू शकतात अथवा दोघांमधील सामायिक प्रिय आणि आप्तजन ही भूमिका उत्तमरीत्या पार पाडू शकतात.कधीकधी मित्रांमध्ये अथवा नातेवाईकांमध्ये अबोला निर्माण होतो तर कधी सहकारी अथवा वरिष्ठांमध्ये.

अश्यापरिस्थितीत कोणी तरी मध्यस्थाची भूमिका पार पाडणे गरजेचे असते,जणू तो ice breaker ठरतो.

मौनात शब्दांचा अभाव असला तरी मौन हे जाणीवपूर्वक स्वीकारलेले असते. मौनात वाणीला जाणीवपूर्वक विराम दिलेला असतो. मौन स्वीकारताना शब्दांच्या वायफळ वापर टाळणे हा प्राथमिक हेतू असतो.

मनातील विचाराच्या घोंघाट आणि वाणीचा अवाजवी वापर ह्याला विराम देण्यासाठी, मौन जाणीवपूर्वक स्वीकारलेले असते.खूपदा माणूस शांत बसतो, वाणीला विराम देतो मात्र मनात विचारांचे वादळ घोंगावत असते.

मनाला आणि चित्ताला शांत करण्यासाठी स्वीकारलेलं मौन हा एक महोत्सव असतो.

मौनात शांततेचा परिपूर्ण अनुभव प्राप्त होतो.

विचार करा शांत निसर्गरम्य ठिकाणी एका तळ्याच्या काठी शांतपणे बसले असता, सभोवतालच्या निसर्गाचा आणि त्याच्या शांततेचा अनुभव आणि अनुभूती घ्यायची असेल तर मन शांत आणि स्थिर हवेच. त्या मानसिक शांततेसाठी मौन खूपच फायदेशीर ठरते.

अबोला आणि मौन ह्या दोन्ही गोष्टीत संवादाचा अभाव असला तरी महत्वाचा फरक आहे.

अबोला हा परिस्थितीमुळे लादलेला असतो. अबोला हा कदाचित अहंकारामुळे निर्माण झालेला असतो.अबोल्यात तामसी भाव जास्त असतो.

अबोला जास्त काळ टिकला तर मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि नकारात्मक भावना वाढीस लागते. कधीकधी डोके दुःखी, ऍसिडिटी सारखे आजार जाणवतात. एकंदरीत अबोल्याची शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते.

मौन मात्र स्वीकारलेले असते. त्यात एक आत्मिक समाधान असते. आत्मचिंतन आणि आत्मवलोकन करण्यासाठी स्वीकारलेला एक राजमार्ग असतो. मौनात विचारांची आणि आत्म्याची शुद्धी अभिप्रेत असते. मौनात एक सात्विक भाव असतो.

महात्मा गांधी जाणीवपूर्वक मौन पाळत असत आणि त्यांचा दृढनिश्चय असे की त्या कालावधीत कितीही महत्वाची चर्चा असेल तरी ते मौन सोडायचे नाही.

भारतीय योग शास्त्रात मौन व्रत जाणीवपूर्वक पाळतात.
वाणीला विराम देण्यासाठी स्वीकारलेले व्रत असते. परा, पष्यांती, मध्यमा आणि वैखरी ह्या वाणीच्या प्रत्येक स्थितीला दिलेला जाणीवपूर्वक विराम असतो.

मौनाचे खूप फायदे हवेत,

1. आपल्याला निसर्गाने दिलेल्या वाणीरूपी देणगी आहे ती जपून वापरली तर घश्याला आराम मिळतो.

2. वाणीला एक निसर्गदित्य माधुर्य असते, ती मधुरता मौनामुळे कायम राहते.

3. मौनात शब्दरूपी संवाद नसल्याने शब्दयांच्या अतिरिक्त वापराने निर्माण होणाऱ्या गैरसमजुतीस विराम मिळतो.

4. समोरची व्यक्ती कितीही रागावली असेल तरी मौन आणि स्मित चेहऱ्यावर असेल तर तणावग्रस्त परिस्थिती निवळण्यास मदत होते.

5. मौनात आत्मचिंतन होते. आपल्या नकळत घडलेल्या चुकांची जाणीव होते.

6. मौन आत्मबळ वाढवते.

7. मौन काहीवेळा भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींना थोपवते.

“Smile and silence are very important tools,
Smile solves many problems and silence helps to avoid Creation of problems and difficulties in the future.”

‘Sometimes silence is not only the speechless reply but it will full of anwers too.’

खऱ्या मौनाची सुंदर व्याख्या आहे,
मनातल्या मनातही न बोलणं म्हणजे मौन.’



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!