Skip to content

……अखेर प्रेमाचे गणित जुळले !

अखेर प्रेमाचे गणित जुळले!


समीर दरेकर


बंगलोरला तो कॉन्फरन्सच्या निमित्ताने एका दिवसापुरता दाखल झालेला. एक दिवसाची कार्यशाळा.. पण त्याच्यासाठी महत्वाची होती. गेले काही महीने अथक परिश्रम करून तयार केलेल्या नव्या संशोधनाला इंडस्ट्रीतल्या दिग्गजांसमोर मांडण्याची सुवर्णसंधी होती. तो उंचपुरा, भारदस्त होता आणि त्याची भाषाही प्रभावी होती. स्टेजवरून स्लाइड्स प्रेझेंट करताना त्याची सर्वांवर आगळी छाप पडली.

अगदी तिच्यावरही…. नुकताच शोध निबंध संपवून ती नोकरी शोधत होती. कॉन्फरन्सच्या निमित्ताने मोठ्या लोकांच्या ओळखी होतील, त्यातून जॉब ऑफर होईल अशा आशेने ती आलेली. तिला ही तो प्रभावी वक्ता वाटला पण का कोणास ठावूक त्याहून काही जास्त खास वाटला. असं तिला पहिलं कधीच कोणासाठी वाटलं नव्हतं.

पता नही क्या पर उसकी बात ही कुछ और थी..

प्रश्नोत्तराचा तास संपताना त्याची मागे कोपर्‍यात बसलेल्या तिच्यावर नजर गेली. कॅमेराच्या फ्लॅश मध्ये तिच्या गोर्‍यापान चेहर्‍यावरचे पाणीदार मासोळी डोळे लकाकले. ती त्याच्याकडेच एकटक पाहत होती. त्यामुळे इतका वेळ लयीत बोलणारा तो नेमका अडखळला.

“लव्ह अॅट फस्ट साईट” हे बॉलीवूड मधले बुलशीट आहे यावर त्याचा आजवर ठाम विश्वास होता. पण “ती पाहताच बाला, कलिजा….” आणखी प्रश्न न घेताच तो पटकन खुर्चीवर जाऊन बसला. त्याचं असं आधी कधी झालं नव्हतं. त्यानंतर उत्कृष्ठ भाषण आणि सादरीकरणाबद्दल त्याला अभिनंदन करणार्‍या लोकांच्या गर्दीत तो होता आणि नव्हता सुद्धा. मनात फक्त तरळत होते गोर्‍यापान चेहर्‍यावरचे लकाकणारे पाणीदार मासळी डोळे….

-xxxxxxx-

संध्याकाळच्या बिझनेस फेलोशिप पार्टीला पुन्हा ती सामोरी आली. त्याला काय करावे सुचेना. पण तिनेच सुरवात केली,

“तुम्ही फार छान बोलता… म्हणजे तुमचं भाषण ऐकतच राहावं”

तो अजून तसाच गोंधळलेला.

“म्हणजे तुम्ही ‘मराठी’ आहात ना? स्टेजवर तुमचे आडनाव ऐकून गेस केलं मी…”

“हो हो.. या ओण्डुगोंडू भाषा बोलणार्‍या शहरात कोणी मराठीत बोललं म्हणून थोडा गोंधळलो, इतकंच…” त्यानेही वेळ मारून नेली,

“बाय द वे, मी पुण्याचा, आणि तुम्ही?”

“मी मुंबईची, इथे युनिवर्सिटीत रिसर्च करत होते, उद्या परत जाणार आहे मुंबईला.”

“अच्छा……”

दोघे बोलत गेले आणि खुलत गेले. आणि असे खुलण्यासाठी जे शब्दात सांगायला हवे ते नजरेत एकमेकांना अगोदरच सांगितले गेले होते. जन्मोजन्मीचा ऋनानुबंध असावा असे ते सहज बोलू लागले. तो ‘तुम्ही’ वरून एकेरी ‘तू’ वर केव्हा घसरला ते त्यालाही कळले नाही. ती ‘तुम्ही’ ‘तुम्ही’च म्हणत राहिली. पण आगंतुक ‘तुम्ही’ची जागा आपुलकीच्या ‘तुम्ही’ने केंव्हाच घेतली.

“भाषण तर तुमचे ऐकले आहे, अजून काय काय येते तुम्हाला.”

“ज्योतिषविद्या…”

“काय?…!”

“हो माझे काका कोकणात प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुट्टीला त्याच्याकडे जात असे. त्याच्यामुळे मलाही नाद लागला पत्रिका जुळवून पाहण्याचा.”

“मग माझे भविष्य सांगाल का? अॅक्चुअली घरचे स्थळं बघत आहेत….”

जनरली मुली स्वतः असा विषय काढत नाहीत, पण तिला रहावले नाही, तिने आपणहून हिंट दिली. तो ही मनोमन सुखावला.

“जन्मतारीख सांगशील का?”

“दहा पाच”

“ओके….” अजून काही जुजबी प्रश्न विचारून तो पत्रिकेतली आकडेमोड करण्यात गुंगला.

“आहे, याच वर्षी लग्नाचा योग आहे…” तो हसला.

“मुलगा कसा असेल?”

“मुलगा ना? अ…… असेल उंच, बर्‍यापैकी शिकलेला, मोठ्या हूद्यावरचा, आणि…. ऐकतच राहावं असं भाषण येणारा…”

“इश्य… काहीतरीच” ती लाजून गुलाबी झाली.

“पुढे होणार्‍या मुलांविषयी सांगू का?”

“पुरे….” तिने डोळे वटारले, मग हसून म्हणाली,

“….. तुमच्या पुणेरी भाषेत सांगायचे तर… भा. पो…..”

बॉलीवूड टाइप प्रेमावर त्याचा कधीच विश्वास नव्हता. म्हणजे ते फाइव्ह स्टार हॉटेलला तिला सोबत घेऊन जाणं, गुढग्यावर वाकून बसणं, लाल गुलाब आणि हिर्‍याची अंगठी पुढे करत ‘आई लव्ह यू’ म्हणणं… मग तिने विश्वसुंदर्‍या स्पर्धा जिंकल्यावर करतात तसं हात गालावर ठेऊन आ वासून आश्चर्यकारक चेहरा करणं…. तद्दन फिल्मी… नकली… ओवरड्रामॅटीक…

आत्ताचं हे कसं…. खरं खुरं… त्याने बोलण्याच्या ओघात मनातलं सांगून टाकणं आणि तिनं त्याला ‘भा. पो.’ म्हणत दुजोरा देणं.

प्रत्येक मुलीसारखं स्वप्नातला राजकुमार असावा असं तिला ही नेहमी वाटलं होतं. पण तिने स्वतःहून रिसर्च फील्ड निवडलं आणि अभ्यासात स्वतःला गाडून घेतलं. एकदा एखाद्या कॉलेजात किंवा संस्थेत नोकरीचे पक्के झाले की अरेंज मॅरेज. बाबा स्थळ शोधत होतेच. उच्च शिक्षण, वाढतं वय यामुळे योग्य मुले मिळणे अवघड जात होते. ती बाबा सांगतील त्याला ‘हो’ म्हणून मोकळी होणार होती. पण आज जे घडत होते ते टोटली अनएक्सपेक्टेड होते. जणू दिवा स्वप्नच.

“छत्तीस पैकी छत्तीस गुण” पत्रिकेची आकडेमोड संपवत पेनचा खटका बंद करत तो आनंदाने पुटपुटला आणि तिची विचारांची तंद्री भंगली.

“काय.. छत..त्ती…. म्हणजे…?” काही अर्थबोध न झाल्याने तिने विचारले.

“म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान…” तो लहान मुलासारखा हेल काढत एक डोळा मिचकवत बोलला.

ती अजून गोंधळलेलीचं पण त्याला डोळा मिचकावताना पाहून स्वतःशीच हसली.

“तुम्ही ‘पुणेरी’ नाही वाटत?” तिने विषय बदलला

“कशावरून बुवा?”

“एक म्हणजे तुम्ही ‘शिष्ट’ नाही वाटत आणि दुसरं म्हणजे लहान मुलासारखे पुटपुटत काहीबाही मजेदार बोलता” आणि ती दिलखुलास हसली.

‘हंसी तो फसी…’ असे कॉलेजातले त्याचे टुकार दोस्त म्हणायचे. ते त्याला आता कुठे खरे वाटू लागले.

“इथे बंगलोरला कसे काय?”

“आर्कियालॉजी विषयात रिसर्च करायला”

“चक्क आर्कियालॉजी?” त्याने आश्चर्याने विचारले.

“हो, शाळेत इतिहासात हुशार होतेच. मग दहा आठ वर्षाची झाले तर आर्कियालॉजी बद्दल इंटरेस्ट जागा झाला. मग तेव्हाच आर्कियालॉजी मध्येच करियर करायचं ठरवलं.

“अगदी लहान वयातच करियर पक्के केले ना?”

“लहान काय? मॅच्युअर होते मी. काय निवडायचं काय नाही कळत होते. बाबा पण हो म्हणाले. मग अडचण कसली?”

“बाबा सपोर्टीव्ह आहेत तर… आणि कोण कोण असते घरी?…”

विषयाला विषय जोडत जाऊन दोघे बोलत राहिले आणि निघण्याची वेळ कधी झाली कळलेच नाही.

“बाप रे! मी इथे बोलत बसले आणि ट्रॅवल्सचे तिकीट काढायचे राहूनच गेले. माझे ट्रेन चे तिकीट कन्फर्म नाही झालयं आणि ट्रॅवल्सचा पर्याय शोधायचा आहे. नाहीतर उद्या जायचं कॅन्सल करावं लागेल. मला लगेच निघायला हवं…” ती पॅनिक होऊन बडबडत होती.

“हमंमं…मग माझ्यासोबत चल !”

तिने चमकून त्याच्याकडे पहिले,

“नाही म्हणजे तुला कंफर्टेबल वाटत असेल तर…”

“असं कसं…?”

बंगलोरला आल्यापासून ती एकट्याने खूप फिरली पण असा कधी दुसर्‍या एकट्या पुरुषासोबत तिने प्रवास केला नव्हता. इतरवेळी बाबा, भाऊ किंवा वडीलधारे कोणी नेहमी सोबत असत. ती थोडी शहारली आणि मनात थोडी भीती सुद्धा दाटली. पण तेव्हड्या क्षणापूर्ती. आज तिचा सिक्स्थ सेन्स धोक्याची घंटा वाजवत नव्हता उलट हेच सर्वात सुरक्षित असल्याचे भासवत होता. कोणास ठाऊक का पण त्याची सोबत तिला आतून कोठेतरी हवी हवी वाटू लागली होती.

“डोन्ट टेक मी रॉन्ग… माझी सीनियर बॉस मुंबईवरून येणार होती कॉन्फरन्सला, आणि मी पुण्यातून जॉइन करणार होतो. पण ऐनवेळी तिचे येणे कॅन्सल झाले. त्यामुळे आज मला एकट्याने प्रेझेंट करावे लागले. परतीची दोघांची तिकिटे आहेत ट्राव्हल्सची. बॉसचे मुंबई पर्यन्त आहे. तू अॅडजस्ट होऊन जाऊ शकशील त्या तिकीटावर.”

“पण…”

“घाबरू नको, तिचे पुढचे लेडीज सीट आहे. माझे दुसरीकडे मागे आहे” तो आश्वासक नजरेने म्हणाला.

एव्हाना तो कधी कुणाला जीवनात इतके एंटरटेन करत नसे. बॉस येणे कॅन्सल झाल्याने ‘डोक्यामागची कटकट गेली.’ म्हणून त्याला एकटे येताना आनंदच झाला होता. पण त्याला स्वतःहून ती आता आपली ‘जवाबदारी’ आहे, असे वाटू लागले. एरवी सडाफटिंग बॅचलर लाईफ जगणार्‍या त्याच्यात, त्याचा त्यालाच हा नवा बदल जाणवत होता.

‘देख यार, दारू पिनेवाला कभी झुट नाही बोलता… प्यार अच्छे अच्छो को ठीक कर देता है, तुम्हे भी एक दिन ठीक कर देगा…!’ त्याच्या अशा बेफिकिरीबद्दल त्याचा जिगरी दोस्त मागे त्याला दारूचा चौथा पेग रिचवत म्हणाला होता. ‘चढली आहे तुला, लेका. प्यार-व्याऱ सगळं बॉलीवूडचा मेलोड्रामा आहे. सब झुट!’ त्याने ते तेव्हा हसण्यावरी नेले होते. पण त्या जिगरी दोस्ताचा चेहरा क्षणात त्याच्या पुढे चमकून गेला. तो बदलला होता. त्याच्या आश्वासक नजरेत आता तिच्या विषयी फिकीर होती.

ती मानेनेच ‘हो’ म्हणाली.

“उद्या दहा पाच ला बस निघेल. स्टेशनवर किमान पाच मिनिट अगोदर ये”

“हो, मी निघते, आता उशीर झालाय…”

“बरं, पण समजा चुकामुक झाली तर तुला कॉनटॅक्ट कसे करू?”

“आरे हा.. माझा मोबाइल नंबर नोट करून घ्या. नव्वद आठ चाळीस तीन सत्तर एक ऐंशी पाच साठ…” हात दाखवून थांबवलेल्या रिक्षात बसत तिने मोबाइल नंबर तोंडी त्याला सांगितला. रिक्शा निघाली, तो ओझरता झाला.

-xxxxxxx-

रिक्षात बसल्या बसल्या तिला हे फारच अडवेंचर होतय असे वाटले. कोणी अनोळखी माणसाने मोबाइल नंबर मागितला तर द्यायचा नाही. द्यावाच लागला तर एखादा दूसरा आकडा चुकवून सांगायचा ही बायकी ट्रिक तिला अवगत होती. पण तिने करेक्ट नंबर दिला. कारण आता त्याचा फोन यावा असे तिला आतून वाटत होते.

-xxxxxxx-

‘पॅकिंग राहिलंय आणि सकाळीच चेकआऊट करायचे आहे’ म्हणून तो ही घाईत हॉटेलवर गेला. पॅकिंग झाल्यावर त्याने मोबाईल मध्ये सेव केलेला नंबर डायल केला. पण फोन लागला नाही. त्याच्या ऐकण्यात चूक झाली नव्हती तरी नंबर चुकल्यासारखा वाटत होता. त्याने अंदाजे पर्मुटेशन कॉम्बिनेशन बदलून कॉल करून पहिले, आणि रॉन्ग नंबरला अपरात्री कॉल करून त्रास देता म्हणून शिव्याही खाल्ल्या. शेवटी तो आजचा दिवस किती चमत्कृतीपूर्ण होता… आणि प्रेमाचा तिरस्कार करणारे आपण कसे काय प्रेमात पडलो यावर विचार करत झोपी गेला.

-xxxxxxx-

ती ही त्याच्या फोनची वाट पाहत तळमळत राहिली. त्याचा फोन आला नाही. ‘रिक्षावाला पाच मिनिटे थांबला असता, तू त्यांचा मोबाइल नंबर विचारून घ्यायला हवे होते ना’ ती स्वतःलाच रागे भरून बोलली. ‘काही तासांपूर्वी अनोळखी असलेल्या माणसासोबत एकट्याने प्रवास करायला कशी काय तयार झालीस ग?’, ‘आयुष्याचा प्रवास सोबत करशील का? असे जरी विचारले असते तरी मी होच म्हणाली असती’ आणखी असेच काही तिची दोन मने एकमेकांशी बोलत राहिली… पण त्याचा फोन नाही आला.

-xxxxxxx-

सकाळी पंधरा मिनिट अगोदर तो स्टेशन वर आला. पण ती नाही दिसली. फोन लागलाच नाही. त्याने अर्धा तास बसवाल्याला थांबवून ठेवले. शेवटी इतर प्रवासी आरडाओरडा करू लागले तेव्हा त्याचा ही नाईलाज झाला.

‘हाऊ स्टुपिड आय अॅम… इतकं बोललो पण तिचे काहीच डीटेल्स नाही घेतले, शोधणार कसे?’ ‘आणि ती ही आली नाही… कशी येईल? एका नजरेत प्रेम व्हायला हे काय बॉलीवूड आहे?’ ‘अरे मुंबईच्या मुली… आपण टि.पी. ठरलो काल संध्याकाळ पुरता.’……….

बस सुसाट वेगाने पुण्याकडे निघाली.

-xxxxxxx-

ती दहा मिनिटे अगोदर स्टेशनवर आली. पण तिथे शुकशुकाट होता. पानपट्टी वरचा भैय्या म्हणाला, “मैडम, पुना-बंबई बस तो सुबह ही गया आप आने मे देर कर दी. अब कल सुबह आना.”

तिच्या पायाखालची जमीन सरकली. अशी जीवघेणी मस्करी. साधा फोन सुद्धा नाही केला. त्याच्यावर भरोसा ठेवला आणि दुसरं तिकिटही नाही काढलं. वेडाबाई.. हे प्रेम नव्हे, इन्फचुएशन म्हणतात याला.

-xxxxxxx-

प्रेमाची धग क्षणभर जरी जाणवली तरी विरहाचे चटके रोजचं बसत राहतात. काही महीने उलटले… पण पाणीदार मासोळी डोळे त्याला स्वस्थ झोपू देइना. आणि तिलाही कोणतेच अन्न गोड लागेना.

-xxxxxxx-

गणपतीची सुट्टी साधून तो कोकणात काकांकडे सणाला गेला.

“आता तुझ्या लग्नाचे बघायला हवे. किती दिवस असा एकलकोंडा राहणार आहेस? लोकं म्हणू लागलीत, या ज्योतिष्याला स्वतःच्या पुतण्याचे लग्न जुळवता येईना, आमच्या पोरांची काय जुळवणार?” काका पुढे म्हणाले,

“कुठली मुलगी स्वतःच ठरवली असेल तर सांग हो, उगाच तुझ्या बापाला आणि मला शोधायचा त्रास नको, काय?”

नाइलाजाने त्याने काकांना बंगलोरला झालेला प्रसंग सांगितला.

-xxxxxxx-

“काका, पत्रिका तर छत्तीस गुणी जुळली. तुम्ही शिकवले त्याप्रमाणे मी स्वतः आकडेमोड केली, पण असे का झाले?”

“अरे बेटा, जिथे खरे मनोमिलन झाले तिथे पत्रिका कशाला बघायची ?!… ” काका त्याला समजावत म्हणाले,

“….पण अंक गणित जुळवून नक्की पहावे” आणि गडगंज हसू लागले.

त्याला काही उमगेना…

“अरे शिंच्या, ती नवीन सिल्याबसवाली आहे आणि तू जुन्या सिल्याबसवाला.”

-xxxxxxx-

त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि अंकगणित जुळून आले.

दहा पाच म्हणजे माझ्यासाठी सकाळचे दहा वाजून पाच मिनीटे आणि तिच्यानुसार पंधरा म्हणजे दुपारचे तीन !

ती दहा आठ वर्षांची म्हणजे अठरा वर्षांची !

जन्मतारीख दहा पाच म्हणजे दहा मे नसून पंधरा तारीख !

आणि छत्तीस म्हणायला शिकलीच नसेल तर तिला कळणार कसे? तीस सहा म्हणायला हवे होते.

म्हणजे पत्रिकेचे गणित चुकलेच की…. चुकू दे….

जिथे खरे मनोमिलन झाले तिथे पत्रिका कशाला बघायची ?!

-xxxxxxx-

नव्वद आठ चाळीस तीन सत्तर एक ऐंशी पाच साठ….

त्याने अंकगणित जुळवून घेतले

अठ्ठयानव त्रेचाळीस एक्काहत्तर पंचाऐशी साठ…

“हॅलो”

“….”

“हॅलो, मी बोलतोय…”

“इतके दिवस लागले होय तुम्हाला फोन करायला, का?”

“अगं मनोमिलन तेव्हाच झाले होते, पण अंकगणित जुळवायला वेळ लागला”

“म्हणजे?”

“म्हंजे म्हंजे वाघाचे पंजे आणि कुत्र्याचे कान… आल्यावर सांगतो. तुझं लोकेशन शेअर कर गूगल मॅपवरून. मी लगेच भेटायला येतोय. मला यावेळी गाडी चुकू द्यायची नाही आहे.”

“आत्ता लगेच? कुठून येताय?”

“पुण्यातून नाही, थेट कोकणातून”

– नव्याने ‘करेक्ट’ सुरवात !


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!