Skip to content

एकदातरी स्वतःचा अहंकार बाजूला ठेऊन बघा !!

अहंकार (Ego)


प्रा. ज्योत्स्ना शिंपी


बऱ्याचदा समोरच्या माणसाच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो, तसा विचारही समोरच्याच्या मनात नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो…..

परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो… आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही……

कधी तरी निवांत बसून आपण आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, अनेकजण ज्यांनी “आपल्याला दुखावलं” म्हणून आपल्या आयुष्यातून आपण वजा केलं होत ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच…..

भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसतो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतिक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली असतात. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्म-मरणाचा प्रश्न बनवून ती हकनाक आपल्या अहंकाराची बळी कधी झाली हे कळतच नाही.

नाजूक नात्यांना शेवटी अहंकार नाही, तर मायेच्या ओलाव्याचीच गरज असते…..

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कुणी आपल्याला नंतर दिली तरी त्याच दुःख म्हणून त्यांचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं आणि हे अनेकदा घडतं…..

आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होत…..

भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो…..

भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो…..

अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं..

रावण स्वतःच्या अहंकारामुळे संपला. वास्तविक तो ब्रह्मज्ञानी पण अहंकारामुळे दानव झाला. पुराणात आणखी एक कथा आहे. भस्मासुराची. भस्मासुराने शंकराची तपश्चर्या करून ‘ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याच भस्म होईल’ असा वर मिळविला. त्या वराने त्याला एवढा अहंकार झाला की प्रत्यक्ष वर देणाऱ्यालाच तो भस्म करायला निघाला. मग विष्णूने मोहिनी रूपात त्याला नष्ट केले.

अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो.

माणूस हा समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं.

आपला अहंकार दूर करणे ही गोष्ट कठीण आहे पण अशक्य नाही. त्यासाठी मनोनिग्रह आणि साधना हवी.

एकदा तरी आपला अहंकार बाजुला ठेऊन बघा. विसरून बघा. अहंकारा पासुन सुटका करून बघा…!

बघा काय चमत्कार होतो ते…!

आपणा सर्वांना सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ??



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!